दयाळूपणामुळे निवळतो राग
नेदरलँड्झमधील जॉर्ज आणि मानोन हे दोघे यहोवाचे साक्षीदार, रीया नावाच्या एका वयस्कर स्त्रीला राज्याची सुवार्ता सांगण्यास गेले तेव्हा ती त्यांच्यावर संतापली. तिचे दोनदा लग्न झाले होते आणि दोन्ही पती व तिचा एक मुलगा वारला असल्याचे, शिवाय तिला संधिवाताचा तीव्र त्रास असल्याचे त्यांना समजले. संभाषणादरम्यान ती काहीशी शांत झाली असली, तरी ती मैत्रीपूर्ण बनली नाही.
ही वयस्कर स्त्री इतकी एकाकी व दुःखी असल्यामुळे, पुढच्या वेळी तिला भेटायला जाताना तिच्यासाठी फुलांचा गुच्छ नेऊ या असे जॉर्जने मानोनला सुचवले. ते परत तिला भेटायला गेले तेव्हा तिला आनंद झाला व आश्चर्यही वाटले. पण, नेमका तेव्हा तिच्याकडे वेळ नसल्यामुळे त्यांनी दुसऱ्या एका दिवशी भेटायचे ठरवले. जॉर्ज व मानोन ठरलेल्या वेळी परत गेले तेव्हा कोणीच दार उघडले नाही. तिला भेटायला ते अनेकदा गेले पण ती भेटली नाही. ती आपल्याला टाळत तर नाही ना असा विचारही ते करू लागले.
शेवटी एके दिवशी जॉर्जला रीया तिच्या घरी भेटली. ठरवलेल्या वेळी न भेटता आल्यामुळे तिने दिलगिरी व्यक्त केली आणि ती इस्पितळात होती असे सांगितले. ती म्हणाली: “तुम्ही दोघं गेल्यानंतर मी काय केलं यावर तुम्हाला विश्वासच बसणार नाही! मी बायबल वाचायला सुरुवात केली!” तिच्यासोबत चांगली चर्चा झाली आणि तिचा बायबल अभ्यास सुरू झाला.
रीया जसजसा बायबलचा अभ्यास करू लागली तसतसे तिच्या व्यक्तिमत्त्वात बदल घडून आले. ती आधी अतिशय दुःखी होती पण आता ती आनंदी व दयाळू व्यक्ती बनली. आजारपणामुळे तिला घराबाहेर पडता येत नसले, तरी काही काळातच तिने तिला भेटायला येणाऱ्यांना बायबलमधून शिकत असलेल्या गोष्टी सांगण्यास सुरुवात केली. तिच्या आरोग्यामुळे नियमितपणे सभांना उपस्थित राहणे तिला जमत नसले, तरी बंधुभगिनी तिला भेटायला तिच्या घरी जायचे तेव्हा तिला खूप आनंद व्हायचा. ज्या दिवशी ती ८२ वर्षांची झाली त्या दिवशी ती एका विभागीय संमेलनाला उपस्थित राहिली आणि देवाला केलेल्या समर्पणाचे प्रतीक म्हणून तिने बाप्तिस्मा घेतला.
त्याच्या काही महिन्यांनंतर ती वारली तेव्हा तिने लिहिलेली एक कविता सापडली. त्यात तिने वृद्ध काळातील एकाकीपणाच्या दुःखाचे वर्णन केले होते व दयाळू असणे किती महत्त्वाचे आहे यावर जोर दिला होता. मानोन म्हणते: “ती कविता वाचल्यावर मन भरून आलं. तिला दया दाखवण्यास यहोवानं आम्हाला मदत केली याबद्दल मला खूप आनंद होतो.”
होय, यहोवाच्या वैयक्तिक उदाहरणावरून आपल्याला इतरांशी प्रेमळपणे व दयाळूपणे वागण्याची प्रेरणा मिळते. (इफिस. ५:१, २) आपण देवाचे सेवक या नात्याने इतरांना दया दाखवतो तेव्हा आपल्याला सेवाकार्यात चांगले परिणाम मिळतात.—२ करिंथ. ६:४, ६.