अब्राहाम एक नम्र व्यक्ती
रखरखीत ऊन आहे, आणि अब्राहाम त्याच्या तंबूत निवांत बसला आहे. त्याची नजर दूरवर जाते तसे त्याला दुरून तीन प्रवासी येताना दिसतात.a एका क्षणाचाही विलंब न करता तो त्यांना भेटण्यासाठी धावतो, आणि त्यांना थोडा आराम करण्याची व त्यांचा पाहुणचार करू देण्याची विनंती करतो. त्यांनी “थोडी भाकर” खावी अशी विनंती तो त्यांना करतो. पण वास्तवात तो त्यांना ताजी भाकरी, लोणी, दूध, कोवळे मांस यांची मेजवानी देतो. पाहुण्यांना ही मेजवानी देताना अब्राहाम त्यांचा उत्तम पाहुणचार तर करतोच, पण त्यासोबतच जसे आपण पुढे पाहणार आहोत, तो खरी नम्रताही दाखवतो.—उत्पत्ति १८:१-८.
नम्रता म्हणजे काय? नम्रता हा गुण गर्व आणि उद्धटपणा याच्या अगदी विरुद्ध आहे. एका नम्र व्यक्तीला याची जाणीव असते की प्रत्येक व्यक्ती कुठल्या न कुठल्या गोष्टीत आपल्यापेक्षा श्रेष्ठ असते. (फिलिप्पैकर २:३) ती इतरांचे म्हणणे विचारात घेते आणि इतरांसाठी लहानसहान कामे करण्यासाठीही तयार असते.
अब्राहामाने नम्रता कशी दाखवली? अब्राहामाने आनंदाने इतरांची सेवा केली. वर सांगितल्यानुसार, अब्राहामाने जसे त्या तीन प्रवाशांना येताना पाहिले तसे तो लगेचच, त्यांना लागेल त्या गोष्टी पुरवण्यासाठी धावपळ करू लागला. त्याची पत्नी, सारा लगेच त्यांच्यासाठी जेवण बनवू लागली. पण त्यासोबतच, बाकीची कामे कोण करत आहे याकडे लक्ष द्या: अब्राहाम स्वतः त्या तीन प्रवाशांना भेटायला गेला, त्याने त्यांना काहीतरी खाण्याची विनंती केली, त्याने कळपात जाऊन कोवळे वासरू निवडले, आणि ही सर्व मेजवानी त्याने पाहुण्यांसमोर ठेवली. सर्व कामे नोकरांना सांगण्याऐवजी या नम्र व्यक्तीने ही लहानसहान कामे करण्यात स्वतःला झोकून दिले. इतरांची सेवा करण्यात कमीपणा आहे असा त्याने विचार केला नाही.
अब्राहामाने त्याच्या अधिकाराखाली असणाऱ्यांचे म्हणणे विचारात घेतले. बायबलमध्ये, अब्राहाम आणि सारा यांच्यातील मोजक्याच संवादांचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्यातल्या त्यात, दोन वेळा आपण वाचतो की अब्राहामाने साराचे म्हणणे ऐकले आणि त्यानुसार कार्यही केले. (उत्पत्ति १६:२; २१:८-१४) त्यापैकी एका प्रसंगी, तिचा सल्ला ऐकून अब्राहामाला “फार वाईट” वाटले. पण यहोवाने जेव्हा अब्राहामाला सांगितले की सारा जे बोलते ते योग्य आहे, तेव्हा अब्राहामाने नम्रपणे तिचे म्हणणे ऐकले आणि त्यानुसार कार्य केले.
आपण काय शिकू शकतो? आपण जर खरेच नम्र असलो तर आपण आनंदाने इतरांची सेवा करू. आपल्या परीने होता होईल तितके इतरांचे जीवन सुखी करण्यात आपल्याला आनंद मिळेल.
आपण इतरांच्या मतांना ज्या प्रकारे प्रतिक्रिया दाखवतो त्यावरून आपली नम्रता दिसून येते. इतरांनी आपल्याला ज्या कल्पना सुचवल्या त्या आपल्याला सुचल्या नाहीत म्हणून त्या नाकारण्याऐवजी आपण नम्रपणे इतरांचे म्हणणे विचारात घेतले पाहिजे. (नीतिसूत्रे १५:२२) खासकरून अधिकारपदावर असणाऱ्यांनी इतरांचे म्हणणे विचारात घेण्यासाठी आपले मन खुले ठेवले तर त्यांना फायदाच होतो. जॉन नावाचे एक अनुभवी अधिकारी असे म्हणतात: “मी अनुभवलंय की एक चांगला अधिकारी असे खेळीमेळीचं वातावरण तयार करतो जेणेकरून लोक अगदी मनमोकळेपणानं स्वतःला व्यक्त करू शकतात. तुमच्या देखरेखीखाली काम करणारी व्यक्ती तुमच्यापेक्षा चांगल्या प्रकारे काम करू शकते हे स्वीकारण्यासाठी नम्रतेची गरज असते. शेवटी असंच म्हणता येईल की सगळेच जण चांगल्या कल्पना सुचवू शकतात.”
अब्राहामाप्रमाणे आपण इतरांचे म्हणणे विचारात घेतो आणि त्यांच्यासाठी लहानसहान कामे करतो तेव्हा आपल्याला यहोवाची कृपापसंती मिळते. कारण, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”—१ पेत्र ५:५. (w१२-E ०१/०१)
[तळटीप]
a अब्राहामाला सुरुवातीला कळाले नसेल पण ते प्रवासी देवाचे संदेशवाहक देवदूत होते.—इब्री लोकांस १३:२.