देवाच्या वचनातून शिका
आपण चांगल्या मित्रांची निवड कशी करू शकतो?
तुमच्या मनात उद्भवलेले प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला बायबलमध्ये कोठे पाहायला मिळतील हे या लेखात सांगण्यात आले आहे. यहोवाच्या साक्षीदारांना तुमच्याबरोबर या उत्तरांची चर्चा करण्यास आनंद होईल.
१. मित्रांची निवड काळजीपूर्वक का केली पाहिजे?
इतरांनी आपल्याला पसंत करावे असे प्रत्येकालाच वाटते. यामुळे आपण सहसा आपल्या अवतीभोवती असणाऱ्या लोकांचे अनुकरण करू लागतो, म्हणजे आपल्या मित्रांचा आपल्या मनोवृत्तीवर भारी पगडा असतो. त्यामुळे योग्य मित्रांची निवड न केल्यास आपल्या व्यक्तिमत्वावर त्यांचा वाईट प्रभाव पडू शकतो.—नीतिसूत्रे ४:२३; १३:२० वाचा.
देवप्रेरित बायबल लेखक दावीद याने सुज्ञतेने मित्रांची निवड केली. देवाला एकनिष्ठ राहण्यास मदत करणाऱ्या लोकांबरोबरच दावीदाने मैत्री केली. (स्तोत्र २६:४, ५, ११, १२) उदाहरणार्थ, योनाथान दावीदाचा चांगला मित्र होता कारण त्याने दावीदाला देवावर विश्वास ठेवण्यास प्रोत्साहन दिले.—१ शमुवेल २३:१६-१८ वाचा.
२. तुम्ही देवाचे मित्र कसे बनू शकता?
यहोवा जरी सर्वशक्तिमान असला तरी आपण त्याचे मित्र बनू शकतो. उदाहरणार्थ, अब्राहाम देवाचा मित्र बनला. अब्राहामाने देवाप्रती विश्वास दाखवला आणि त्याला आज्ञाधारक राहिला, त्यामुळे देवाने त्याला आपला मित्र मानले. (उत्पत्ति २२:२, ९-१२; याकोब २:२१-२३) आपण जर देवावर विश्वास ठेवला आणि त्याच्या इच्छेनुसार केले तर आपणही त्याचे मित्र बनू शकतो.—स्तोत्र १५:१, २ वाचा.
३. चांगल्या मित्रांकडून आपल्याला कसा फायदा होतो?
खरे मित्र एकनिष्ठ असतात आणि योग्य ते करण्यास आपल्याला मदत करतात. (नीतिसूत्रे १७:१७; १८:२४) उदाहरणार्थ, योनाथान दावीदापेक्षा ३० वर्षांनी मोठा होता आणि इस्राएलचा राजा बनण्याचा वारसाहक्क त्याचा होता पण तरीही योनाथानाने दावीदाला एकनिष्ठा दाखवली आणि त्याला पाठिंबा दिला कारण राजा म्हणून देवाने दावीदाला निवडले होते. तुम्ही काही चुकीचे केले तर ते तुमच्या लक्षात आणून देण्याचे धाडसही खरे मित्र दाखवतात. (स्तोत्र १४१:५) देवावर प्रेम करणारे मित्र तुम्हाला चांगल्या सवयी विकसित करण्यास मदत करतील.—१ करिंथकर १५:३३ वाचा.
तुमच्यासारखेच योग्य ते करण्याची इच्छा बाळगणारे लोक तुम्हाला यहोवाच्या साक्षीदारांच्या राज्य सभागृहात भेटू शकतात. तेथे तुम्हाला असे मित्र सापडतील जे तुम्हाला यहोवाचा गौरव करण्याचा प्रयत्न करत राहण्यास प्रोत्साहन देतील.—इब्री लोकांस १०:२४, २५ वाचा.
पण, कधीकधी देवावर प्रेम करणारे मित्रही आपल्याला निराश करू शकतात. त्यांच्या चुका लगेच मनाला लावून घेऊ नका. (उपदेशक ७:९, २०-२२) नेहमी लक्षात ठेवा कोणताही मित्र परिपूर्ण नाही आणि जे देवावर प्रेम करतात असे मित्र आपल्यासाठी मौल्यवान आहेत. आपण आपल्या सहबांधवांच्या चुकांकडे दुर्लक्ष करावे असे देवाचे वचन आपल्याला आर्जवते.—कलस्सैकर ३:१३ वाचा.
४. तुमच्या “मित्रांनी” तुमचा विरोध केला तर काय?
बऱ्याच लोकांना असा अनुभव आला आहे की जेव्हा ते देवाच्या वचनाबद्दल शिकू लागतात तेव्हा त्यांचे काही जुने मित्र त्यांचा विरोध करतात. असे मित्र कदाचित, तुम्हाला बायबलमधून मिळालेला व्यावहारिक सल्ला आणि तुम्हाला मिळालेली भविष्याची आशा समजू शकत नाहीत. तुम्ही कदाचित त्यांना ते समजण्यास मदत करू शकता.—कलस्सैकर ४:६ वाचा.
इतर काही “मित्र” देवाच्या वचनात दिलेल्या सुवार्तेची थट्टा करतील. (२ पेत्र ३:३, ४) काही जण, योग्य ते करण्याच्या तुमच्या प्रयत्नांची थट्टा करतील. (१ पेत्र ४:४) तुमच्याबरोबर असे होत असेल तर, तुम्ही त्यांचे मित्र बनून राहावे की देवाचे मित्र बनावे याची निवड तुम्हाला करावी लागेल. तुम्ही जर देवाचे मित्र बनण्याचे निवडले, तर तुम्ही जगातील सर्वात खास मित्राची निवड केली आहे.—याकोब ४:४, ८ वाचा. (w११-E १२/०१)
जास्त माहितीसाठी यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेल्या या पुस्तकातील अध्याय १२ आणि १९ पाहा. बायबल नेमके काय शिकवते?