वाचक विचारतात . . .
देवाबद्दलची माहिती घेण्याची सर्वांना एकसारखी संधी आहे का?
▪ येशूला जेव्हा लोकांनी सर्वात मोठी आज्ञा कोणती, असे विचारले तेव्हा त्याने म्हटले: “तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.” (मत्तय २२:३७) पण, देवावर प्रीती करण्याकरता त्यांनी त्याच्याबद्दलचे अचूक ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे. (योहान १७:३) हे ज्ञान घेण्याची सर्वांनाच एकसारखी संधी मिळेल का?
देवाबद्दलचे हे ज्ञान आपण प्रामुख्याने बायबलमधून घेऊ शकतो. (२ तीमथ्य ३:१६) पुष्कळ लोकांना बायबल सहजरीत्या मिळू शकते. त्यामुळे वैयक्तिक बायबल अभ्यासाद्वारे देवाचे अचूक ज्ञान घेण्याचे आमंत्रण त्यांना वारंवार दिले जाते. (मत्तय २८:१९) काहींचे संगोपन अशा घरात होते जेथे दोन्ही पालक ख्रिस्ती आहेत व ते त्यांना देवाबद्दल शिकण्याची प्रेमळ संधी दररोज देतात.—अनुवाद ६:६, ७; इफिसकर ६:४.
पण सर्वांनाच अशी सुवर्ण संधी मिळत नाही. काही जण अशा कुटुंबात लहानाचे मोठे होतात जेथे पालकांना आपल्या मुलांबद्दल जराही ममता नसते. (२ तीमथ्य ३:१-५) अशा वातावरणात वाढलेल्यांना, स्वर्गीय देव एक प्रेमळ पिता आहे ही गोष्ट समजायला जड जाईल. काहींचे पुरेसे शिक्षण न झाल्यामुळे त्यांना बायबल व्यवस्थित वाचता येत नसेल. आणखी इतरांना खोट्या शिकवणी शिकवल्यामुळे किंवा मग ते अशा कुटुंबात, समाजात अथवा देशात राहत असावेत जेथे बायबल सत्य शिकवण्याची परवानगी दिली जात नसेल. (२ करिंथकर ४:४) मग अशा लोकांच्या परिस्थितीमुळे त्यांना देवाबद्दल शिकण्याच्या व त्याच्यावर प्रेम करण्याच्या संधीपासून वंचित ठेवले जाते का?
येशूने कबूल केले, की काही लोकांना अशा समस्यांना तोंड द्यावे लागेल की ज्यामुळे त्यांना देवावर प्रेम करायला व त्याच्या आज्ञेत राहायला जड जाईल. (मत्तय १९:२३, २४) तरीपण येशूने आपल्या शिष्यांना अशी आठवण करून दिली, की काही अडथळ्यांवर मानवांना मात करणे अशक्य वाटत असले तरी, “देवाला तर सर्व शक्य आहे.”—मत्तय १९:२५, २६.
पुढील वस्तुस्थितींचा जरा विचार करा: आपले वचन बायबल, सर्व काळात सर्वाधिक वितरण होत असलेले पुस्तक ठरेल, याची यहोवा देवाने खात्री केली. देव आणि पृथ्वीबद्दल त्याचा उद्देश यांबद्दलची सुवार्ता “सर्व जगात गाजविली जाईल” असे बायबलमध्ये भाकीत केले. (मत्तय २४:१४) आज, यहोवाचे साक्षीदार २३० पेक्षा अधिक राष्ट्रांमध्ये ही सुवार्ता गाजवत आहेत व सुमारे ५०० भाषांमध्ये बायबल आधारित प्रकाशने तयार करत आहेत. ज्यांना बायबल वाचण्याची संधी मिळाली नाही तेही, खऱ्या देवाने निर्माण केलेल्या सृष्टीसौंदर्यावरून त्याच्याबद्दल बरेच काही शिकू शकतात.—रोमकर १:२०.
तसेच, देवाचे वचन म्हणते: “परमेश्वर सर्वांची मने पारखितो आणि त्यात जे काही विचार व कल्पना उत्पन्न होतात त्या त्यास समजतात, तू त्याच्या भजनी लागशील तर तो तुला प्राप्त होईल.” (१ इतिहास २८:९) तर, प्रत्येक व्यक्तीला एकसारखी संधी मिळण्याचे वचन यहोवा देत नसला तरी, सर्व प्रामाणिक मनाच्या लोकांना ही संधी मिळेल, याची तो खात्री करतो. आणि ज्यांना जिवंतपणी अशी संधी मिळाली नाही त्या मृत पावलेल्या लोकांना तो एका धार्मिक नवीन जगात जिवंत करून ही संधी देईल.—प्रेषितांची कृत्ये २४:१५. (w१०-E ०८/०१)