देव आपल्याला श्रीमंत बनवण्याचे वचन देतो का?
‘देवाची इच्छा आहे की तुम्ही श्रीमंत बनावं, तुमच्याकडे गाडी-बंगला असावा, तुमच्या व्यवसाय-धंद्यात तुम्ही चांगला जम बसवावा. फक्त तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा आणि खिशात जेवढं आहे तेवढं सगळं त्याला द्या.’
ब्राझील मधील काही धार्मिक गट वरील संदेश देत असल्याचे एका पेपरमध्ये छापून आले होते. हा संदेश अनेक जण खूप गांभीर्याने घेतात. अमेरिकेत स्वतःला ख्रिश्चन म्हणवणाऱ्या लोकांचे मत घेण्यात आले त्याबद्दल सांगताना टाईम नियतकालिकाने असे म्हटले की “आपण श्रीमंत व्हावे अशी देवाची इच्छा आहे असे ६१ टक्के लोकांना वाटत होते व ३१ टक्के . . . लोकांनी हे मान्य केले की जर तुम्ही देवासाठी पैसे दिले तर तो तुम्हाला आणखी श्रीमंत करेल.”
अशा प्रकारच्या विश्वासांना श्रीमंतीचा सिद्धांत असे म्हणतात व लॅटीन अमेरिकेतील देशात जसे की ब्राझीलमध्ये हा सिद्धांत वेगाने पसरत आहे. लोक अशा चर्चेसमध्ये गर्दी करतात जिथे त्यांना देवाकडून धनसंपत्ती मिळेल असे सांगितले जाते. पण खरोखरच देव त्याच्या सेवकांना श्रीमंत करण्याचे वचन देतो का? गतकाळातील त्याचे सर्वच सेवक श्रीमंत होते का?
इब्री शास्त्रवचनांत, देवाचा आशीर्वाद असलेले त्याचे सेवक श्रीमंत होते असे आपण वाचतो हे खरे आहे. उदाहरणार्थ, अनुवाद ८:१८ यात असे सांगितले आहे: “तू आपला देव परमेश्वर ह्याचे स्मरण ठेव कारण . . . तोच तुला . . . धनप्राप्ति करून घेण्याचे सामर्थ्य देत आहे.” या वचनामुळे इस्त्राएली लोकांना याची खात्री मिळाली की जर त्यांनी देवाची आज्ञा पाळली तर तो त्यांना एक समृद्ध राष्ट्र बनवेल.
देवाच्या काही सेवकांविषयी काय? देवाचा विश्वासू सेवक ईयोब याच्याकडे अमाप संपत्ती होती. सैतानाने त्याला कंगाल बनवल्यानंतर यहोवाने त्याची संपत्ती “दुप्पट” केली. (ईयोब १:३; ४२:१०) अब्राहाम देखील खूप श्रीमंत होता. उत्पत्ति १३:२ वचन सांगते की, “तो कळप, रुपे व सोने ह्यांनी संपन्न होता.” पूर्वेकडील चार राजांनी मिळून अब्राहामाचा पुतण्या लोट याला पकडून नेले तेव्हा अब्राहामाने ‘आपल्या घरी जन्मलेल्या व लढाईच्या कामात कसलेल्या तीनशेअठरा दासांना घेऊन’ शत्रूचा पाठलाग केला. (उत्पत्ति १४:१४) त्याच्याकडे शस्त्र चालवू शकणारे ३१८ “कसलेले” सेवक होते यावरून त्याचे कुटुंब किती मोठे असावे याची आपल्याला कल्पना येते. एवढ्या मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण तो करत होता म्हणजे तो धनाढ्य होता व त्याच्याकडे असंख्य गुरेढोरे होती.
होय, देवाचे गतकाळातील अनेक विश्वासू सेवक जसे की अब्राहाम, इसहाक, याकोब, दावीद, शलमोन श्रीमंत होते. याचा अर्थ देवाची सेवा करणाऱ्या प्रत्येकाला तो श्रीमंत बनवेल असा होतो का? दुसरीकडे पाहता, जे गरीब आहेत त्यांच्यावर देवाचा आशीर्वाद नाही असा होतो का? पुढच्या लेखात या प्रश्नांवर चर्चा करण्यात आली आहे. (w०९ ०९/०१)