देवाच्या जवळ या
यहोवाने आपल्या गुणांबद्दल मोशेला सांगितले
निर्गम ३४:६, ७ (पं.र.भा.)
तुम्ही देवाचे—त्याच्या व्यक्तिमत्त्वाचे व तो कशा प्रकारे कार्य करतो याचे वर्णन कसे कराल? तुम्हाला देवाला त्याच्याबद्दल माहिती विचारण्याची व तो त्याबद्दल बोलत असताना ऐकण्याची संधी मिळाली तर! मोशे संदेष्ट्याला अशी संधी मिळाली होती. त्यावेळी काय घडले ते लिहिण्यासाठी त्याला प्रेरित करण्यात आले म्हणून आपण किती आभारी आहोत.
सीनाय पर्वतावर मोशेने यहोवाला विनंती केली: “कृपा करून मला तुझे तेज दाखीव.” (निर्गम ३३:१८) दुसऱ्या दिवशी या संदेष्ट्याला देवाच्या वैभवाची झलक पाहायला मिळाली.a त्या नेत्रदिपक दृष्टांतात मोशेने काय पाहिले याचे त्याने सविस्तर वर्णन सांगितले नाही. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचे देव जे बोलला ते त्याने लिहिले. निर्गम ३४:६, ७ येथे यहोवा जे बोलला त्याचे आपण परीक्षण करू या.
यहोवाने सर्वात पहिल्यांदा तो “दयाळू व कृपाळू देव” असल्याचे सांगितले. (वचन ६) एका बायबल विद्वानाच्या मते “दयाळू” यासाठी जो इब्री शब्द आहे तो “यहोवाच्या कोमल दयेला सूचित करतो. एका पित्याला आपल्या लेकराबद्दल अशीच कोमल दया असते.” दयाळू यासारखेच आणखी एक क्रियापद “कृपाळू” हे आहे. “कृपाळू व्यक्ती गरजू व्यक्तिला मदत द्यायला मनापासून तयार असते.” आईवडील ज्याप्रमाणे आपल्या मुलांची काळजी घेतात, म्हणजे त्यांना कोमलता दाखवतात व त्यांच्या गरजांबद्दल काळजी व्यक्त करतात तशीच काळजी यहोवाला आपल्या उपासकांबद्दल आहे हे आपल्याला माहीत असावे अशी त्याची इच्छा आहे.—स्तोत्र १०३:८, १३.
नंतर यहोवा सांगतो की तो “मंदक्रोध” आहे. (वचन ६) आपल्या मानवी सेवकांवर तो लगेचच रागवत नाही. उलट त्यांच्याबरोबर तो सहनशीलतेने वागतो व त्यांच्या पापी मार्गापासून त्यांनी मागे फिरावे म्हणून त्यांना वेळ देतो.—२ पेत्र ३:९.
देव पुढे सांगतो की तो “प्रेमदया व सत्य यात उदंड” आहे. (वचन ६) प्रेमदया किंवा एकनिष्ठ प्रेम या यहोवाच्या मौल्यवान गुणामुळे त्याच्या लोकांशी त्याचा एक मजबूत व अतूट नातेसंबंध जोडला गेला आहे. (अनुवाद ७:९) यहोवा सत्याचाही सागर आहे. तो कधीही कोणाला फसवत नाही व कोणाकडूनही फसवला जात नाही. तो ‘सत्यस्वरूप देव’ आहे म्हणून तो जे काही बोलतो त्यावर व भविष्याबद्दल त्याने जी काही वचने दिली आहेत त्यावर आपण पूर्ण भरवसा ठेवू शकतो.—स्तोत्र ३१:५.
यहोवाबद्दलचे आणखी एक सत्य जे आपल्याला माहीत असावे असे त्याला वाटते ते म्हणजे तो “अन्याय व अपराध व पाप,” यांची क्षमा करणारा आहे. (वचन ७) तो पश्चाताप करणाऱ्या पातक्यांना ‘क्षमा’ करण्यास तयार आहे. (स्तोत्र ८६:५) शिवाय यहोवा कधीच वाईटपणा खपवून घेत नाही. ‘मी दोष्यांस निर्दोष ठरवणार नाही,’ असे तो म्हणतो. (वचन ७) पवित्र व न्यायी असणारा हा देव जाणूनबूजून पाप करणाऱ्यांना कधीच निर्दोष ठरवणार नाही. कधी ना कधी त्यांना त्यांच्या पापी वर्तनाचे परिणाम भोगावेच लागतील.
यहोवाने आपल्या गुणांचे जे वर्णन केले आहे त्यावरून स्पष्ट कळते की आपण त्याला ओळखावे आणि त्याचे व्यक्तिमत्त्व व तो कशा प्रकारे कार्य करतो हे जाणून घ्यावे, अशी त्याची इच्छा आहे. देवाच्या चांगल्या गुणांबद्दल जाणून घ्यायला तुम्ही प्रेरित झाला आहात का? (w०९ ५/१)
[तळटीप]
a मोशेने प्रत्यक्ष यहोवाला पाहिले नव्हते कारण कोणीही मनुष्य देवाला पाहून जिवंत राहू शकत नाही. (निर्गम ३३:२०) आपला प्रतिनिधी म्हणून यहोवाने एका स्वर्गदूताचा वापर करून मोशेला त्याच्या वैभवाचा दृष्टांत दिला व तो त्या देवदूताकरवी त्याच्याबरोबर बोलला.