म्यानमारच्या चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना मदत मिळते
मे २, २००८ रोजी, नर्गिस चक्रीवादळाने म्यानमारच्या समुद्र किनाऱ्यावर धुमाकूळ घातला. आणि पाहता पाहता, या वादळाच्या बातम्या देशोदेशींच्या वृत्तपत्रांमध्ये झळकू लागल्या. इयावदी मुखांजवळच्या भागाला वादळाचा जोरदार तडाखा बसल्यामुळे तो पुराच्या पाण्याखाली पूर्णपणे बुडाला. यांत जवळजवळ १,४०,००० लोक एकतर मृत्यूमुखी पडले किंवा बेपत्ता झाले.
पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्या भागात राहणारे अनेक यहोवाचे साक्षीदार सुखरूप होते. त्यांनी त्यांच्या भक्कम बांधलेल्या राज्य सभागृहांमध्ये आश्रय घेतल्यामुळेच ते वाचले होते. एके ठिकाणी तर, २० साक्षीदार व गावातील इतर ८० लोक राज्य सभागृहाच्या छतावर तब्बल नऊ तास बसून होते. यादरम्यान, पुराच्या पाण्याची पातळी वाढून १५ फुटांपर्यंत गेली होती. हे सर्व जण बचावले होते. पण गावांतील इतर ३०० लोकांना मात्र आपला जीव गमवावा लागला. अनेक गावांमध्ये, राज्य सभागृहेच काय ती शाबूत राहिलीत.
चक्रीवादळाच्या दोन दिवसांनंतर, यांगोनमधील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा कार्यालयाने, इयावदीच्या मुखापाशी असलेल्या बोतींकों मंडळीकडे एक मदत पथक पाठवले. उद्ध्वस्त झालेल्या भागातून, लूटमार करणाऱ्यांना चुकवत व कुजलेले मृत देह पडलेल्या भागांतून मार्ग काढत हे मदत पथक बोतींकों येथे तांदूळ, वाळवलेले नूडल्स, पाणी आणि मेणबत्त्या ही साहित्ये घेऊन पोहचले. या भागात मदत कार्य पुरवणारे हे पहिले पथक होते. स्थानिक साक्षीदारांना मदत सामग्री दिल्यानंतर या पथकाने, बांधवांना उत्तेजन देण्यासाठी बायबल आधारित भाषणे दिली. शिवाय त्यांना बायबल आणि बायबल आधारित प्रकाशनेही दिली. कारण, त्यांचे सर्वकाही वाहून गेले होते.
वादळग्रस्त साक्षीदारांनी दाखवलेली मनोवृत्ती ही खरोखरच वाखाणण्याजोगी होती. वादळाचा तडाखा बसलेल्या इयावदी भागातील एका मंडळीतल्या बांधवाने म्हटले: “आमच्याकडे जे काही होतं, ते सर्व गेलं. आमची घरं नष्ट झाली. आमच्या पीकांचं नुकसान झालं. पुरामुळे पिण्याचं पाणीसुद्धा घाण झालंय. पण आम्हा बंधूभगिनींना इतर लोकांसारखी चिंता नाही. यहोवा आणि त्याच्या संघटनेवर आमच्या सर्वांचा विश्वास आहे. आम्ही गावात राहिलो किंवा दुसरीकडे गेलो तरी, आम्हाला जे काही मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे आम्ही करू.”
आपले होते नव्हते ते सर्व गमावलेल्या तीस साक्षीदारांचा एक गट, राज्य गीते आनंदाने गात गात दहा तासांचा प्रवास करून मदत पथकाने अन्न, कपडालत्ता आणलेल्या ठिकाणी जाण्यास निघाला. येथे त्यांच्या राहण्याची देखील व्यवस्था होती. पण तिथे पोहचण्याआधी त्यांना समजले, की जवळच्याच एका गावात यहोवाच्या साक्षीदारांचे विभागीय संमेलन आहे. या गटाने मग, आधी आध्यात्मिक अन्न घेऊन व ख्रिस्ती बंधूभगिनींना भेटून नंतर मदत पथक असलेल्या ठिकाणी जाण्याचे ठरवले.
वादळाचा फटका बसलेल्या सर्व भागात, साक्षीदारांची ३५ घरे जमीनदोस्त झाली होती, १२५ घरांची काही अंशी पडझड झाली होती आणि ८ राज्य सभागृहांचे किरकोळ नुकसान झाले होते. पण, शाखा कार्यालयावर या वादळाचा इतका काही परिणाम झाला नव्हता ते बरे झाले.
वादळामुळे मोठमोठी झाडे रस्त्यांवर पडल्यामुळे शाखा कार्यालयाकडे जाण्या-येण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. वादळ शांत झाल्यानंतर काही तासांतच, शाखा कार्यालयातील ३० पेक्षा अधिक सदस्यांनी, रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला ओढून मार्ग मोकळा केला. आश्चर्याने लोक हे पाहतच राहिले. थोड्याच वेळात, साक्षीदार भगिनींचा एक गट या सदस्यांसाठी आणि शेजाऱ्यांसाठी कोल्ड ड्रिंक व ताजी फळे घेऊन आला. या शेजाऱ्यांना, ते जे पाहत होते त्यावर विश्वासच बसत नव्हता. एका पत्रकाराने जेव्हा हे पाहिले तेव्हा त्याने असे म्हटले: “इतक्या चांगल्या प्रकारे काम करणारे हे लोक कोण आहेत?” ते कोण आहेत हे त्याला सांगितल्यानंतर त्याने पुढे म्हटले: “यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणेच जास्तीत जास्त लोकांनी अशी समाजसेवा करण्याची वृत्ती दाखवली तर किती बरं होईल.”
पूरग्रस्त भागातील बंधूभगिनींना मदत सामग्री पुरवण्याकरता, साक्षीदारांनी लगेच देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये दोन विपत्कालीन मदत समित्या स्थापन केल्या. या मदत पथकांत काम करण्यासाठी शेकडो स्वयंसेवक पुढे आले. ज्यांची घरे उद्ध्वस्त झाली होती अशा साक्षीदारांना काही दिवसांतच नवीन घरे बांधून देण्यात आली. एका साक्षीदार भगिनीचे घर बांधण्यासाठी एक मदत पथक आले तेव्हा तिच्या शेजारचे लोक आश्चर्यचकित होऊन बघतच राहिले. यांपैकी एक जण म्हणाली: “या साक्षीदार स्त्रीच्या चर्चचे लोक तिच्यासाठी घर बांधून देत आहेत. पण माझ्या बौद्ध धर्मियांपैकी एकही जण माझ्या मदतीला आला नाही. ती मला बायबलमधल्या गोष्टी सांगायची तेव्हा तिचे ऐकून मी साक्षीदार झाले असते तर किती बरं झालं असतं.”
तानल्हेन येथील एका साक्षीदार कुटुंबाचे घर जवळजवळ पूर्णच उद्ध्वस्त झाले होते. पण जेव्हा बांधकाम प्रकल्पावर काम करणारे व मदत समितीचे बांधव त्यांच्याकडे गेले तेव्हा या कुटुंबाने त्यांना जे म्हटले ते ऐकून या बांधवांना अगदी गहिवरून आले. त्यांनी त्यांना म्हटले: “आमचं घर ठीक आहे. आम्ही त्यात राहू शकतो. काही साक्षीदारांकडे तर घरंही नाही. तुम्ही त्यांना मदत करू शकता.”
यांगोनच्या एका भागातील काही लोक, तिथल्याच एका चर्चमध्ये आश्रयासाठी गेले. पण, चर्चच्या दाराला कुलूप होते. कोणालाही आत जाता येत नाही यामुळे संतप्त झालेल्या लोकांना चर्चचे दार तोडावेसे वाटले. यहोवाच्या साक्षीदारांनी मात्र वादळादरम्यान अनेक लोकांना राज्य सभागृहात आश्रय घेऊ दिला. उदाहरणार्थ, डला येथील राज्य सभागृहात एका साक्षीदार जोडप्याने, त्यांच्या आसपास राहणाऱ्या २० पीडितांना आश्रय दिला. या लोकांची घरे नष्ट झाली होती त्यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना कुठे जावे असा प्रश्न पडला. शिवाय त्यांना भूकही लागली होती. मग साक्षीदार असलेल्या बांधवाने, कोणीतरी तांदूळ विकत असल्याचे पाहिले तेव्हा सर्वांना पुरेल इतका तांदूळ विकत घेतला.
यांगोनमधील एका कुटुंबातले काही सदस्य यहोवाचे साक्षीदार आहेत, तर बाकीचे वेगवेगळ्या चर्चला जातात. वादळानंतर, संपूर्ण कुटुंब राज्य सभागृहातील सभेला आले. का? कुटुंबातल्या साक्षीदार नसलेल्या एका स्त्रीने म्हटले: “वादळानंतर, आमच्या चर्चमधल्या लोकांनी म्हटलं, आम्ही तुम्हाला येऊन भेटू. पण कोणीही आलं नाही. फक्त साक्षीदार आले. तुम्ही आम्हाला तांदूळ दिला, पाणी दिलं. तुम्ही त्या चर्चमधल्या लोकांपेक्षा वेगळे आहात.” साक्षीदार नसलेल्या या सदस्यांना, “मदतीसाठी आपण यहोवाला मारत असलेली हाक तो ऐकतो” असा विषय असलेला टेहळणी बुरूज अभ्यास लेख खूप आवडला. या चर्चेत त्यांनी अनेक उत्तरेही दिली.
साक्षीदारांबरोबर अभ्यास करत असलेली एक स्त्री, वादळानंतरच्या आठवड्यात मंडळीच्या सभेला आली. सभेत, शाखा कार्यालयाकडून आलेले एक पत्र वाचण्यात आले. वादळग्रस्तांना मदत करण्यासाठी काय काय करण्यात आले होते व वादळातून बचावलेल्यांचे अनुभव या पत्रातून वाचून दाखवण्यात आले. पत्र वाचून दाखवले जात असताना ही स्त्री रडू लागली. सर्व साक्षीदारांना शोधून ते सुखरूप आहेत याची खात्री करण्यात आली होती, हे ऐकून ती खूप प्रभावित व आनंदी झाली. यानंतर तिला काही मदत सामग्री देण्यात आली आणि तिच्या घराजवळच तिच्यासाठी एक तंबू उभारण्यात आला. साक्षीदारांनीच आपली खरी काळजी घेतली, असे तिने बोलून दाखवले.
“तुमची एकमेकांवर प्रीति असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहा,” असे येशूने म्हटले. (योहान १३:३५) आणि शिष्य याकोबाने, खऱ्या विश्वासासोबत चांगली कार्ये असण्यावर जोर दिला. (याकोब २:१४-१७) यहोवाचे साक्षीदार येशू आणि योहान यांच्या शब्दांचे पालन करतात आणि गरजवंतांना मदत व आधार देऊन हे प्रेम दाखवण्याचा प्रयत्न करतात. (w०९ ३/१)
[२७ पानांवरील संक्षिप्त आशय]
खऱ्या विश्वासासोबत चांगली कार्ये असणे महत्त्वाचे आहे, असे बायबल म्हणते