येशू सर्वशक्तिमान देव आहे का?
लोक देत असलेली सर्वसामान्य उत्तरे:
▪ “होय, येशू सर्वशक्तिमान देव आहे.”
▪ “येशू हा पृथ्वीवर मानवी देहातील देवाचे रूप होता.”
येशूने काय म्हटले?
▪ “माझ्यावर तुमची प्रीति असती तर मी पित्याकडे जातो म्हणून तुम्हाला आनंद वाटला असता; कारण माझा पिता माझ्यापेक्षा थोर आहे.” (योहान १४:२८) येशूने स्वतः कबूल केले, की तो आणि पिता एक सारखे नाहीत.
▪ “माझा पिता आणि तुमचा पिता आणि माझा देव व तुमचा देव त्याच्याकडे मी वर जातो.” (योहान २०:१७) येशूने, तो देव आहे असे म्हटले नाही तर देव त्याच्यापासून वेगळा आहे, असे म्हटले.
▪ “मी आपल्या मनचे बोललो नाही, तर मी काय सांगावे व काय बोलावे ह्याविषयी ज्या पित्याने मला पाठविले त्यानेच मला आज्ञा दिली आहे.” (योहान १२:४९) येशूने दिलेली शिकवण त्याची स्वतःची नव्हती तर त्याच्या पित्याची होती.
येशूने, तो सर्वशक्तिमान देव नव्हे तर देवाचा पुत्र असल्याचे सांगितले. येशूच देव असता तर पृथ्वीवर असताना तो कोणाला प्रार्थना करीत होता? (मत्तय १४:२३; २६:२६-२९) साहजिकच येशू कोणाबरोबर तरी बोलत असल्याचे नक्कीच सोंग करत नव्हता!
येशूच्या दोन शिष्यांनी त्याला त्याच्या राज्याधिकारात खास हुद्दे मिळावेत म्हणून विचारले तेव्हा येशूने म्हटले: “माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे बसण्याचा अधिकार देणे माझ्याकडे नाही, तर ज्याच्यासाठी माझ्या पित्याने हा सिद्ध केला त्यांच्यासाठी तो आहे.” (मत्तय २०:२३) येशूने जेव्हा त्यांना हा अधिकार देणे माझ्याकडे नाही, असे म्हटले तेव्हा तो खोटे बोलत होता का? नक्कीच नाही. याउलट त्याने हे नम्रपणे कबूल केले की हा अधिकार देण्याचा निर्णय केवळ पिताच घेऊ शकतो. येशूने असेही सांगितले की अशा काही गोष्टी आहेत ज्या पित्याशिवाय इतर कोणालाही म्हणजे स्वतः येशूला किंवा देवदूतांनाही माहीत नाहीत.—मार्क १३:३२.
येशू पृथ्वीवर मानव म्हणून आला केवळ तेव्हाच तो देवापेक्षा कनिष्ठ होता का? नाही. त्याचा मृत्यू व नंतर पुनरूत्थान झाल्यावर देखील तो देवापेक्षा कनिष्ठ असल्याचे बायबल सांगते. “ख्रिस्ताचा प्रमुख देव आहे,” अशी प्रेषित पौल आपल्याला आठवण करून देतो. (१ करिंथकर ११:३, सुबोध भाषांतर) भविष्यात काय होणार आहे त्याविषयी बायबल सांगते: “[ख्रिस्ताच्या] अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रहि होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.”—१ करिंथकर १५:२८.
यावरून येशू सर्वशक्तिमान देव नसल्याचे स्पष्टपणे समजते. म्हणूनच तर त्याच्या पित्याला त्याने “माझ्या देवा” असे म्हटले.—प्रकटीकरण ३:२, १२; २ करिंथकर १:३, ४.a (w०९ २/१)
[तळटीप]
a या विषयावर सविस्तर माहितीकरता यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केलेले बायबल नेमके काय शिकवते? या पुस्तकाची २०१-२०४ पृष्ठे पाहा.
[७ पानांवरील संक्षिप्त आशय]
येशूने सांगितले, की अशा काही गोष्टी आहेत ज्या पित्याशिवाय इतर कोणालाही म्हणजे स्वतः येशूला किंवा देवदूतांनाही माहीत नाहीत