उत्तरांचा शोध
“मनुष्य प्राण्याने गुजराण ‘कशी’ करायची हा प्रश्न तर सोडवलाच आहे; शिवाय, ज्या सुखसोयींचा तो पूर्वी स्वप्नातही विचार करू शकत नव्हता अशा सुखसोयी जसे की, एसी, हाय-क्वॉलिटी साऊंड सिस्टिम, . . . इत्यादी आज त्याच्याजवळ आहेत; एवढे सर्व मिळवल्यावरही एक प्रश्न त्याला भेडसावत राहतो—आपण जगतो ‘कशासाठी?’ हा सगळा खटाटोप कशासाठी? काय अर्थ आहे तो करण्यात?” —डेव्हीड जी. मायर्स, होप कॉलेज, हॉलंड, मिशिगन, यु.एस.ए., येथील मानसशास्त्राचे प्राध्यापक.
या प्राध्यापकाने उपस्थित केलेल्या प्रश्नांची तुम्ही कशी उत्तरे द्याल? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यात वेळ घालवण्यात काही अर्थ आहे का, असेही काहींना वाटेल. परंतु, या प्रश्नांकडे दुर्लक्ष करणे हे तुमच्या बुटात गेलेल्या लहान लहान खड्यांकडे दुर्लक्ष करण्यासारखे आहे. तुम्ही कदाचित चालालही. परंतु तुमच्या तळपायाला खडे टोचत असल्यामुळे तुमचा प्रवास सुखकर होणार नाही.
जीवनाचा काय अर्थ आहे, असा जर तुमच्या मनात प्रश्न आला असेल तर, असा विचार करणारे तुम्ही एकटे नाही. वर्ल्ड व्हॅल्यूज सर्व्हे, या मानवी नीतिमूल्यांच्या बाबतीत आजवर करण्यात आलेल्या सर्वात व्यापक अभ्यासात असे दिसून आले, की अनेक देशांतील बहुसंख्य लोक “जीवनाच्या अर्थाविषयी व उद्देशाविषयी” विचार करत आहेत.
तुम्हाला जर खरी मनःशांती हवी असेल तर तुम्ही तीन महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे शोधून काढली पाहिजे.
आपण अस्तित्वात कसे आलो?
जीवनाचा काय उद्देश आहे?
भविष्यात काय राखून ठेवले आहे?
या महत्त्वपूर्ण प्रश्नांची भरवशालायक उत्तरे तुम्हाला कोठे मिळू शकतील? पुढच्या लेखात या प्रश्नांची उत्तरे देण्यात आली आहेत. पण ती अंदाजपंची किंवा तत्त्वज्ञानाच्या आधारावर नाहीत. ती, देवाचे वचन बायबल याच्या आधारावर देण्यात आली आहेत. तुमच्याजवळ बायबलची प्रत असेल तर तुम्ही ते काय म्हणते हे स्वतः पाहावे, असे आम्ही सुचवू इच्छितो. (w०८ २/१)