एड्रीयानाची इच्छा
अमेरिकेतील तुलसा ओक्लाहोमा येथील एड्रीयाना नावाच्या एका सहा वर्षांच्या मुलीची एक इच्छा होती. तिच्या इच्छेची तुलना स्तोत्रकर्ता दाविदाच्या इच्छेशी करता येते; त्याने असे गायिले: “परमेश्वराजवळ मी एक वरदान मागितले, त्याच्या प्राप्तीसाठी मी झटेन; ते हे की, आयुष्यभर परमेश्वराच्या घरात माझी वस्ती व्हावी; म्हणजे मी परमेश्वराचे मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन.”—स्तोत्र २७:४.
एड्रीयाना जेव्हा फक्त सहा महिन्यांची होती, तेव्हा तिला न्यूरोब्लास्टोमा हा घातक कर्करोग झाल्याचे निदान करण्यात आले जो चेतासंस्थेच्या भागामध्ये वाढतो. जीवाला धोका असणाऱ्या या आजारामुळे तिच्या दोन्ही पायांस पक्षघात झाला होता. डॉक्टरांनी तिच्यावर अनेक शस्त्रकिया केल्या आणि जवळजवळ एक वर्षासाठी नियमित किमोथेरपीही दिली.
एड्रीयानाचे वडील, जे तिचा आणि तिच्या आईचा धार्मिक विश्वास पाळत नव्हते त्यांनी अशा एका संस्थेशी संपर्क साधला जी, जीवाला धोका असणाऱ्या आजाराला तोंड देत असलेल्या मुलांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. त्यांनी या संस्थेला अशी विनंती केली की आपल्या मुलीला मौजमजा करण्यासाठी जगप्रसिध्द असलेल्या पार्कमध्ये घेऊन जावे. ही इच्छा पूर्ण करण्याअगोदर संस्थेने एड्रीयानाची मुलाखत घेतली. आपल्याविषयी विचार केल्याबद्दल एड्रीयानाने कृतज्ञता व्यक्त केली, परंतु तिने सांगितले की तिला दुसरीकडे कोठेही न जाता न्यूयॉर्क येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या जगव्याप्त कार्यावर देखरेख करणाऱ्या केंद्राला अर्थात बेथेलला भेट देण्यास आवडेल. आपल्या वडिलांनी केलेल्या विनंतीविषयी तिला जेव्हा समजले तेव्हा तिने बेथेलला भेट देण्याची एक संधी द्यावी अशी यहोवाला प्रार्थना केली. या संस्थेला आधी वाटले की बेथेल हे ठिकाण लहान मुलांसाठी इतके मनोरंजक नसेल; परंतु एड्रीयानाच्या वडिलांनी जेव्हा तिच्या या निवडीला विरोध केला नाही तेव्हा संस्थेने तिची इच्छा मान्य केली.
बेथेलला प्रथमच भेट देण्यासाठी एड्रीयानाने न्यूयॉर्कला तिची आई, मोठी बहीण आणि मैत्रीणीसोबत प्रवास केला. एड्रीयाना म्हणाली: “यहोवाने माझी प्रार्थना ऐकली. मला माहीत होतं की तो आमचं बेथेलमध्ये स्वागत करेल. पुस्तकं, मासिकं आणि बायबल कसे तयार केले जातात हे मी पाहिलं. हे एखाद्या मनोरंजक पार्कपेक्षा कितीतरी चांगलं होतं.”
एड्रीयानाने यहोवा “परमेश्वराचे मनोरंजक रुप” पाहिले आणि सध्या यहोवाच्या लोकांचे कार्य चालणाऱ्या मुख्य केंद्राला भेट देऊन त्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. बेथेलला भेट देण्यासाठी तुमचे सुद्धा स्वागत आहे. यहोवाच्या साक्षीदारांच्या न्यूयॉर्क मधील जागतिक मुख्य कार्यालयासोबतच, जगातील इतर भागांमध्ये त्यांची शाखा दप्तरेही आहेत. (w०७ ४/१५)