एका लांब यात्रेचे सार्थक होते
काँगोच्या लोकशाही प्रजासत्ताकाहून दोन सख्ख्या बहिणींचा एक अहवाल आला. या दोघींनी, “देवाचे गौरव करा” या प्रांतीय अधिवेशनाला जाण्याकरता युद्धग्रस्त क्षेत्रात लांबचा प्रवास करण्याचे ठरवले. हे अधिवेशन लिसाला शहरात होते. लिसाला येथे जाण्यासाठी त्यांना खूप लांबचा प्रवास करावा लागणार होता. अधिवेशनात मिळणारे आध्यात्मिक शिक्षण आणि ख्रिस्ती सहचर्य यांच्याव्यतिरिक्त त्यांना किन्शासातील यहोवाच्या साक्षीदारांच्या शाखा दफ्तरातून येणाऱ्या प्रतिनिधींना भेटायचे होते. देशात मुलकी युद्ध चालल्यामुळे अनेक वर्षे त्या, शाखा दफ्तरातल्या कोणालाच भेटू शकल्या नव्हत्या. त्यामुळे त्यांना आलेल्या संधीचा फायदा घ्यायचा होता.
बसन्कुसू या आपल्या गावातून त्या एका लहानश्या नावेत बसून लिसालाकडे निघाल्या. हा ३०० किलोमीटरचा प्रवास होता. त्यांना जंगलातून आणि दोन नद्या पार करून जावे लागले. त्यांना पोहंचायला तीन आठवडे लागले. दोघीही पूर्ण-वेळेच्या सेवेत आहेत. एक ३ वर्षांपासून तर दुसरी १९ वर्षांपासून पायनियर आहे. तर दोघींनी, प्रवासात राज्याच्या सुवार्तेचा प्रचार करण्याचे ठरवले. मार्गात भेटणाऱ्यांना प्रचार करण्यात त्यांनी ११० तास खर्च केले आणि २०० पत्रिका व ३० नियतकालिके दिली.
त्यांना, पाणघोडे आणि मगरींचे वास्तव्य असलेल्या नद्या पार कराव्या लागल्या. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्या प्रवास करू शकत नव्हत्या. याशिवाय, त्यांना अनेक लष्करी तपासणी नाकेही पार करावे लागले.
हा अतिशय लांब व थकवून टाकणारा प्रवास होता तरीपण या दोघी बहिणींना त्यांच्या प्रवासाचे सार्थक झाले असे वाटत होते. लिसालातील अधिवेशनात उपस्थित राहायला मिळाल्यामुळे त्यांना फार कृतज्ञ वाटत होते आणि त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. सत्याबद्दल त्यांच्या अंतःकरणात तीव्र आवेश होता. अधिवेशनाला उपस्थित असलेल्या ७,००० बंधूभगिनींच्या सहवासात त्यांना खूप उत्तेजन मिळाले. अधिवेशन झाल्यानंतर, त्यांना पुन्हा एकदा तो लांबचा प्रवास आणि अनेक अडथळे पार पाडावी लागली. घरी पोहंचल्यावर, आपले कुटुंब सुखरूप आहे हे पाहून त्यांना आनंद वाटला. (w०५ ८/१)