तुम्ही कसले नाव कमवत आहात?
तुमच्या स्थानीय बातमीपत्रात तुम्ही कधी एखाद्याचा मृत्यूलेख किंवा एखाद्या मृत व्यक्तीच्या जीवनावर व साध्यतांवर आधारित लांबलचक अहवाल वाचला आहे का? त्या वेळी, ‘माझ्याविषयी लोकांचे काय मत असेल?’ असा प्रश्न तुम्ही स्वतःला केलात का? असे किती लोक, मृत्यूनंतर आपली कशी आठवण केली जाईल याचा विचार करतात? पुढील प्रामाणिक प्रश्न विचारात घ्या: तुमचा जर काल मृत्यू झाला असता तर आज लोक तुमच्याविषयी काय म्हणाले असते? तुम्ही कसले नाव कमवत आहात? तुमच्याविषयी तुमच्या ओळखीच्या लोकांनी आणि देवाने कशी आठवण करावी असे तुम्हाला आवडेल?
उपदेशक या बायबलमधील पुस्तकाच्या सुज्ञ लेखकाने म्हटले: “सुवासिक अत्तरापेक्षा नावलौकिक बरा; जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा.” (उपदेशक ७:१) जन्मदिनापेक्षा मृत्युदिन बरा असे का? कारण माणूस जन्मतो तेव्हा त्याने कसलेही नावलौकिक कमावलेले नसते. त्याचे जीवन कोऱ्या कागदासारखे असते. त्याच्या जीवनावरून तो एकतर चांगले किंवा वाईट नाव कमावू शकेल. ज्यांनी अनेक वर्षांनी चांगले नाव मिळवले असेल त्यांच्याकरता या बाबतीत मृत्यूदिन जन्मदिनापेक्षा बराच असेल.
तर आपल्यासमोर एक निवड आहे. उलट, दररोज आपल्याला अनेक निवडी कराव्या लागतात ज्या मृत्यूदिनी आपले नावलौकिक आणि खासकरून देवाद्वारे आपण कसे आठवले जाऊ हे ठरवतील. त्याकरता, सुज्ञ इब्री व्यक्तीने लिहिले: “न्यायीचे स्मरण आशीर्वादित असते, परंतु दुष्टांचे नाव कुजून जाईल.” (नीतिसूत्रे १०:७, पं.र.भा.) आशीर्वाद देण्याकरता देव स्मरण करील हा केवढा मोठा बहुमान!
आपण सुज्ञ असू तर आपण देवाला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करू व त्याकरता त्याच्या दर्जांच्या एकवाक्यतेत जगू. याचा अर्थ ख्रिस्ताने दिलेल्या मूलभूत तत्त्वांचे पालन करणे: “‘तू आपला देव परमेश्वर ह्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जिवाने व पूर्ण मनाने प्रीति कर.’ हीच मोठी व पहिली आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी ही आहे की, ‘तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.’ ह्या दोन आज्ञांवर सर्व नियमशास्त्र व संदेष्ट्यांचे ग्रंथ अवलंबून आहेत.”—मत्तय २२:३७-४०.
काहींची परोपकारी, मानवतावादी, नागरी हक्कांचे समर्थक म्हणून किंवा व्यापार, विज्ञान, वैद्यकीय क्षेत्रात ख्याती प्राप्त केलेले म्हणून किंवा इतर कार्यांमुळे आठवण केली जाते. पण तुमची कशी आठवण करावी असे तुम्हाला वाटते?
स्कॉटिश कवी रॉबर्ट बर्न्स (१७५९-९६) यांनी अशी इच्छा व्यक्त केली की, एखाद्या शक्तीने इतरांच्या दृष्टीतून स्वतःकडे पाहण्याचे दान आपल्याला द्यावे. स्वतःकडे निरपेक्ष दृष्टीने पाहून इतर लोकांसोबत आणि देवासोबत आपण चांगले नाव कमवले आहे असे तुम्ही म्हणू शकता का? सरतेशेवटी, खेळ-क्रिडेच्या किंवा व्यापाराच्या क्षेत्रातील तात्पुरत्या साध्यतांपेक्षा इतरांबरोबरील आपला नातेसंबंध निश्चितच अधिक महत्त्वाचा आहे. म्हणून प्रश्न आहे: इतरांबरोबरील आपल्या व्यवहारांनी अर्थात आपले संभाषण, आपली ढब, आपले हावभाव यांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो? इतरांना आपण मैत्रीपूर्ण वाटतो की लोकांमध्ये न मिसळणारे वाटतो? प्रेमळ वाटतो की कठोर वाटतो? जुळवून घेणारे वाटतो की फार कडक वाटतो? जिव्हाळा दाखवणारे, दयाळू वाटतो की भावनाशून्य आणि माणूसघाणे वाटतो? बोचेल अशी टीका करणारे वाटतो की प्रोत्साहनदायक सल्ला देणारे वाटतो? गतकाळातील व आधुनिक काळातील काही उदाहरणांचा विचार करून आपण काय शिकू शकतो ते पाहू या.
[३ पानांवरील चित्र]
रॉबर्ट बर्न्स यांनी अशी इच्छा व्यक्त केली की, एखाद्या शक्तीने इतरांच्या दृष्टीतून स्वतःकडे पाहण्याचे दान आपल्याला द्यावे.
[चित्राचे श्रेय]
From the book A History of England