“आमच्या घरी दोघीजणी आल्या”
“आमच्या तान्हुलीला जाऊन दोन वर्षं झालीत, पण तिच्या जाण्याचं अतीव दुःख आजही आम्हाला खायला उठतं.” सेंट एट्येन, फ्रान्समधील ला प्रोग्रे नावाच्या बातमीपत्रात छापून आलेल्या एका पत्राची वरील शब्दांत सुरवात करण्यात आली होती.
“मेलीसा तीन महिन्यांची होती आणि तिला ट्रायसोमी १८ नावाची भयानक विकृती जडली होती. आजारपण एक असा आघात असतो ज्यातून आपण पूर्णपणे कधीच वर येत नाही; आपल्यावर अन्याय झाला आहे असे आपल्याला वाटते. आम्ही लहानपणापासून कॅथलिक होतो तरीसुद्धा, आमच्या मनात नेहमी हाच विचार होता, की ‘देवा, तू आहेस तर या सर्व गोष्टी का होऊ देतोस?’” हे पत्र लिहिणाऱ्या आईला खरोखरच किती दुःख आणि असहाय वाटत होते. तिच्या पत्रात पुढे म्हटले होते:
“या घटनेनंतर काही दिवसांनी, आमच्या घरी दोघीजणी आल्या. त्या यहोवाच्या साक्षीदार आहेत, हे मी लगेच ओळखलं. मी त्यांना सभ्यपणे जायला सांगणार होते, पण त्या मला देत असलेले एक माहितीपत्रक मी पाहिलं. देव दुःखाला अनुमती का देतो याविषयी ते माहितीपत्रक होतं. मी त्यांना आत बोलवलं, असा विचार करून की त्या मला जे काही सांगणार आहेत ते चूक आहे, हे मी त्यांना सांगेन. मी असा विचार केला, की माझ्या कुटुंबानं प्रमाणापेक्षा अधिक त्रास सहन केला होता व ‘देवानं दिलं आणि देवानंच नेलं,’ यासारख्या निरर्थक गोष्टीही मी बऱ्याच ऐकल्या होत्या. साक्षीदार असलेल्या या दोन महिला तासापेक्षा थोडा अधिक वेळ माझ्या घरी बसल्या. त्यांनी माझं बोलणं अतिशय दयाळुपणे ऐकून घेतलं; मला खूप बरं वाटू लागलं होतं, कारण माझं मन खूप हलकं झालं होतं; त्या जायला निघाल्या तेव्हा मी, त्यांनी मला पुन्हा भेट द्यावी म्हणून तयार झाले. ही दोन वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी अद्याप यहोवाची साक्षीदार झालेली नाही, पण त्यांच्याबरोबर बायबलचा अभ्यास करायला सुरवात केली आहे आणि मला जमेल तेव्हा मी त्यांच्या सभांना उपस्थित राहते.”