वाचकांचे प्रश्न
दियाबल सैतानाकडे मनुष्याच्या मनातील विचार ओळखण्याची शक्ती आहे का?
याबाबतीत आपण ठाम असू शकत नसलो तरी, असे दिसते की सैतानाकडे किंवा त्याच्या दुरात्म्यांकडे आपले विचार जाणण्याची शक्ती नाही.
सैतानाला दिलेल्या वर्णनात्मक नावांचा जरा विचार करा. त्याला, सैतान (विरोधक), दियाबल (खोटे बोलणारा), सर्प (फसवणूक करणारा या शब्दाचा समानार्थी), मोहांत पाडणारा आणि लबाड असे म्हटले आहे. (ईयोब १:६; मत्तय ४:३; योहान ८:४४; २ करिंथकर ११:३; प्रकटीकरण १२:९) यांपैकी एकही वर्णनात्मक नाव, सैतानाकडे आपल्या मनात काय आहे ते ओळखण्याची शक्ती असल्याचे सूचित करीत नाही.
याउलट, यहोवा “हृदये पारखितो” असे म्हटले आहे. (नीतिसूत्रे १७:३; १ शमुवेल १६:७; १ इतिहास २९:१७) इब्री लोकांस ४:१३ म्हणते: “त्याच्या [यहोवाच्या] दृष्टीला अदृश्य अशी कोणतीहि निर्मिति नाही, तर ज्याच्याबरोबर आपला संबंध आहे त्याच्या दृष्टीला सर्व उघडे व प्रगट केलेले आहे.” हृदय पारखण्याची क्षमता यहोवाने आपला पुत्र येशू यालाही दिली आहे यात काही आश्चर्य नाही. पुनरुत्थित येशूने म्हटले: “मी मने व अंतःकरणे ह्यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन.”—प्रकटीकरण २:२३.
सैतान मानवाचे हृदय व मन पारखू शकतो असे बायबल सांगत नाही. हे महत्त्वाचे आहे कारण, प्रेषित पौल आपल्याला असे आश्वासन देतो की ख्रिश्चन ‘[सैतानाच्या] युक्तींविषयी अजाण आहेत असे नाही.’ (२ करिंथकर २:११, पं.र.भा.) त्यामुळे आपण जिच्याविषयी पूर्णपणे अज्ञानी आहोत अशी असाधारण क्षमता सैतानाजवळ आहे अशी आपण भीती बाळगण्याची गरज नाही.
तरीपण, याचा अर्थ असा होत नाही की आपल्या शत्रूला आपल्या कमतरता समजत नाहीत. मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी सैतानाला प्रदीर्घ काळ मिळाला आहे. आपण कशाप्रकारे वागतो, कोणते मनोरंजन करतो, कोणत्या गोष्टी बोलतो वगैरे समजण्यासाठी त्याला आपले मन पाहण्याची गरज नाही. आपल्या चेहऱ्यावरील हावभाव आणि हातवारे यावरून त्याला, आपण काय विचार करतो किंवा आपल्या भावना काय आहेत हे समजण्यासाठी देखील सुगावा मिळू शकतो.
परंतु, सैतान सहसा एदेन बागेत त्याने वापरलेल्या पद्धतींचाच अर्थात लबाडी, फसवणूक आणि चुकीची माहिती या पद्धतींचाच उपयोग करतो. (उत्पत्ति ३:१-५) सैतान आपल्या मनातले विचार ओळखू शकतो, अशी ख्रिश्चनांना भीती बाळगण्याची गरज नसली तरीसुद्धा, तो आपल्या मनात विचार घालण्याचा प्रयत्न करू शकतो याविषयी त्यांनी खबरदारी बाळगावी. ख्रिश्चनांचे ‘मन बिघडावे व त्यांनी सत्यास मुकावे’ अशी त्याची इच्छा आहे. (१ तीमथ्य ६:५) म्हणूनच तर सैतानाचे जग भ्रष्ट करणाऱ्या माहितीचा व मनोरंजनाचा भडिमार करत आहे. या भडिमाराचा प्रतिकार करण्यासाठी ख्रिश्चनांनी “तारणाचे शिरस्त्राण” घालून आपल्या मनाचे संरक्षण केले पाहिजे. (इफिसकर ६:१७) असे ते, आपले मन बायबल सत्यांनी भरण्याद्वारे व सैतानी जगाच्या हिणकस गोष्टींबरोबर अनावश्यक संपर्क टाळण्याद्वारे करतात.
सैतान हा एक भयानक शत्रू आहे. परंतू त्याचे किंवा त्याच्या दुरात्म्यांचे आपण विकृत भय बाळगण्याची गरज नाही. याकोब ४:७ आपल्याला अशी खात्री देते: “सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हांपासून पळून जाईल.” आपण हा सल्ला अनुसरल्यास, येशूप्रमाणे आपणही म्हणू शकू की सैतानाची माझ्यावर काही सत्ता नाही.—योहान १४:३०.