तुम्हाला आठवते का?
तुम्ही वाचलेले अलीकडील टेहळणी बुरूजचे अंक तुम्हाला आवडले का? पुढील प्रश्नांची उत्तरे देण्यास जमते का ते पाहा:
• “विचारशक्ती” तुमचे संरक्षण कसे करू शकते? (नीतिसूत्रे १:४, NW)
विचारशक्ती आपल्याला आध्यात्मिक धोक्यांच्याबाबतीत सावध करू शकते आणि सुज्ञ मार्गाक्रमणाची, योजना करण्यास आपल्याला प्रवृत्त करू शकते, जसे की कामाच्या ठिकाणी लैंगिक मोह टाळण्यास आपल्याला मदत करू शकते. विचारशक्ती आपल्याला याची जाणीव करून देते की सहख्रिस्ती अपरिपूर्ण आहेत आणि त्यामुळे आपण, एखाद्याने चीड आणून देणारे काही कार्य केल्यास लगेच प्रतिक्रिया दाखवण्याचे टाळतो. विचारशक्ती आपल्याला, आध्यात्मिक मार्गापासून बहकवणारे भौतिक दबाव टाळण्यासही मदत करते.—८/१५, पृष्ठे २१-४.
• चांगले शेजारी होऊन आपण एक वरदान कसे ठरू शकतो?
चांगले शेजारी होण्याचे दोन मार्ग म्हणजे, चांगले दाते आणि कृतज्ञ ग्राहक होणे. संकटकाळी चांगला शेजारी विशेषकरून मोलाचा ठरतो. यहोवाचे साक्षीदार लवकरच येणाऱ्या घटनेची आणि देव दुष्टांचा नाश करणार आहे ही ताकीद दुसऱ्यांना देण्याद्वारे चांगले शेजारी होण्याचा प्रयत्न करतात.—९/१, पृष्ठे ४-७.
• बायबलनुसार खरे संत कोण आहेत आणि ते मानवजातीला कशाप्रकारे मदत करतील?
आरंभीचे सर्व ख्रिस्ती खरे संत किंवा पवित्र जन होते आणि मानवांनी किंवा कोणत्याही संघटनेने नव्हे तर देवाने त्यांना पवित्र ठरवले होते. (रोमकर १:७) स्वर्गीय जीवनासाठी पुनरुत्थित केल्यानंतर हे पवित्र जन ख्रिस्ताबरोबर पृथ्वीवरील विश्वासू लोकांना आशीर्वादित करण्यात सहभाग घेतील. (इफिसकर १:१८-२१)—९/१५, पृष्ठे ५-७.
• प्राचीन ग्रीसमधील खेळांविषयीची माहिती घेतल्याने ख्रिश्चनांना कोणता लाभ मिळू शकतो?
प्रेषित पेत्र आणि पौल यांच्या लिखाणांत प्राचीन खेळांवर आधारित काही दाखले आहेत किंवा अप्रत्यक्ष उल्लेख आहेत. (१ करिंथकर ९:२६; १ तीमथ्य ४:७; २ तीमथ्य २:५; १ पेत्र ५:१०) एका प्राचीन खेळाडूला चांगला प्रशिक्षक असणे, आत्म-संयम बाळगणे व त्याच्या प्रयत्नांना योग्य दिशा देणे महत्त्वाचे होते. ख्रिश्चनांच्या आध्यात्मिक प्रयत्नांच्या बाबतीतही हीच गोष्ट आज खरी आहे.—१०/१, पृष्ठे २८-३१.
• विदेशात मुलांचे संगोपन करण्यात कोणत्या अडचणी येतात व यामुळे कोणती प्रतिफळे मिळतात?
पुष्कळ मुले आपल्या पालकांच्या आधी नवीन भाषा शिकून घेतात; अशा पालकांना आपल्या मुलांचे विचार व प्रतिक्रिया समजायला जड जाऊ शकते. आणि पालकांच्या भाषेत कदाचित मुलांना बायबलमधील शिकवणींचे आकलन होणार नाही. तरीपण, पालक त्यांच्या मातृभाषेत मुलांबरोबर बोलतात तेव्हा त्यांच्यातील बंधन मजबूत होऊ शकते; आणि मुलांना दोन भाषा अवगत होतील व दोन संस्कृतींशी त्यांचा परिचय होईल.—१०/१५, पृष्ठे २२-६.
• चूक कबूल करण्यास शिकणे महत्त्वाचे का आहे?
मनापासून चूक कबूल करणे हा बिघडलेला नातेसंबंध सुधारण्याचा एक मार्ग आहे. चूक कबूल केल्याने काय काय साध्य होऊ शकते याची बायबलमध्ये उदाहरणे आहेत. (१ शमुवेल २५:२-३५; प्रेषितांची कृत्ये २३:१-५) सहसा, दोन लोकांमध्ये बिनसते तेव्हा दोघांचाही दोष असतो. त्यामुळे, परस्पर चूक कबूल करून क्षमा मागितली पाहिजे.—११/१, पृष्ठे ४-७.
• लहान रक्कमेचा जुगारसुद्धा गैर का आहे?
जुगारामुळे माणूस गर्विष्ठ होतो, अनिष्ट प्रकारचा स्पर्धात्मक आत्मा व जिंकण्याची तीव्र इच्छा एका व्यक्तीत निर्माण होते. (१ करिंथकर ६:९, १०) जुगाराचे व्यसन लागलेल्या अनेकांनी लहान वयापासूनच पैज लावून जुगार खेळण्यास सुरवात केली होती.—११/१, पृष्ठ ३१.
• बायबलची पुष्कळ पुस्तके ग्रीकमध्ये लिहिण्यात आलेली असली तरीसुद्धा ग्रीकमध्ये बायबलचे भाषांतर करण्याची काय गरज होती आणि यामुळे कोणते चांगले परिणाम मिळाले?
आधुनिक ग्रीक भाषा, इब्री शास्त्रवचनांच्या सेप्टुआजिंट अनुवादातील व ख्रिस्ती ग्रीक शास्त्रवचनांतील ग्रीक भाषेपेक्षा फार वेगळी आहे. अलीकडील शतकांमध्ये, संपूर्ण बायबलचे किंवा त्याच्या काही भागांचे ग्रीक बोली भाषेत भाषांतर करण्याचे प्रयत्न करण्यात आले आहेत. आज, बायबलचे संपूर्ण किंवा निम्मे उपलब्ध असलेले सुमारे ३० अनुवाद आहेत जे सामान्य ग्रीक लोकांना समजण्यासारखे आहेत; यामध्ये, १९९७ साली ग्रीक भाषेत प्रकाशित झालेले एक उल्लेखनीय बायबल म्हणजे पवित्र शास्त्रवचनांचे नवे जग भाषांतर.—११/१५, पृष्ठे २६-९.
• ख्रिश्चनांना दशमांश देण्याची गरज का नाही?
प्राचीन इस्राएलला दिलेल्या नियमशास्त्रानुसार, दशमांश, लेवी वंशाच्या लोकांच्या व गरजू लोकांच्या उदरनिर्वाहासाठी केलेली एक तरतूद होती. (लेवीय २७:३०; अनुवाद १४:२८, २९) येशूच्या मृत्यूच्या बलिदानाने नियमशास्त्र आणि त्यासोबतच दशमांश देण्याची आज्ञा देखील खोडली गेली. (इफिसकर २:१३-१५) आरंभीच्या मंडळीत, प्रत्येक ख्रिश्चनाला आपापल्या उत्पन्नाच्या मानाने व आपापल्या मनात ठरवल्याप्रमाणे द्यावयाचे होते. (२ करिंथकर ९:५, ७)—१२/१, पृष्ठे ४-६.
• प्रकटीकरण २०:८ चा अर्थ, शेवटल्या परीक्षेच्या वेळी सैतान पुष्कळ लोकांची फसवणूक करण्यात यशस्वी होईल असा होतो का?
वचनात म्हटले आहे, की फसवणूक झालेल्यांची संख्या “समुद्राच्या वाळूइतकी” असेल. बायबलमध्ये सहसा हा वाक्यांश, अतिभव्य प्रमाण सूचित न करता, एका अज्ञात संख्येला सूचित करतो. अब्राहामाची संतती, जी “समुद्रतीरीच्या वाळूइतकी” व्हायची होती, ती येशू ख्रिस्ताला वगळून १,४४,००० इतकीच झाली. (उत्पत्ति २२:१७; प्रकटीकरण १४:१-४)—१२/१, पृष्ठ २९.