वाचकांचे प्रश्न
कराराचा कोश उचलण्याचे दांडे कसे ठेवले होते कारण १ राजे ८:८ मध्ये सांगितल्याप्रमाणे पवित्रस्थानातून ते दिसत होते?
यहोवाने मोशेला अरण्यात असताना निवासमंडपाचा नमुना दिला तेव्हा कराराचा कोश हा त्यातला एक मुख्य भाग होता. सोन्याने मढवलेल्या या आयताकृती पेटीत नियमशास्त्राच्या पाट्या आणि इतर वस्तू होत्या. हे सर्वात आतल्या खोलीत अर्थात परमपवित्रस्थानात ठेवले जात. कोशाच्या दयासनावर पंख पसरलेले दोन सोन्याचे करूब होते. कोशाच्या प्रत्येक बाजूला कड्या होत्या ज्यामध्ये दांडे घालून तो उचलता येऊ शकत होता. हे दांडे बाभळीच्या झाडाचे असून सोन्याने मढवलेले होते. साहजिकच हे दांडे, कोशाच्या लांबीच्या समांतर, एका बाजूने एक तर दुसऱ्या बाजूने दुसरा अशाप्रकारे कड्यांमधून घातलेले होते. त्यामुळे, पूर्वेकडे तोंड केलेल्या निवासमंडपाच्या परमपवित्रस्थानात कोश होता तर हे दांडे उत्तर-दक्षिण दिशेने तोंड करून होते. शलमोनाने बांधलेल्या मंदिरातही कोश ठेवण्यात आला तेव्हा दांडे याच स्थितीत होते.—निर्गम २५:१०-२२; ३७:४-९; ४०:१७-२१.a
परमपवित्रस्थान आणि पवित्रस्थान (बाहेरील खोली) यांच्यामध्ये एक पडदा होता. पवित्रस्थानातील याजक, जेथे देव भेट देत असे त्या परमपवित्रस्थानातील कोश पाहू शकत नव्हते. (इबी लोकांस ९:१-७) म्हणून १ राजे ८:८ यामुळे कदाचित गोंधळ होऊ शकतो जेथे असे म्हटले आहे: “त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची शेवटे गाभाऱ्यासमोरल्या पवित्रस्थानातून दिसत; परंतु पवित्रस्थानाबाहेरून ती दिसत नसत.” हाच मुद्दा २ इतिहास ५:९ येथेही सांगितला आहे. मंदिरातील पवित्रस्थानात असलेल्या व्यक्तीला हे दांडे दिसणे कसे शक्य होते?
काहींनी अशी कल्पना केली आहे की, हे दांडे पडद्याला लागत असल्यामुळे बाहेरून पाहिल्यास, दांडे असलेल्या दोन ठिकाणी पडदा थोडा पुढे आलेला दिसत असेल. पण हे दांडे उत्तर-दक्षिण दिशेकडे तोंड करून असते तर पडदा या दांड्यांच्या समांतर असल्यामुळे हेसुद्धा शक्य नाही. (गणना ३:३८) याला एक अधिक समजण्याजोगे स्पष्टीकरण आहे. पडदा आणि मंदिराच्या भिंतीत थोडीशी जागा असल्यास किंवा महायाजकाला परमपवित्रस्थानात प्रवेश करायचा असल्यास हे दांडे कदाचित दिसत असावेत. पडद्यामुळे कोश पूर्णपणे झाकला जात होता परंतु हे दांडे दोन्ही बाजूने पुढे गेलेले असल्यामुळे फटीतून ते दिसू शकत होते. हे स्पष्टीकरण पटण्याजोगे वाटत असले तरी आपण ठामपणे असे म्हणू शकत नाही.
स्पष्टतः, असे अनेक तपशील आहेत ज्याविषयी आपल्याला आणखी शिकायला मिळेल. प्रेषित पौलाने इब्री लोकांस लिहिलेल्या पत्रामध्ये काही गोष्टींचा उल्लेख केला. मग तो म्हणाला: “ह्यांविषयी आता सविस्तर सांगत नाही.” (इब्री लोकांस ९:५) भविष्यात विश्वासू लोकांचे पुनरुत्थान झाल्यानंतर मोशे, अहरोन, बसालेल आणि अशाच इतर पुरुषांकडून आपल्याला आणखी उत्तेजनदायक गोष्टी शिकायला मिळतील कारण निवाडमंडपाचा नमुना आणि त्याचे कार्य यांमध्ये ते व्यक्तिशः गोवलेले होते.—निर्गम ३६:१.
[तळटीप]
a निवासमंडपात कोश ठेवल्यावरही हे दांडे कड्यांमधून काढायचे नव्हते. त्यामुळे, दांड्यांचा इतर कशासाठीही उपयोग केला जाऊ शकत नव्हता. त्याचप्रमाणे, यामुळे कोशाला हात लावावा लागणार नव्हता; पण दांडे कड्यांमधून काढले असते तर प्रत्येक वेळी कोश दुसऱ्या ठिकाणी नेताना कड्यांमध्ये दांडे घालण्यासाठी पवित्र कोशाला हात लावावा लागला असता. गणना ४:६ येथे “दांडे बसवावे” असे जे म्हटले आहे ते कदाचित एखाद्या नवीन छावणीमध्ये नेण्याआधी ही वजनदार पेटी उचलताना दांडे व्यवस्थित करण्याला किंवा नीट करण्याला सूचित करत असावे.