“देव खरोखर लोकांना नरकात जळत राहण्याची शिक्षा देतो का?”
“तुम्ही वेदान्ताचा (थियोलॉजी) अभ्यास करत आहात का?”
हा प्रश्न ऐकून जोएल आणि कार्लला आश्चर्यच वाटले. न्यूयॉर्क, ब्रुकलिन येथील यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयात स्वयंसेवक असणारे हे दोन तरुण त्या परिसरातल्या एका पुस्तकाच्या दुकानात पुस्तके पाहत होते. जोएल, बायबलचे संदर्भ ग्रंथ पाहत असताना कार्ल त्याला सेवाकार्यातील एक अनुभव सांगत होता. त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका मनुष्याने त्यांचे हे संभाषण ऐकले आणि तो त्यांच्याकडे आला.
खरे तर, ते दोघे वेदान्ताचा अभ्यास करत होते की नाही हे त्याला जाणून घ्यायचे नव्हते. त्याच्या मनात एक वेगळाच प्रश्न होता. तो म्हणाला: “मी यहुदी आहे आणि माझ्या काही ख्रिश्चन मित्रांनी मला सांगितलं की, यहुद्यांनी येशूला नाकारल्यामुळे मला नरकात टाकले जाईल. हे ऐकून मी खूप अस्वस्थ झालोय. एका प्रेमळ देवाने अशी शिक्षा करावी हे बरोबर वाटत नाही. देव खरोखर लोकांना नरकात जळत राहण्याची शिक्षा देतो का?”
आपण बायबलचा प्रामाणिकपणे अभ्यास करणारे विद्यार्थी आहोत असे जोएल आणि कार्ल यांनी त्या प्रांजळ व्यक्तीला सांगितले. त्यांनी शास्त्रवचनांतून त्याला दाखवले की, मेलेले लोक बेशुद्धावस्थेत असतात आणि पुनरुत्थान होईपर्यंत केवळ मृतावस्थेत झोपलेले असतात. यामुळे, त्यांना कोणत्याही प्रकारची यातना किंवा वेदनामय नरकाग्नीचा अनुभव होत नाही. (स्तोत्र १४६:३, ४; उपदेशक ९:५, १०; दानीएल १२:१३; योहान ११:११-१४, २३-२६) त्यांच्या ४५-मिनिटांच्या चर्चेनंतर त्या गृहस्थाने जोएल आणि कार्ल यांना आपला पत्ता दिला आणि या विषयावर अधिक माहिती मागितली.
नरक हे अग्नीयुक्त यातना देण्याचे ठिकाण असते तर कोणी अशा ठिकाणी जाण्याची विनंती करेल का? परंतु, कुलपिता ईयोब याने आपल्या दयनीय स्थितीतून बाहेर पडण्यासाठी अशी विनंती केली: “तू मला नरकात सुरक्षित ठेवावे आणि तुझा क्रोध शमेपर्यंत मला दृष्टिआड ठेवावे ही माझी इच्छा कोण पूरी करील?” (ईयोब १४:१३, डुए व्हर्शन) यावरून, स्पष्ट होते की, नरक हे यातनेचे ठिकाण आहे असा ईयोबाचा विश्वास नव्हता. कारण, तो तर तेथे सुरक्षित राहू इच्छित होता. मृत्यू ही अस्तित्वहीन स्थिती आहे आणि बायबलमध्ये ज्याला नरक (अधोलोक) म्हटले आहे ती मानवजातीची सर्वसामान्य कबर आहे.
मेल्यावर मनुष्याचे काय होते आणि त्यानंतर आपल्याला काय आशा आहे याविषयी तुम्हाला अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही खालील निमंत्रणाला उत्तर देऊ शकता.