‘याने सर्वांना आनंद मिळो’
दक्षिण पॅसिफिकमध्ये एकूण नऊ द्वीपांचा मिळून बनलेला तुवालु हा एक निसर्गरम्य देश आहे. तेथील लोकसंख्या फक्त १०,५०० आहे. तरीही, “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” ही देवाची इच्छा समजल्यामुळे तेथील यहोवाच्या साक्षीदारांना स्वतःच्या भाषेत बायबलची प्रकाशने हवी होती. (१ तीमथ्य २:४) परंतु त्यांच्या भाषेत भाषांतर करणे एक आव्हान होते कारण त्यांच्या भाषेचा शब्दकोश देखील नव्हता. पण मग, १९७९ साली, तुवालु येथे यहोवाचा साक्षीदार असलेल्या एका मिशनरी बांधवाने व त्यांच्या पत्नीने हे आव्हान स्वीकारले. त्यांनी एका कुटुंबासोबत राहून तेथील भाषा शिकून घेतली आणि हळूहळू तुवालु शब्द आणि त्यांच्या अर्थांचा एक संग्रह तयार केला. १९८४ मध्ये, वॉचटावर बायबल ॲण्ड ट्रॅक्ट सोसायटी ऑफ न्यूयॉर्कने तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल हे पुस्तक तुवालु भाषेत प्रकाशित केले.
तुवालुचे माजी पंतप्रधान डॉ. टी. पुआपुआ यांनी अनंतकाल जगू शकाल पुस्तकाविषयी एक प्रशंसापत्र पाठवले. त्यात त्यांनी लिहिले होते: “या पुस्तकाने तुवालुच्या समृद्ध परंपरांमध्ये आणखी एक नवीन आणि महत्त्वाची भर पडली आहे. आणि हे नक्कीच तुमच्या आनंदाचे कारण असावे. कारण या राष्ट्रातील लोकांचे आध्यात्मिक जीवन समृद्ध करण्यासाठी तुम्ही उत्तम कामगिरी बजावली आहे. शैक्षणिक पुस्तकांच्या प्रकाशनासंबंधी तुवालुच्या इतिहासामध्ये या पुस्तकाची निश्चित नोंद होईल. . . . तुमच्या [या कामगिरीने] सर्वांना आनंद मिळो.”
त्या भाषांतरकाराने केलेल्या शब्दसंग्रहामुळे १९९३ साली तुवालुअन-इंग्रजी शब्दकोशाचे प्रकाशन करण्यात आले. या भाषेमध्ये सामान्य जनतेसाठी तयार केलेला तो पहिलाच शब्दकोश होता. अलीकडे, तुवालुच्या राष्ट्रीय भाषा बोर्डाने त्या शब्दकोशाच्या साहाय्याने प्रादेशिक भाषेतला पहिला शब्दकोश तयार करण्यासाठी परवानगी मागितली.
जानेवारी १, १९८९ पासून तुवालुअन भाषेत टेहळणी बुरूज पत्रिकेचा मासिक अंक सुरू झाला. तुम्हीसुद्धा हे मासिक दुसऱ्या एखाद्या भाषेत वाचत असल्यास पृष्ठ २ वर टेहळणी बुरूज पत्रिकेचे प्रकाशन होत असलेल्या भाषांमध्ये तुमची मातृभाषा आहे का ते पाहा. तुमच्या स्वतःच्या भाषेत वाचल्याने तुम्हाला अधिक आनंद मिळेल.