धार्मिक मतभेद कधी दूर होतील का?
“आजचा हा दिवस चर्चच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांत लिहिला जाईल,” असे लुथेरन विश्व संघाचे अध्यक्ष, ख्रिस्टियन क्राउस यांनी म्हटले. तर कॅथलिक चर्चचे प्रमुख, पोप जॉन पॉल दुसरे यांनी म्हटले, की “कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यातले मदभेद मिटवून त्यांच्यात एकी आणण्याच्या दृष्टीने उचललेले हे सर्वात महत्त्वपूर्ण पाऊल आहे.”
अशा आवेशपूर्ण घोषणा करण्याचे कारण, लुथेरन आणि कॅथलिक चर्चच्या अधिकाऱ्यांनी काही समान ख्रिस्ती शिकवणुकींवर तडजोड करणाऱ्या करार पत्रावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. ही घटना ऑक्टोबर ३१, १९९९ रोजी जर्मनीच्या ऑग्सबर्ग शहरात घडली. पण, त्यासाठी ऑक्टोबर ३१ हीच तारीख आणि ऑग्सबर्ग शहरच का निवडले गेले? असे म्हटले जाते की ऑक्टोबर ३१, १५१७ रोजी, मार्टिन लूथर (लुथेरन चर्चचे संस्थापक) यांनी व्हिटन्बर्ग येथील चर्चच्या दारावर कॅथलिक चर्चच्या शिकवणुकींविरुद्ध ९५ मुद्द्यांचे पत्रक (थेसिस) लावले होते. आणि ऑग्सबर्ग शहर यासाठी निवडले गेले कारण १५३० साली ऑग्सबर्ग शहरात लुथरच्या अनुयायांनी आपली धर्मतत्त्वे लिहिलेले एक पत्रक कॅथलिक चर्चला दिले होते. त्या पत्रकास ऑग्सबर्ग कन्फेशन असे नाव पडले. कॅथलिक चर्चने या पत्रकातील मुद्दे अभ्यासले पण, त्याचा स्वीकार करण्यास साफ नकार दिला. त्यामुळे कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यात कायमची दुफळी निर्माण झाली.
तेव्हा प्रश्न आहे, की कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यातले मदभेद खरच दूर होतील का? बऱ्याच जणांच्या मते असे होणार नाही. कारण कॅथलिक चर्चशी समझोता केल्याबद्दल प्रॉटेस्टंट चर्चच्या जवळजवळ २५० धर्मवेत्त्यांनी लुथेरन चर्चविरुद्ध एक पत्रक तयार केले; आणि त्यावर प्रॉटेस्टंट चर्चने स्वाक्षरी केल्यास काही काळातच कॅथलिक चर्च त्यांना आपल्या मुठीत घेतील याची सूचना त्यांनी दिली. आणखीन एक कारण म्हणजे, अलीकडेच कॅथलिक चर्चने अशी घोषणा केली की, वर्ष २००० हे एक पवित्र वर्ष असेल आणि जो कोणी त्या वर्षी रोमच्या यात्रेला जाईल त्याची बहुतेक पापे क्षमा केली जातील. हे ऐकून प्रॉटेस्टंट लोकांचे पित्त खवळले. कारण याच मुद्द्यावरून ५०० वर्षांपूर्वी कॅथलिक व प्रोटेस्टंट चर्चमध्ये दुफळी निर्माण झाली होती. १५३० साली कॅथलिक चर्चला दिलेले पत्रक कॅथलिक चर्चने अजूनही स्वीकारलेले नाही. त्यामुळे कॅथलिक आणि प्रॉटेस्टंट यांच्यातले मतभेद मिटवून त्यांच्यात समेट घडवून आणणे खरोखर महाकठीण आहे.
होय, या दोन चर्चेसमधली दरी इतकी रूंदावली आहे, की केवळ कागदी घोडे नाचवून ही दरी मिटवणे शक्य नाही. शिवाय, एका समान विश्वासाकरता त्या विश्वासाच्या सर्व शिकवणुकी देवाचे वचन, बायबल यावर आधारित असल्या पाहिजेत. (इफिसकर ४:३-६) त्यांच्याशी तडजोड करून एकता आणणे अशक्य आहे. देव आपल्याकडून काय अपेक्षितो ते जाणून त्या अपेक्षा पूर्ण केल्यानेच खरी एकता साध्य होते. मीखा संदेष्ट्याने म्हटले: “सर्व राष्ट्रे आपापल्या दैवतांच्या नावाने चालत आहेत; पण आम्ही परमेश्वर [यहोवा] आमचा देव याच्या नावाने सदासर्वकाळ चालू.”—मीखा ४:५.
[३२ पानांवरील चित्राचे श्रेय]
© Ralph Orlowski/REUTERS/Archive Photos