ईश्वरी बुद्धी असलेल्या लोकांना तुम्ही कसे ओळखाल?
एकदा शलमोन राजाने एका गरीब परंतू बुद्धिमान मनुष्याची गोष्ट सांगितली. त्या गरीब मनुष्याने आपल्या बुद्धीचा वापर करून संपूर्ण शहराला नाशापासून वाचवले. पण, दुःखाची गोष्ट अशी की त्याच्या भल्या कामाचे ‘स्मरणही कोणाला राहिले नाही.’ लवकरच लोकांना त्याचा विसर पडला. या गोष्टीचा शेवट करताना शलमोन राजाने म्हटले, “गरिबाची अक्कल लोक तुच्छ मानितात आणि त्याचे शब्द ऐकत नाहीत.”—उपदेशक ९:१४-१६.
आजही सर्वत्र हेच पाहायला मिळते. लोकांना जास्त करून अशाच लोकांची आठवण राहते ज्यांच्याकडे पैसा आहे, ऐश्वर्य आहे. पण, त्याच्या उलट एखाद्या गरिबाने कितीही मोठे काम केले तरी लोक अगदी सोयीस्करपणे त्याला विसरून जातात. येशूच्या बाबतीत असेच घडले. “तुच्छ मानिलेला, मनुष्यानी टाकिलेला, क्लेशांनी व्यापिलेला व व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष,” असे यशयाने त्याच्याविषयी म्हटले. (यशया ५३:३) येशूकडे धनदौलत नव्हती अथवा ऐश्वर्य नव्हते. त्यामुळे मोठमोठे धार्मिक नेते त्याला तुच्छ लेखायचे. पण, आजपर्यंत कुठल्याही मनुष्याकडे नसेल इतकी बुद्धी येशूकडे होती. धार्मिक नेत्यांच्या नजरेत येशू केवळ “सुताराचा पुत्र” होता. त्यामुळे एका सर्वसामान्य सुताराच्या मुलाकडे बुद्धी आणि चमत्कार करण्याची शक्ती कोठून आली ही गोष्ट समजण्यास त्यांना अत्यंत कठीण गेले. आणि हीच त्या धार्मिक नेत्यांची घोडचूक होती. कारण त्यांच्या “अविश्वासामुळे” येशूने त्यांच्या राहत्या क्षेत्रांत “फारशी अद्भुत कृत्ये केली नाहीत.” (मत्तय १३:५४-५८) त्या धार्मिक नेत्यांसाठी हे फार मोठे नुकसान होते.
लोकांना ओळखण्यात आपल्याकडूनही चूक होऊ शकते. त्यामुळे खबरदारी बाळगणे जरूरीचे आहे. ज्यांच्याकडे ईश्वरी बुद्धी होती अशा लोकांना ओळखता यावे म्हणून येशूने म्हटले, “ज्ञान [“बुद्धी,” NW] आपल्या कृत्याच्या योगे न्यायी ठरते.” देवाचे कार्य करणाऱ्यांना आणि इतरांना ईश्वरी बुद्धी देणाऱ्यांना कसे ओळखले जाऊ शकते? मोठा हुद्दा, पैसा किंवा ऐश्वर्य पाहून नव्हे तर ‘चांगल्या फळांवरून.’ कारण बायबलवर त्यांचा अढळ विश्वास असतो आणि त्यानुसार ते कार्य देखील करतात.—मत्तय ७:१८-२०; ११:१९.