एक खास प्रसंग—त्याला तुम्ही उपस्थित राहाल का?
ही घटना सुमारे ३,५०० वर्षांपूर्वीची आहे. इस्राएलांकरता तो दिवस अविस्मरणीय होता. इजिप्तमध्ये गुलामगिरीत असताना देवाने त्यांना म्हटले, की त्यांच्यातील प्रत्येक कुटुंबाने एका मेंढराचा आणि एका बकरीचा वध करून त्यांचे रक्त चिन्ह म्हणून दरवाजांच्या बाह्यांना व चौकटीच्या कपाळपट्टीला लावावे. ज्या दिवशी इस्राएलांनी असे केले त्याच रात्री, देवदूत आला आणि ज्यांच्या दरवाजावर चिन्ह नव्हते त्या इजिप्तच्या सर्व ज्येष्ठपुत्रांना त्याने ठार मारले. पण दरवाजावर रक्ताचे चिन्ह असलेल्या सर्व इस्राएल लोकांना त्या देवदूताने सोडून दिले. मग त्याच रात्री इस्राएल लोक इजिप्तच्या गुलामगिरीतून मुक्त झाले. या घटनेच्या स्मरणार्थ वल्हांडणाच्या सणाची स्थापना झाली व तेव्हापासून यहुदी लोक तो दिवस दरवर्षी साजरा करू लागले.
येशूने देखील हा सण साजरा केला. ज्या दिवशी त्याने आपल्या प्रेषितांसोबत अखेरचा वल्हांडणाचा सण साजरा केला, त्याच दिवशी त्याने एका नव्या सणाची सुरवात करून दिली. तो सण त्याच्या बलिदानाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्याने आपल्या प्रेषितांना बेखमीर भाकरी दिली आणि म्हटले: “घ्या, खा, हे माझे शरीर आहे.” मग त्याने द्राक्षारसाचा एक प्याला घेऊन म्हटले: “तुम्ही सर्व ह्यातून प्या. हे माझे नव्या कराराचे रक्त आहे हे पापांची क्षमा होण्यासाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.” येशूने असेही म्हटले: “माझ्या स्मरणार्थ हे करा.” (मत्तय २६:२६-२८; लूक २२:१९, २०) येथे येशूने आपल्या शिष्यांना आज्ञा दिली, की त्यांनी प्रत्येक वर्षी त्याच्या मृत्यूचा स्मारक दिन साजरा करावा.
या वर्षी येशूच्या मृत्यूचा स्मारक दिन एप्रिल १९, बुधवारी सूर्यास्तानंतर साजरा करण्यात येईल. ही संध्याकाळ संपूर्ण जगभरातील यहोवाच्या साक्षीदारांकरता विशेष असेल. या संध्याकाळी ते एकत्र जमतील आणि येशूने सांगितल्याप्रमाणे त्याच्या मृत्यूचा स्मारक दिवस साजरा करतील. हा दिवस कसा साजरा केला जातो हे पाहण्याकरता तुम्ही उपस्थित राहावे असे आम्ही तुम्हाला हार्दिक आमंत्रण देत आहोत. ही सभा केव्हा आणि कोठे आयोजित करण्यात आली आहे हे तुमच्या परिसरात राहणाऱ्या यहोवाच्या साक्षीदारांकडून माहीत करून घ्या.