न्यूयॉर्क सिटीतील त्या फलकाची तिला खूप आठवण येते
ब्रुकलिन, न्यूयॉर्कमध्ये वॉच टावर सोसायटीच्या फॅक्टरी बिल्डिंगवर १९५० पासून एक फलक लावण्यात आला आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांना, पर्यटकांना आणि इतर प्रवाशांना याद्वारे दररोज बायबलचे वाचन करण्याची आठवण करून दिली जाते. हा फलक किती परिणामकारक आहे हे दाखविणारे पत्र एका साक्षीदार मुलीने लिहिले.
“हायस्कूलच्या परीक्षेनंतर पुढे काय करण्याचा माझा विचार आहे, हे मी माझ्या वर्गमैत्रिणीला सांगत होते. मी तिला बेथेलविषयी, म्हणजेच यहोवाच्या साक्षीदारांच्या मुख्यालयाविषयी सांगायला सुरवात केली तेव्हा ती मोठ्या उत्सुकतेने माझे ऐकू लागली. आम्ही पूर्वी न्यूयॉर्क सिटीमध्ये राहायला होतो, असे तिने मला सांगितले. तिच्या कुटुंबामध्ये इतके धार्मिक वातावरण नव्हते, पण दररोज सकाळी ती आपल्या खिडकीतून बाहेर पाहायची तेव्हा तिला तो फलक दिसायचा ज्यावर लिहिले होते ‘देवाचे वचन, पवित्र बायबलचे दररोज वाचन करा.’ त्यामुळे ती शाळेत जाण्यापूर्वी दररोज बायबल वाचत असे.
“न्यूयॉर्क सिटी सोडल्यानंतर आता तिला दररोज सकाळी बायबल वाचनाची आठवण करून देणारा फलक दिसत नाही, त्या फलकाची तिला खूप आठवण येते. पण, न्यूयॉर्क सिटीमध्ये असताना तिने हा फलक पाहून दररोज बायबल वाचनाची स्वतःला सवय लावून घेतली होती त्यामुळे तिच्या दररोजच्या बायबल वाचनामध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडलेला नाही!”
देवाच्या वचनाचे वाचन करून दिवसाची सुरवात करणे यापेक्षा आणखी चांगली गोष्ट कोणती असू शकते! असे केल्यामुळे तुम्ही निश्चितच प्रेषित पौलाच्या पुढील शब्दांची कदर कराल: ‘पवित्र शास्त्र येशूमधील विश्वासाच्या द्वारे तुला तारणासाठी ज्ञानी करावयास समर्थ आहे.’—२ तीमथ्य ३:१५-१७.