मनुष्य—केवळ श्रेष्ठ प्राणी?
“जीवनाच्या उगमाविषयी प्रत्येकाचा जो विश्वास आहे त्यामुळे खरंच काही फरक पडतो का?”
असा प्रश्न ब्राझीलच्या एका १६ वर्षीय मुलीने, “प्राण्यांपेक्षा मनुष्य श्रेष्ठ आहे का?” या आपल्या भाषणाच्या सुरवातीला विचारला. तिच्या शिक्षिकेने, सदर विषयावरील जुन २२, १९९८ चा सावध राहा! अंक वाचून काढला होता आणि सबंध वर्गाला वरील प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी तिने या विद्यार्थिनीला सांगितले होते.
नैसर्गिक निवडीवर आधारित असलेली उत्क्रांतीवादाची शिकवणूक किती अनर्थकारी आहे हे या तरुणीने जोर देऊन सांगितले. उदाहरणार्थ, अनेकांच्या मते उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्तामुळेच काहींनी असे गृहित धरले आहे, की युद्ध हे अस्तित्वाच्या अखंड धडपडीचे केवळ एक नैसर्गिक अंग असून त्यामुळे हुकूमशाही किंवा नात्सी राजवटीच्या विकासासाठी मार्ग मोकळा होतो.
मनुष्य आणि प्राणी यांच्यात किती मोठी तफावत आहे हे तिने स्पष्ट करून सांगितले. ती म्हणाली: “आध्यात्मिकता ही केवळ मनुष्यामध्ये असते; केवळ मनुष्यच जीवनाचा अर्थ व उद्देश शोधण्याचा प्रयत्न करू शकतो; आपण येथे कोठून आलो हा प्रश्न केवळ मनुष्याला पडतो, सर्वकाळ जगण्याची इच्छा केवळ मनुष्यामध्ये असून त्यालाच फक्त मृत्यूची भीती वाटत असते. तेव्हा, आपण येथे कोठून आलो हे जाणून घेण्याकरता काही वेळ देणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
या विद्यार्थिनीने दिलेल्या या भाषणासाठी शिक्षिकेने तिला शाबासकी दिली. ही साक्षीदार मुलगी मोठ्या आवडीने वाचन करत असल्यामुळे तिला इतके सुंदर भाषण देता आले हे शिक्षिकेने कबूल केले. सावध राहा! आणि टेहळणी बुरूज मासिकांसारख्या बायबल आधारित प्रकाशनांचे उत्साहाने वाचन करणारी अशी ख्याती या मुलीने शाळेत मिळवली आहे.
उत्क्रांतीवादाच्या सिद्धान्तामुळे लोकांच्या मनावर किती विपरित परिणाम घडतो याची यहोवाच्या साक्षीदारांना मनस्वी काळजी वाटते. त्यामुळेच तर, या मुलीच्या मंडळीतील सर्व तरुण साक्षीदारांनी आपल्या शिक्षकांना आणि शाळकरी मित्रमैत्रिणींना जून २२, १९९८ चे सावध राहा! मासिक द्यावे असे उत्तेजन देण्यात आले होते. अशाप्रकारे शहरातल्या विविध शाळांमध्ये सुमारे २३० मासिकांचे वितरण करण्यात आले. विशेष म्हणजे, शाळेतल्या प्रमुख विज्ञान विभागाने सावध राहा! मासिकांची वर्गणी देखील केली.
होय, जीवनाच्या उगमाविषयी असलेल्या आपल्या विश्वासामुळे जरूर फरक पडतो. निर्माणकर्त्यावर विश्वास ठेवल्याने या तरुणीच्या आणि तिच्या मैत्रिणींच्या जीवनात किती मोठा फरक पडला हे त्यांनी दाखवून दिले.