यहोवा कोणत्या अर्थाने तुम्हाला स्मरणात ठेवील?
“हे माझ्या देवा, . . . माझे स्मरण ठेव,” अशी नहेम्याने अनेकदा देवाला कळकळून विनंती केली होती. (नहेम्या ५:१९, १३:१४, ३१) आज आपल्यावरही संकटप्रसंगे ओढवतात तेव्हा आपणही देवाचा धावा करतो. देवाने आपले स्मरण ठेवावे अशी त्याला कळकळीची विनंती करतो. हे अगदी साहजिक आहे.
परंतु, देवाने आपले स्मरण ठेवावे, अशी विनंती आपण करतो तेव्हा देवाकडून खरे तर कशाची अपेक्षा आपण करत असतो? देवाने केवळ आपले नाव लक्षात ठेवावे अशी अपेक्षा करतो का? निश्चितच नाही. तर त्यापेक्षा अधिक काही करावे अशी आपली अपेक्षा असते. हे जाणून घेण्यासाठी, येशूसोबत वधस्तंभांवर खिळण्यात आलेल्या गुन्हेगारांचा आपण विचार करू या. त्यांच्यापैकी एकाने येशूला अशी याचना केली: “आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा.” येशूने केवळ आपली तोंडओळख ठेवावी असे त्या गुन्हेगाराला नक्कीच वाटले नसावे; तर त्याच्या लेखी येशूने काहीतरी करावे—त्याचे पुनरुत्थान करावे असे त्याला वाटत होते. आपणही, संकटप्रसंगांतून जात असताना देवाचा धावा करतो, त्याने आपले स्मरण ठेवावे अशी त्याच्याकडे कळकळीची विनंती आपण करतो तेव्हा आपली देखील देवाकडून हीच अपेक्षा असते.—लूक २३:४२.
बायबलमध्ये, देव ‘स्मरणात ठेवतो किंवा आठवणीत ठेवतो,’ हा वाक्यांश आपल्याला पुष्कळ वेळा वाचायला मिळतो. त्याचा अर्थ देव सकारात्मक कार्य करतो असा होतो. उदाहरणार्थ, १५० दिवस संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली होती तेव्हा ‘देवाला नोहाची आठवण झाली आणि त्याने पृथ्वीवर वारा वाहविला तेव्हा पाणी ओसरू लागले.’ (उत्पत्ति ८:१) या घटनेच्या अनेक शतकांनंतर, फिलिस्टाईन लोकांनी शमशोनाचे डोळे फोडले आणि त्याला साखळदंडानी बांधून ठेवले तेव्हा त्याने देवाला अशी प्रार्थना केली: “परमेश्वरा [यहोवा], कृपया माझी आठवण कर. . . . फक्त ह्या वेळेस.” मग, देवाने कोणत्या अर्थाने त्याची आठवण केली? बायबलचा वृत्तान्त आपल्याला सांगतो, की देवाने त्याला अलौकिक सामर्थ्य देऊन त्याची आठवण केली आणि त्यामुळेच तो देवाच्या शत्रूंना धडा शिकवू शकला. (शास्ते १६:२८-३०) नहेम्याच्या बाबतीतही हेच घडले. यहोवाने त्याचे प्रयत्न आशीर्वादित करून त्याचे स्मरण केले आणि जेरुसलेममध्ये खऱ्या उपासनेची पुनःस्थापना झाली.
“धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रात पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले,” असे प्रेषित पौलाने सांगितले. (रोमकर १५:४) देवाच्या प्राचीन विश्वासू सेवकांप्रमाणे आपण देवाच्या इच्छेप्रमाणे वागून त्याचे स्मरण केल्यास आपल्याला याची पूर्ण खात्री मिळू शकते, की आपल्या दररोजच्या गरजा पुरवण्यात आपली मदत करण्याद्वारे, परीक्षाप्रसंगामध्ये आपल्याला आधार देण्याद्वारे आणि अधार्मिक लोकांवर न्यायदंड बजावला जाईल तेव्हा त्यातून आपला बचाव करण्याद्वारे यहोवा देखील आपले स्मरण करेल.—मत्तय ६:३३; २ पेत्र २:९.