तुफानी ‘वाऱ्याला तोंड द्यावे लागते’ तेव्हा
गालील समुद्र पार करत असताना येशूच्या शिष्यांना आलेल्या वास्तविक अनुभवाविषयी मार्क या शुभवर्तमानाच्या लेखकाने म्हटले: ‘शिष्य वल्ही मारता मारता हैराण झाले कारण वारा तोंडचा होता.’ किनाऱ्यावर असलेल्या येशूने शिष्यांची ही दैनावस्था पाहिली आणि त्यांच्याजवळ पोहंचण्याकरता तो समुद्रावरून चमत्कारीकरित्या चालत गेला. “तो त्यांच्याकडे मचव्यात चढून गेला” तेव्हा “वारा पडला,” असे मार्क पुढे म्हणतो. —मार्क ६:४८-५१.
याच मार्कने आधी एकदा एक “मोठे वादळ” आल्याचे सांगितले होते. तेव्हा येशूने “वाऱ्याला धमकाविले . . . मग वारा पडला व अगदी निवांत झाले.”—मार्क ४:३७-३९.
अशाप्रकारचे चमत्कारिक प्रसंग आज आपल्याला पाहायला मिळत नाहीत हे खरे आहे, पण भूतकाळात घडलेल्या अशा प्रसंगांतून आपण पुष्कळ काही शिकू शकतो. अपरिपूर्ण मनुष्य या नात्याने या कठीण काळात जगत असताना तुफानी वाऱ्यासमान येणाऱ्या विरोधाला आपल्याला बहुतेक वेळा तोंड द्यावे लागते. (२ तीमथ्य ३:१-५) काही वेळा तर, व्यक्तिगत समस्यांमुळे आपण इतके निराश होतो, की आपण जणू वादळात अडकले आहोत असे आपल्याला वाटते. पण अशा परिस्थितीतही आपल्याला सांत्वन मिळते! कारण येशू असे आमंत्रण देतो: “अहो कष्टी व भाराक्रांत जनहो, तुम्ही सर्व माझ्याकडे या म्हणजे मी तुम्हाला विसावा देईन.”—मत्तय ११:२८.
‘आपण वाऱ्याला तोंड देत आहोत,’ असे आपल्याला वाटते तेव्हा देखील आपण आपले मन “निवांत” ठेवू शकतो. हे कसे शक्य आहे? यहोवा देवाच्या अढळ अभिवचनांवर विश्वास ठेवण्याद्वारे.—पडताळा यशया ५५:९-११; फिलिप्पैकर ४:५-७.