जागतिक शांती—कशी येईल?
धर्म आणि शिक्षण यांचे जागतिकीकरण केल्यास शांती येईल का? हेच, संयुक्त राष्ट्र संघाचे माजी सहायक महा-सचिव आणि १९८९ सालच्या शांती शिक्षणाकरता असलेल्या युनेस्को पुरस्काराचे मानकरी डॉ. रॉबर्ट मलर यांचे स्वप्न आहे. द व्हँकूव्हर सन दैनिकाच्या वृत्तानुसार, डॉ. मलर यांना “खात्री आहे की, पृथ्वीग्रह, मानव धर्म आणि अहिंसा यांसंबंधीच्या तत्त्वांचे आणि मूल्यांचे सबंध जगातील सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत शिक्षण देणे अत्यावश्यक आहे.” ते अशा एका दिवसाची वाट पाहत आहेत जेव्हा जगाच्या पाठीवरील सर्व शैक्षणिक संस्था आपल्या मुलांना संयुक्त राष्ट्र संघच शांतीचा सर्वोत्तम स्रोत असल्याचे शिकवतील. सन दैनिकाच्या वृत्तानुसार त्यांच्या मते, “जगातल्या सर्व धर्मांनी संयुक्त राष्ट्र संघासारख्याच एका नव्या संस्थेचे अर्थात, संयुक्त धर्मसंघाचे सदस्य बनावे.” असे केल्यास, “सर्व धर्म अहिंसेला बढावा देऊ लागतील.”
जागतिक शांती खरेच कधी वास्तवात उतरेल का? निश्चितच! पण कोणत्याही मानवी माध्यमाने नाही. देवाच्या प्रेरणेने, २,७०० पेक्षा अधिक वर्षांपूर्वी एका लेखकाने शांतीचे शिक्षण देणाऱ्या एका श्रेष्ठ माध्यमाची ओळख करून दिली. त्याने असे भाकीत केले की सद्हृदयी लोक “परमेश्वरापासून [“यहोवा,” NW] शिक्षण पावतील” आणि त्यांना “मोठी” शांती प्राप्त होईल.—यशया ५४:१३.
बायबलनुसार, देव “शांतिदाता” आहे. (रोमकर १६:२०, मराठी कॉमन लँग्वेज) आजही, जागतिक स्तरावर एक अद्भुत शैक्षणिक कार्यक्रम सुरू आहे; यहोवा आपल्या लोकांना ‘शांतीच्या प्राप्तीसाठी झटण्याचे व तिचा मार्ग धरण्याचे,’ आणि ‘आपल्या तरवारी मोडून त्यांचे फाळ करण्याचे व आपल्या भाल्याच्या कोयत्या करण्याचे’ अर्थात ‘इतःपर युद्धकला न शिकण्याचे’ शिक्षण देत आहे.—१ पेत्र ३:११; यशया २:२-४.
सत्यावर आधारित असलेली, दांभिकपणा आणि कपट यांपासून मुक्त असणारी उपासना देवाला प्रिय आहे, आणि अशा उपासनेस तो आशीर्वादित करतो. (मत्तय १५:७-९; योहान ४:२३, २४) केवळ देवाच्या वचनावर आधारित असलेली खरी उपासना अशा लोकांना जन्म देऊ शकते जे शांती आणि एकतेने जगतात आणि ज्यांची एकमेकांवर निष्कपट प्रीती असते.—योहान १३:३५.
देवाचे वचन जागतिक शांतीविषयी काय सांगते याविषयी आणखीन जाणून घ्यायचे असल्यास आपण या नियतकालिकाच्या प्रकाशकांशी संपर्क साधावा अशी आम्ही आपणास विनंती करीत आहोत.