“तिथल्या शांतीमय वातावरणाचा मला अनुभव आला”
एक जर्मन भाषीय माणूस यहोवाच्या साक्षीदारांची “हेरगिरी” करण्यासाठी साक्षीदारांनी आयोजित केलेल्या एका अधिवेशनास गेला होता. हेरगिरी करण्याचा हेतू हा, की या “पंथाचे खरे स्वरूप जगासमोर आणणे आणि आपल्या मित्रांना मार्गभ्रष्ट होण्यापासून वाचवणे.” पण, अधिवेशनाला जाऊन आल्यानंतर त्याने आपल्या मित्रांना असे पत्र लिहिले:
“मी अधिवेशनाच्या ठिकाणी गेलो तेव्हा आपण चुकीच्या ठिकाणी तर आलो नाही ना, असा मला प्रश्न पडला. एकही माणूस बाहेर नव्हता; केरकचरा किंवा बियरचे कॅन्स तर सोधूनही सापडले नसते. मी आणखीन जवळ गेलो आणि स्टेडियमच्या प्रवेशद्वारापाशी मला दोन सभ्य गृहस्थ दिसले. त्यांनी माझं स्वागत केलं आणि मला आत जाऊ दिलं.
“तिथं हजारोंनी लोक आले असतील, सगळीकडे नुसता गोंगाट असेल असं मला आधी वाटलं होतं. पण घडलं उलटंच. सगळं काही अगदी शांत होतं. मग मी विचार केला, ‘कदाचित काही मोजकेच लोक आले असतील आणि तेही इकडंतिकडं विखुरलेले असतील त्यामुळे इतकं शांत शांत वाटतं.’
“मी आतमध्ये जाऊन बसलो आणि व्यासपीठावरील नाटकानं माझं लक्ष वेधून घेतलं. नंतर कुठं माझ्या लक्षात आलं, की तिथं हजारो लोक असून स्टेडियम अगदी खच्चून भरला होता. पण इतके लोक असूनही तिथं पूर्ण शांती जाणवत होती. त्यानंतरच्या भागातही मी स्वतः जे काही ऐकलं, पाहिलं आणि जाणवलं त्यामुळे मी खूप प्रभावित झालो.
“साक्षीदारांसोबत मिसळताना त्यांचा आनंद, त्यांचे आपुलकीचे बोल या गोष्टी माझ्या नजरेतून सुटल्या नाहीत. न राहून माझ्या तोंडून हे शब्द फुटले, ‘खरंच, ही देव माणसं आहेत!’”
‘मार्गभ्रष्ट होण्यापासून आपल्या मित्रांना वाचवण्याऐवजी’ या मनुष्याने त्यांना आपला बायबल अभ्यास घेण्यास सांगितलं. याचा परिणाम, आज हा मनुष्य ख्रिस्ती मंडळीत एक वडील म्हणून सेवा करत आहे. शिवाय, तो आणि त्याचं कुटुंब झूरिख, स्वित्झर्लंड येथील एका ख्रिस्ती मंडळीत आवेशाने सेवा करत आहेत.