“निःसंशये आदरास पात्र असणारे” कार्य
प्रेषित पौलाने त्याच्या सहख्रिश्चनांना असा बोध केला: “परराष्ट्रीयांत आपले आचरण चांगले ठेवा, ह्यासाठी की, ज्याविषयी ते तुम्हास दुष्कर्मी समजून तुम्हाविरुद्ध बोलतात त्याविषयी त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून समाचाराच्या दिवशी देवाचे गौरव करावे.” (१ पेत्र २:१२) इटलीमधील यहोवाच्या साक्षीदारांचे आचरण कित्येक वर्षांपासून प्रशंसनीय राहिले आहे. ‘धाब्यावरून प्रचार करा,’ या येशूच्या सूचनेच्या एकवाक्यतेत ते त्यांचे ख्रिस्तीकार्य सर्व लोकांसमक्ष खुलेपणाने करतात. (मत्तय १०:२७; योहान १८:२०) त्यामुळे, इटलीतील एका वकिलाने आणि पाळकाने अशी खोटी बातमी प्रकाशित केली, की यहोवाचे साक्षीदार “हा बनावटी पंथ” आहे आणि यहोवाचे साक्षीदार “लोकांची फसवणूक करणाऱ्या” “गुप्त संस्थांपैकी” आहेत; बदनामीच्या या आरोपांमुळे साक्षीदारांनी कायदेशीर कारवाई करण्याचे ठरवले.
न्यायालयाने पहिल्या चौकशीत निकाल जाहीर केला, की वकिलाने आणि पाळकाने कोणत्याही प्रकारच्या नियमाचा भंग केला नाही. परंतु जुलै १७, १९९७ रोजी वेनिस कोर्ट ऑफ अपील्सने पहिल्या न्यायालयाच्या निर्णयाला चुकीचे शाबीत केले आणि दोन्ही आरोपींना दोषी ठरवले. कोर्ट ऑफ अपील्सने म्हटले: “प्रकाशित झालेल्या दोन्ही लेखांमध्ये असे शब्दांश आणि वाक्यांश आहेत ज्यामुळे ‘यहोवाचे साक्षीदार’ नामक धर्माच्या अनुयायांची प्रतिमा निश्चितच डागाळली जाते. या धर्माच्या अनुयायांची सर्वांसमक्ष नालस्ती करण्याच्या उद्देशाने हे लेख लिहिण्यात आल्याचे स्पष्ट दिसून येते.” न्यायालयाने असे म्हटले, की या लेखांतील माहितीने “अहवाल देण्याच्या आणि टीका करण्याच्या कायदेशीर अधिकाराचा दुरुपयोग केला.” बदनामी करणाऱ्या या दोघांना न्यायालयाने दंड ठोठावला आणि त्यांना असा आदेश दिला, की साक्षीदारांच्या दोन्ही खटल्यांमध्ये झालेल्या खर्चासहित त्यांनी न्यायालयीन कारवाईचा संपूर्ण खर्च भरावा.
वेनिस कोर्ट ऑफ अपील्सने आपल्या लिखित निकालात असे म्हटले: “[इटलीच्या] राज्यघटनेने ज्या हक्कांची शाश्वती दिली आहे, ते हक्क समानतेने लागू करून त्यांचे रक्षण करून, असहिष्णुता आणि धर्मांध कृत्यांना पायबंद घालणे शक्य आहे.” या निकालातून हे स्पष्ट झाले, की यहोवाचे साक्षीदार हे गुप्त नाहीत आणि त्यांचा पंथ बनावट नाही. “यहोवाच्या साक्षीदारांना गुप्त संस्थेचा दर्जा देणे आजच्या वास्तविकतेशी विसंगत आहे कारण हा धर्म कित्येक शहरांमध्ये आहे आणि विशेषतः रविवार आणि इतर सुट्टींच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर या धर्माचे सदस्य सर्वज्ञात असलेले प्रचाराचे कार्य करतात; त्यांच्या शिकवणी कोणाला पटोत अथवा न पटोत, पण त्यांचे परिश्रम निःसंशये आदरास पात्र आहेत.” अशाप्रकारे, इटलीमधील यहोवाच्या साक्षीदारांचा आवेशी प्रचार आणि त्यांचे चांगले आचरण त्यांच्याविषयी लोकांच्या मनात असलेला पूर्वग्रह दूर करण्यास मदत झाली आहे.—मत्तय ५:१४-१६; १ पेत्र २:१५.