कनेक्टिकटचे सर्वोच्च न्यायालय रुग्णाच्या हक्कांचे समर्थन करते
एप्रिल १६, १९९६ रोजी कनेक्टिकट, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने, रक्त संक्रमण नाकारण्यासंबंधी असलेल्या यहोवाच्या साक्षीदारांच्या हक्काचे समर्थन केले. हा निर्णय, चौकशी न्यायालयाने यापूर्वी जाहीर केलेल्या न्याय निर्णयाच्या अगदी विपरीत होता.
ऑगस्ट १९९४ साली, नेली वेगा नामक यहोवाची साक्षीदार असलेल्या एका स्त्रीला, तिच्या पहिल्या अपत्याच्या जन्मानंतर अति रक्तस्राव होऊ लागला. तिचा रक्तस्राव थांबवण्याकरता केलेले सर्व प्रयत्न वाळूत पाणी ओतल्यासारखे निष्फळ ठरले. श्रीमती वेगा यांची स्थिती अत्यंत नाजूक झाली तेव्हा रक्त संक्रमण अधिकृत करणारा न्यायालयीन आदेश प्राप्त करण्यासाठी रुग्णालयाने खटाटोप केला. आपल्या रुग्णालयीन वास्तव्यादरम्यान रक्त अथवा रक्ताचे कोणतेही अनुजात तिच्या शरीरात संक्रमण करता कामा नये असे वैद्यकीय सुटका दस्तऐवजात सूचित करून श्रीमती वेगा यांनी आधीच त्यावर हस्ताक्षर केले होते; अशाप्रकारे, त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पुढे ओढवणाऱ्या परिणामांच्या जबाबदारीतून त्यांनी रुग्णालयास मुक्त केले. तथापि, रुग्णालयाने अशी कारणमिमांसा केली, की सक्तीने रक्त संक्रमण करणे म्हणजे नवजात बालकाच्या हितार्थ कार्य करण्यासारखे आहे ज्यास आपल्या आईची आत्यंतिक गरज होती. चौकशी न्यायालयास याचीही चिंता होती, की रक्त नुकसानाव्यतिरिक्त श्रीमती वेगा ह्या तशा तरुण, निरोगी होत्या. यास्तव, श्रीमती वेगा यांचे पती व वकील यांनी प्रतिरोध करूनही न्यायालयाने तसा आदेश दिला व संक्रमण करण्यात आले.
कालांतराने, हा खटला कनेक्टिकटच्या सर्वोच्च न्यायालयापुढे आणला गेला. तेथे, एकमतानिशी असे निर्णीत करण्यात आले होते, की रुग्णालयाने उचललेल्या या पावलामुळे श्रीमती वेगा यांच्या हक्कांचे उल्लंघन झाले होते. त्या न्याय निर्णयाने असे म्हटले: “चौकशी न्यायालयातील सुनावणी मध्यरात्री अर्थात कोणत्याही पक्षाला आपापली बाजू पूर्णपणे मांडण्यास वाव न देणाऱ्या अत्यंत निकडीच्या स्थितीत झाली होती.”
सर्वोच्च न्यायालयाचा हा न्याय निर्णय यहोवाच्या साक्षीदारांव्यतिरिक्त इतर लोकांकरता देखील महत्त्वपूर्ण आहे. श्रीमती वेगा यांचे वकील डोनाल्ड टी. रिडली म्हणतात: “आपल्या डॉक्टरांच्या निर्णयाशी कदाचित सहमत न होणाऱ्या सर्व रुग्णांसाठी तो महत्त्वपूर्ण आहे. हा न्याय निर्णय रुग्णाच्या मूल्यांची, मग ती धार्मिक असोत किंवा लौकिक असोत त्यांची गळचेपी करण्यास अटकाव करील.”