चमत्कारिक रोगमुक्ती आजही होते का?
“येशूला स्वीकारा आणि बरे व्हा!” अशा प्रकारच्या घोषवाक्यांमुळे इवॅन्जिलिकल चर्चचा एक सदस्य, ऑलिशान्ड्रे याला असे वाटू लागले, की त्याच्या आजारपणासाठी त्याने औषधे घेतली म्हणजे त्याच्यात विश्वासाची उणीव आहे. त्याचे अगदी ठाम मत झाले, की केवळ विश्वासानेच त्याची चमत्कारिक रोगमुक्ती होणार होती. बेनडिटा नामक एक उत्साही कॅथलिक, ब्राझीलच्या साउ पाउलू राज्यातील अपारेसीडा ड नॉर्टच्या देवळात रोगमुक्तीचे चमत्कार होतात असे ऐकले तेव्हा ती अगदी भारावून गेली. तिच्या मावशीने तिला शिकवलेले मंत्र उच्चारून बेनडिटा आर लेडी ऑफ अपारेसीडा, सेंट ॲन्थनी आणि इतर “संतांना,” रोग्यांना बरे करण्याची शक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करीत असे.
स्पष्टपणे, या २० या शतकातही अनेक लोकांचा चमत्कारिक रोगमुक्तीवर विश्वास आहे—पण का? कदाचित, काहींची निराशा झालेली असते कारण डॉक्टर त्यांच्या प्रियजनांना विशेषतः त्यांच्या मुलांना आजारपण, दुःख आणि यातना यांपासून मुक्त करू शकलेले नसतात. असाध्य रोगाने पीडित असलेल्यांना वाटेल, की महागडी आधुनिक औषधे पाहू जाता फेथ हिलिंग अपायकारक नाही. काहीजण टीव्हीवर विविध चर्च सदस्यांना व इतर लोकांना, एड्स, तणाव, कॅन्सर, चित्तविकृती, उच्च रक्तदाब आणि इतर अनेक रोगांवर उपाय सांगताना बघतात. अशा दाव्यांवर विश्वास असला किंवा नसला तरी ते त्यांच्याकडे शेवटला उपाय म्हणून वळतील. परंतु, ज्यांचा असा विश्वास असतो की त्यांचे आजारपण दुष्ट आत्म्यांमुळे आहे त्यांना असे वाटू शकेल, की प्रचलित औषधात त्यांना साहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही.
दुसऱ्या बाजूला पाहता, असेही काही लोक आहेत जे मृत ‘संतांच्या’ नावाने किंवा जिवंत वैद्यांद्वारे केल्या जाणाऱ्या चमत्कारिक रोगमुक्तीच्या कल्पनेचा कट्टर विरोध करतात किंवा धिक्कारही करतात. जर्नल डा टार्डे नुसार, प्रतिक्षमताशास्त्रज्ञ ड्रॉयुस्यू वॉरेला यांना वाटते, की चमत्कारिक रोगमुक्तीवरील श्रद्धेमुळे “भोळ्या-भाबड्या व गरजू लोकांची निराशा होते.” ते पुढे म्हणतात: “चमत्कारांवर आशा ठेवून कदाचित अनेक जण या फसव्या लोकांमुळे गंभीर वैद्यकीय उपचार घेणार नाहीत.” तसेच द न्यू एन्सायक्लोपिडीआ ब्रिटानिका म्हणतो: “गत काळातील अप्रचलित रोगमुक्तीचा पवित्र ठिकाणांशी व धार्मिक विधींशी संबंध जोडला जातो आणि वैद्यकीय विज्ञान अशा प्रकारच्या सर्व रोगमुक्तीचा संबंध, अनुकूल परिस्थितीत कार्य करणाऱ्या संमोहनावस्थेत सूचना देण्याच्या सामान्य क्रियेशी जोडण्यास प्रवृत्त होते.” तरीसुद्धा, असे अनेक लोक आहेत जे असा विश्वास करतात, की त्यांना खरे तर चमत्कारानेच बरे केले होते. त्यांच्याबाबतीत रोगमुक्ती प्रभावकारी ठरली!
येशू ख्रिस्ताने बहुत प्रसंगी ‘देवाच्या महान सामर्थ्याद्वारे’ रोग्यांना बरे केले होते याची बायबलशी परिचित असलेल्यांना जाणीव आहे. (लूक ९:४२, ४३) यास्तव, त्यांच्यासमोर कदाचित असा प्रश्न पडला असेल, की ‘देवाचे सामर्थ्य आजही कार्य करून चमत्कारिक रोगमुक्ती घडवून आणीत आहे का?’ असल्यास, बरे करण्याकरता केलेले प्रयत्न वचन दिल्याप्रमाणे परिणाम घडवून आणण्यात अपयशी का ठरतात? रुग्णामध्ये पुरेसा विश्वास नसतो म्हणून की त्याने गडगंच वर्गणी दिलेली नसते म्हणून? एखाद्या ख्रिश्चनाने, त्याला यातनामय आजार किंवा दुर्धर आजार असेल तर चमत्कारिक रोगमुक्तीकडे वळणे उचित आहे का? शिवाय, येशूने ज्या प्रकारची खरी चमत्कारिक रोगमुक्ती केली तशी पुन्हा कधी घडेल का? पुढील लेखात तुम्हाला या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आढळतील.