विशेषज्ञांद्वारे रक्ताच्या विकल्पांवर विचार
सबंध संयुक्त संस्थानांतून जवळजवळ २०० विशेषज्ञ, शनिवार, ऑक्टोबर ७, १९९५ रोजी क्लीवलँड, ओहायो येथे वैद्यकीय क्षेत्रातील वाढत्या कुतूहलाच्या विषयावर चर्चा करण्यास एकत्रित झाले, तो विषय म्हणजे: रक्तविरहित औषधोपचार व शस्त्रक्रिया.
निरनिराळ्या गुंतागुंतीच्या परिस्थितींवर चर्चा करण्यात आली. उदाहरणार्थ, रोगी तीव्र स्वरूपाच्या रक्तक्षयाने पीडित असल्यास काय करावे? अतिशय अकाली जन्मास आलेल्या नवजात शिशुवर रक्ताविना कशाप्रकारे उपचार करता येतो? संक्रमण न करता हृदयशस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पाडता येते का? मनोवेधक बाब अशी, की शरीरास स्वतःचा रक्त पुरवठा विकसित करण्यास मदत करणाऱ्या तंत्रांचा वापर करून रक्तविरहित शस्त्रक्रिया, उल्लेखण्यात आलेल्या या सर्व परिस्थितींत चांगल्या परिणामांसहित याआधीच कृतीत आणण्यात आली आहे.a
रक्त संक्रमणांवर विकल्पांची गरज का भासली आहे? क्लीवलँड येथील सेंट व्हिन्सेंट चॅरिटी हॉस्पिटलमधील रक्तविरहित औषधोपचार व शस्त्रक्रिया केंद्राच्या संचालिका शॅरन वर्नन म्हणतात, “रक्त संक्रमणांद्वारे अनेक रोगांचा, विशेषतः हेपॅटायटिसचा संसर्ग होतो असे आम्हाला आढळले आहे.” त्या पुढे म्हणतात: “रक्ताद्वारे एखाद्या रोगाचा संसर्ग झाला नाही तरीसुद्धा, त्याद्वारे रोग्याचा प्रतिबंधक प्रतिसाद कमी होतो.” रक्ताचे स्क्रिनींग करण्याद्वारे एडस्चा प्रादुर्भाव घटवण्यात आला असला तरीदेखील, अशाप्रकारच्या चाचण्यांकरवी दिसून येणार नाहीत असे अजूनही अनेक रोग आहेत. शिवाय, रक्तविरहित शस्त्रक्रियांना अधिक तयारीची गरज असली तरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या त्या इस्पितळांना फायद्याच्याच आहेत; कारण रोग्यांना दूषित रक्त दिल्यास उद्भवू शकतील, अशा सर्व कायदेविषयक समस्या त्यांद्वारे नाहिशा होतात.
रक्त न घेण्यासंबंधाने यहोवाच्या साक्षीदारांचे कारण याहूनही अधिक महत्त्वाचे आहे: देवाचा नियम त्याची मनाई करतो. (प्रेषितांची कृत्ये १५:२९) तथापि, त्यांना होताहोईल तितका सर्वोत्तम वैद्यकीय उपचार हवा असतो. याच कारणास्तव, रक्ताविना वैद्यकीय उपचाराविषयी संशोधन कार्यात पुढाकार घेत असलेल्या डॉक्टरांसोबत त्यांनी सहकार्य केले आहे. यामुळे केवळ यहोवाच्या साक्षीदारांनाच नव्हे तर रक्त संक्रमणांच्या धोक्यांबद्दल चिंताकुल असणाऱ्या इतर अनेकांनाही फायदे प्राप्त होतात.
[तळटीपा]
a सावध राहा! (इंग्रजी) च्या नोव्हेंबर २२, १९९३ अंकातील पृष्ठे २४-७, व जानेवारी २२, १९९६ अंकातील पृष्ठ ३१ पाहा.