त्याला विश्वासाने कार्य करण्यास प्रवृत्त केले
यहोवाने मोशेवर इस्राएल राष्ट्रास इजिप्तच्या दास्यत्वातून बाहेर आणण्याची कामगिरी सोपविली तेव्हा त्याने सुरवातीस असे म्हणून विनंती केली: “हे प्रभू [यहोवा, NW], मी बोलका नाही; पूर्वीहि नव्हतो, व तू आपल्या दासापाशी बोललास तेव्हापासूनहि नाही; मी तर मुखाचा जड व जिभेचाही जड आहे.” (निर्गम ४:१०) होय, या मोठ्या नियुक्तीसाठी आपण सक्षम आहोत, असे मोशेला वाटले नाही.
त्याचप्रमाणे आजही, अनेकवेळा यहोवाच्या अनेक सेवकांना, देण्यात आलेल्या जबाबदाऱ्यांना पूर्ण करण्यास आपण अक्षम आहोत असे वाटते. उदाहरणार्थ, थियाडोर नामक एक ख्रिस्ती पर्यवेक्षक सांगतात: “यहोवा मला ज्या काही गोष्टी करण्यास सांगतो त्यांमध्ये क्षेत्र सेवा सर्वात कठीण आहे. मी लहान होतो तेव्हा मी घाईने दरवाजाकडे जात असे, दरवाजावरील बेल वाजविण्याचा बहाणा करीत असे आणि शांतपणे तेथून निघून जात असे; माझी चाहूल कोणास लागली नाहीतर किंवा मला कोणी पाहिले नाहीतर बरे होईल, असे मला वाटत होते. मी मोठा झाल्यानंतर असे करण्याचे थांबविले, परंतु दारोदारी जाण्याच्या विचाराने मी शारीरिकरीत्या अस्वस्थ होतो. सेवाकार्यासाठी बाहेर जाण्याआधी मला अजूनही अस्वस्थ वाटते, परंतु मी जातो.”
अशा भयांना तोंड देण्यास मोशे आणि आधुनिक दिवसांतील थियाडोर सारख्या साक्षीदारांना कशामुळे शक्य झाले आहे? बायबल याचे उत्तर देते: “त्याने [मोशेने] . . . विश्वासाने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.”—इब्रीयांस ११:२७.
खरोखरच, यहोवावर विश्वास ठेवल्यामुळे मोशेला त्याच्या अक्षमपणाच्या भावनांवर मात करण्यास आणि न्यायाधीश, संदेष्टा, राष्ट्रीय नेता, नियमशास्त्राच्या कराराचा मध्यस्थ, सेनाधीश, इतिहासकार आणि बायबल लेखक या नियुक्त जबाबदाऱ्या पार पाडणे शक्य झाले.
त्याचप्रमाणे, मोशेसारखा आपला विश्वास असतो तेव्हा ‘अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखे’ आपण वाटचाल करू. अशा विश्वासामुळे धैर्यास प्रेरणा मिळते ज्यामुळे आपल्याला अक्षम आहोत असे वाटत असले तरी देखील ख्रिस्ती जबाबदाऱ्यांना खांद्यावर घेण्यास आपल्याला शक्य होते.