भय—मित्र की शत्रू?
“मला मरण कसे यावे याचा मी विचार करते. मला गोळी लागू नये असे वाटते, पण जर लागलीच तर ती थेट माझ्या डोक्यात लागावी म्हणजे मी जागीच मरण पावेन.”
हे शब्द, लॉस ॲन्जेलेस टाईम्स वृत्तपत्राच्या वार्ताहाराने एका १४ वर्षीय मुलीकडून ऐकले. प्रौढ आणि इतर युवकांची हत्या करणाऱ्या तरुणांविषयी—अलीकडे होत असलेल्या हत्यांविषयी तो विद्यार्थ्यांची मुलाखत घेत होता. अहवालाचे शीर्षक होते: “भयग्रस्त जग.”
पुष्कळ जण भयग्रस्त जगात जगत आहेत याची तुम्हाला पूर्णपणे जाणीव आहे. कशाचे भय? कोणत्याही एका विशिष्ट भयाबद्दल सांगणे अतिशय कठीण असू शकेल. तुमच्या मित्रांना किंवा तुमच्या क्षेत्रातील लोकांना कोणत्या गोष्टींचे भय आहे हे सोबत दिलेल्या चौकोनात तुम्हाला सापडते का ते पाहा. हा चौकोन नोव्हेंबर २२, १९९३ च्या न्यूजवीक मधील आहे आणि त्यामध्ये “१० व १७ वयोगटांतील ७५८ मुलांचा त्यांच्या पालकांसोबत” घेतलेल्या सर्वेक्षणाचा निष्कर्ष दाखवला आहे.
त्या युवकांची मुलाखत आता घेतली तर ते कदाचित भयासाठी आणखी कारणे सांगतील, जसे की भूकंपाचे भय. जानेवारी १९९४ मध्ये लॉस ॲन्जेलेस येथे झालेल्या भीषण भूकंपानंतर, टाईमने अहवाल दिला: “आघातानंतरच्या तणाव विकृतीच्या लक्षणांपैकी, अनियंत्रित पूर्वदृश्ये, दुःस्वप्ने, जागरूकता आणि एखाद्याच्या जीवनावरील संयमाच्या उणिवेबद्दल राग ही आहेत.” भूकंप झालेल्या क्षेत्रातून दुसरीकडे जाण्याचा विचार एका व्यापाऱ्याने केला होता तो म्हणाला: “येथे जी हानी झाली आहे ती इतकी काही खास नाही. पण सगळीकडे भीती आहे. तुम्ही पायातील शू न काढताच तळमजल्यावर झोपता. पण तुम्हाला झोप लागत नाही. दर रात्री तो भूकंप होईल असा विचार करून तुम्ही तेथे बसून राहता. हे खरेच खूप वाईट आहे.”
एप्रिल ११, १९९५ रोजी टोकियोतून आलेल्या बातमीला असे शीर्षक देण्यात आले, “लागोपाठ विपत्तींमुळे जपानी अस्वस्थ स्थितीत” असे होते. ती बातमी अशी होती: “विषारी वायुचा हल्ला . . . खासकरून जपानी मनाला एक गंभीर धक्का होता कारण हा हल्ला घटनांच्या शृंखलेचा एक भाग म्हणूनच आला व त्याने भवितव्याबद्दलच्या सामूहिक मूलभूत नव्या अनिश्चितता निर्माण केल्या. . . . एकेकाळी रात्रंदिवस सुरक्षिततेसाठी प्रसिद्ध असलेल्या रस्त्यांवर आता लोकांना सुरक्षित वाटत नाही.” वृद्धांनाच भीती आहे असे नाही. “[सेजो विद्यापीठाचे] प्राध्यापक इशीकॉवॉ म्हणाले, की भवितव्यामध्ये त्यांच्यासाठी काय राखून ठेवले आहे याची त्यांना अनेकदा स्पष्ट समज नसते या कारणामुळे विशेषतः तरुण लोकांमध्ये चिंता तीव्रपणे होती.”
पुरावा हे सुचवतो, की “भारावून टाकणाऱ्या भयाचा एखादा प्रसंग, मेंदूच्या रसायनशास्त्रात फेरफार करू शकतो ज्यामुळे लोक अनेक शतकांनंतरही ॲड्रनलाईनच्या उसळीमुळे अधिक संवेदनशील होतात.” वैज्ञानिक, एखाद्या भीतीदायक प्रसंगाचा मेंदू अर्थ कसा लावतो, म्हणजेच आपण कशा प्रकारे भीतीची पारख करून त्याला प्रतिसाद देतो ते समजण्याचा प्रयत्न करीत आहेत. प्राध्यापक जोसफ लीड्यू यांनी लिहिले: “एखादी परिस्थिती एका प्राण्याला भीतीविषयी शिकण्यास लावते अशा तंत्रिकी पथांचा शोध लावून आपण या प्रकारच्या स्मरणशक्तीच्या सर्वसामान्य रचनेला स्पष्ट करण्याची आशा धरतो.”
परंतु आपल्यातील बहुतेक जणांना रासायनिक किंवा चेता आधारित भीतीबद्दल इतकी आस्था नाही. आपण इतके भयभीत का आहोत? आपण कसा प्रतिसाद दिला पाहिजे? योग्य भय आहे का? या प्रश्नांमध्ये आपण खरोखरीच खास आस्था दाखवू.
काही वेळा भय तुम्हाला मदत करते याजशी तुम्ही कदाचित सहमत असाल. उदाहरणार्थ, अंधार होत असताना तुम्ही घरी परतता. तुम्ही दार चांगल्याप्रकारे बंद केले होते पण तुम्ही पाहता, की तुमच्या घराचे दार सताड उघडे आहे. तुम्ही खिडकीतून पाहता, तो तुम्हाला हलणाऱ्या सावल्या दिसल्याचा भास होतो. नक्कीच काहीतरी भानगड आहे याची जाणीव होऊन तुम्ही शहारता. घरामध्ये कदाचित चोर किंवा हातात चाकू असलेला घुसखोर असावा.
अशा प्रसंगांचे तुमचे उपजत भय, एखाद्या घातक परिस्थितीत बिनधास्त चालत जाण्यापासून तुमचे संरक्षण करू शकेल. भय, तुम्हाला सावधगिरी बाळगण्यास किंवा एखाद्या संभाव्य हानीला तोंड देण्याआधी साहाय्य मिळवण्यास मदत करू शकते. अशी अनेक उदाहरणे आहेत: उच्च दाबाचा संकेत करणारी खूण; तुमच्या क्षेत्रात काही वेळेतच येणार असलेल्या वादळाबद्दलची रेडिओवरील घोषणा; वर्दळीच्या रस्त्यावरून कार चालवताना तुमच्या कारचा तो कर्कश यांत्रिक आवाज.
काही बाबतींमध्ये भयाची जाणीव खरोखरीच एका मित्रासमान असू शकते. ते आपल्याला स्वतःचे संरक्षण करण्यास किंवा सुज्ञतेने वागण्यास मदत करू शकते. परंतु, कायमचे किंवा तीव्र स्वरूपाचे भय वास्तविक मित्र नाही हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे. ते शत्रू आहे. अशा प्रकारच्या भयामुळे धाप, छातीत धडधडणे, बेशुद्धी, थरकाप, मळमळ आणि एखाद्याच्या परिसरापासून अलिप्त झाल्याची भावना उत्पन्न होऊ शकते.
पृथ्वीवरील भयजनक विकास आणि तीव्र भय ही आपल्याला काळाची गुणलक्षणे असल्याचे बायबलने विशेष वर्णन केले हे जाणणे तुम्हाला आस्थेचे वाटेल. पण ते कसे व त्याचा तुमच्या जीवनावर आणि विचारसरणीवर कसा प्रभाव पडला पाहिजे? तसेच, असे का म्हटले जाऊ शकते की बायबलच्या दृष्टिकोनातून एक नित्य भय आहे जे खासकरून मदतकारक आणि चांगले आहे? चला पाहू या.
[३ पानांवरील चौकट]
प्रौढांना, मुलांना व त्यांच्या कुटुंबांना सर्वात जास्त चिंता कशाची लागली हे विचारल्यावर ते म्हणाले, की त्यांना पुढील गोष्टींचे भय वाटते:
मुले पालक
५६% कौटुंबिक सदस्याविरुद्ध हिंसात्मक गुन्हा ७३%
५३% एका प्रौढाची नोकरी गमावण्याचे भय ६०%
४३% अन्नासाठी पैसे खर्चण्यास परवडत नाही ४७%
५१% डॉक्टरसाठी पैसे खर्चण्यास परवडत नाही ६१%
४७% निवाऱ्यासाठी पैसे खर्चण्यास परवडत नाही ५०%
३८% मादक पदार्थाची समस्या असणारा कौटुंबिक सदस्य ५७%
३८% त्यांचे कुटुंब एकत्र राहणार नाही ३३%
उगम: न्यूजवीक, नोव्हेंबर २२, १९९३