काळ बदलला आहे
प्राचीन इस्राएलात विश्वासू शलमोन राजाच्या वैभवी कारकीर्दित जगणे केवढ्या आनंदाचे वाटले असते बरे! ते युग शांती, समृद्धी व आनंदाचे होते. शलमोन खऱ्या भक्तीकरता दृढ राहिला त्या काळी यहोवाने त्या राष्ट्राला समृद्धपणे आशीर्वाद दिला. देवाने शलमोन राजाला केवळ अमाप संपत्तीच नव्हे तर, धार्मिकता व प्रेमाने राज्य करता यावे म्हणून “बुद्धिमान व विवेकी चित्त” देखील दिले. (१ राजे ३:१२) बायबल म्हणते: “देवाने शलमोनाच्या ठायी शहाणपण ठेविले होते ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरले राजे त्याच्या दर्शनास येत.”—२ इतिहास ९:२३.
यहोवाने लोकांना सुरक्षितता, शांती व चांगल्या गोष्टींची सुबत्ता दिली. देवाचे वचन म्हणते: “यहूदा व इस्राएल हे समुद्रकिनाऱ्याच्या वाळूप्रमाणे संख्येने बहुत असत; ते खाऊनपिऊन चैनीत असत.” लोक खरोखर व लाक्षणिकपणे “आपआपली द्राक्षलता व अंजीर वृक्ष ह्यांच्याखाली शलमोनाच्या सर्व कारकीर्दित निर्भय राहत होते.”—१ राजे ४:२०, २५.
पण काळ बदलला आहे. पूर्वीच्या त्या आनंदी काळापेक्षा आजचे जीवन खूपच वेगळे आहे. शलमोनाच्या काळी नव्हती ती गरिबी आज प्रमुख समस्या बनली आहे. धनाढ्य राष्ट्रांमध्ये देखील गरिबी आहे. उदाहरणार्थ, अमेरिका तसेच युरोपियन संघराज्यात निदान १५ टक्के तरी लोक गरिबीत राहतात, असे संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रमाने निरीक्षिले आहे.
युनिसेफने (संयुक्त राष्ट्रे मुलांचा निधी) तयार केलेला एक अहवाल, जगातील मुलांची स्थिती १९९४, जगातील एक पंचमांश लोक अक्षरश: गरिबीत राहत असल्याचे सांगून जगातील बहुतेक गरीब लोकांचे जीवन “अधिकाधिक कठीण व त्रस्त बनत आहे” अशा प्रकाराने जगाचे एकंदर चित्र देतो.
काही देशांत गगनाला भिडणारी महागाई गरिबांच्या अडचणींमध्ये अधिकच भर टाकते. आफ्रिकी देशातील एका स्त्रीने म्हटले: “तुम्ही बाजारात एखादी वस्तू बघता व म्हणता, ‘ठीक आहे, मी घरी जाऊन पैसे घेऊन येतो.’ तुम्ही तासाभरात परत येता आणि तुम्हाला ती वस्तू मिळू शकत नाही, कारण इतक्यातच तिची किंमत वाढली आहे असे तुम्हाला सांगण्यात येते. आता कोणाला काय करता येईल? हे फारच निराशाजनक आहे.”
तेथील दुसरी एक स्त्री म्हणाली: ‘जिवंत राहावे म्हणून आम्ही अन्नाशिवाय इतर गोष्टींचा विचार सोडून देतो. अन्न कसे मिळवावे हीच आमची चिंतेची बाब राहिली आहे.’
संयुक्त राष्ट्रसंघाच्या मते भवितव्य अंधकारमय दिसते. उदाहरणार्थ, सध्याच्या लोकसंख्येचे प्रमाण असेच राहिले तर “व्यक्तीच्या जीवनमानात जगभर गरीब लोकांची संख्या चौप्पट होईल,” असा युनिसेफने अंदाज व्यक्त केला.
अशा प्रकारे आर्थिक व सामाजिक स्थिती वाईट होत चालली असली तरी देवाच्या सेवकांना आशावादी असण्याचे कारण आहे. भवितव्याकडे वाढत्या नैराश्येने पाहणाऱ्या लोकांत देवाचे सेवक राहतात तरी ते भवितव्याकडे आनंद व आत्मविश्वासाने पाहतात. याच्या कारणांचा उलगडा आपल्याला पुढील लेख करील.