“समजूतदारपणाच्या सीमेपलीकडे”
“मानवांच्या मनातच युद्धाची सुरवात होत असल्यामुळे, आपल्याला त्यांच्या मनातच शांतीचे तट उभे केले पाहिजेत.” (युएन शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेची सनद) हे वाक्य लक्षात ठेवून, निःशस्त्रीकरण परिषदेत उपस्थित असलेल्या सुमारे ५०० पेक्षा अधिक तज्ज्ञांनी अशा प्रकारचे तट बांधण्याकरता धर्माच्या भूमिकेवर विचार केला.
लॉयर्स अलायन्स फॉर वर्ल्ड सेक्यॉरिटीचे प्रतिनिधीत्व करणारे जॉनथन ग्रॅनॉफ हे परिषदेचे नियामक होते. त्यांनी अशी नोंद केली: “सध्याच्या धार्मिक आणि जातीय झगड्यांची मर्यादा, सुसंस्कृत वर्तनाच्या सीमेपलीकडे कदाचित समजूतदारपणाच्याही सीमेपलीकडे आहे.” परिषदेच्या दरम्यान, “सर्व युद्धे आणि नैसर्गिक विपत्तींमध्ये ठार झालेल्या लोकांच्या संख्येपेक्षा, धर्माच्या नावाखाली ठार झालेल्या लोकांची संख्या जास्त आहे” हे जॉन केनथ गॅलब्रथ यांचे शब्द योग्यपणे उद्धृत करण्यात आले.
डॉ. शेशागिरी राव म्हणाले: “डॉक्टरांना रोग बरे करायचे असतात, फैलावयाचे नसतात. त्याप्रमाणे धार्मिक परंपरांनी, एकमेकांविरुद्ध द्वेष आणि हिंसात्मक झगडे फैलावयाचे नाहीत. त्या समेट करण्याचे बळ असल्या पाहिजेत. परंतु, वास्तविकतेत त्या विभाजक बळ म्हणूनच बहुधा कार्य करीत आल्या आहेत व अजूनही करीत आहेत.”
काही वर्षांआधी लंडनच्या कॅथलिक हेराल्ड या वृत्तपत्राने, “आजच्या चर्चनी युद्धाला संयुक्तपणे धिक्कारल्याची घोषणा केली तर” शांतीची खात्री मिळू शकेल असे विवेचन मांडले. परंतु, “असे कधीच होणार नाही हे आम्हाला माहीत आहे” असे या वृत्तपत्राने पुढे म्हटले. “यहोवाच्या साक्षीदारांप्रमाणेच . . . सर्वांनी हातात शस्त्रे न घेण्याचा दृढनिश्चय अचानकपणे केला तर हे जग किती वेगळे होईल!” असे एक कॅथलिक नन एकदा म्हणाली होती.