न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन एका विद्वानाला प्रभावीत करते
ग्रीक वाङ्मयाचे विद्वान डॉ. रेकल टेन कॉट यांच्यानुसार डच बायबल अनुवाद विशिष्ट शब्दांचा अचूक अर्थ देत नाही. उदाहरणार्थ, लूकच्या दुसऱ्या अध्यायात, येशू जसजसा मोठा होत गेला त्याबद्दलच्या लागोपाठ टप्प्यांचे वर्णन करण्यासाठी वापरण्यात आलेले तीन वेगवेगळे ग्रीक शब्द (ब्रेʹफोस, पे·डिʹयन आणि पेयस) आपल्याला आढळून येतील. या प्रत्येक शब्दात भिन्नतेची छटा आहे. परंतु अनेक बायबलमध्ये दोन किंवा तिन्ही शब्दांचा “मूल” असा अस्पष्ट अनुवाद केला आहे. मग योग्य अनुवाद कोणता?
डॉ. टेन कॉट स्पष्टीकरण देतात, की १२ वचनातील ग्रीक शब्द ब्रेʹफोसचा अर्थ, “नव्याने जन्मलेले, किंवा बाळ असा होतो.” २७ वचनातील पे·डिʹयनचा अर्थ, “लहान मुलगा किंवा लेकरू,” आणि ४३ वचनात सापडणारा पेयसचा अनुवाद “मुलगा” असा केला पाहिजे. बेबल एन वेटन्शॉपच्या (बायबल आणि विज्ञान) मार्च १९९३ या अंकात डॉ. टेन कॉट यांनी लिहिले: “माझ्या माहितीप्रमाणे, एकाही डच अनुवादाने याचा पाहिजे तसा अर्थ दिला नाही, म्हणजे ते मूळ भागाशी पूर्णपणे सुसंगत नाही.”
नंतर डॉ. टेन कॉट यांना १२ भाषांमध्ये तसेच उपलब्ध असणारे डचमध्येही न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिपचर्स दाखवण्यात आले. त्यांची प्रतिक्रिया? ते म्हणाले, “ब्रेʹफोस, पे·डिʹयन आणि पेयस या तीन ग्रीक शब्दांचा वेगवेगळा अर्थ योग्यप्रकारे विचारात घेणारे एक डच बायबल आहे हे पाहून मला आश्चर्य वाटते.” न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन या वचनांचा मूळ ग्रीक भागाच्या सुसंगतीत अनुवाद करते का? “पूर्णपणे एकवाक्यतेत,” असे डॉ. टेन कॉट म्हणतात.