राज्य घोषकांचा वृत्तांत
यहोवा त्याच्या शत्रूंपेक्षा सामर्थ्यवान आहे
दियाबल आणि त्याच्या दुरात्म्यांनी, खोटा धर्म व भुताटकीद्वारे सुवार्तेच्या प्रचारात आडकाठी आणण्याचा प्रयत्न फार काळापासून केला आहे. बायबल सैतानाच्या दुष्ट हेतूविषयी २ करिंथकर ४:४ मध्ये म्हणते की “विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये.”
परंतु यहोवा देव सैतानापेक्षा सामर्थ्यशाली आहे. “सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानाप्रत पोहंचावे” या त्याच्या ईश्वरी इच्छेच्या साध्यतेला थांबवण्यासाठी यहोवाचे शत्रू काहीच करू शकत नाहीत. (१ तीमथ्य २:४) ऑस्ट्रेलियातील राज्य घोषकांचा पुढील अहवाल हे ठळकपणे मांडतो.
▫ एक स्त्री २० वर्षांसाठी धर्मापासून परावृत्त राहिल्यावर बायबल पुन्हा वाचू लागली. बायबलमध्ये तिची आस्था पुन्हा जागृत झाल्यामुळे तिचे अनेक प्रश्न होते, यास्तव त्या प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी मदत मिळावी म्हणून तिने देवाकडे प्रार्थना केली. तिला सत्य शोधून काढायचे होते, परंतु तिला माहीत होते की तिच्या जुन्या धर्माकडे पुन्हा गेल्याने तिच्या समस्यांचे निरसन होणार नाही. याऐवजी, ती जुनी पुस्तके जेथे विकली जातात त्या दुकानात गेली व धर्माबद्दल काही पुस्तके आहेत का असे विचारले.
ज्या बाईचे ते दुकान होते तिला आठवले की तिच्याकडे एक धार्मिक पुस्तक आहे, परंतु ते दुकानात नसून तिच्या घरी होते. ते पुस्तक यहोवाच्या साक्षीदारांनी प्रकाशित केले होते व त्याचे शीर्षक तुम्ही पृथ्वीवर नंदनवनात अनंतकाल जगू शकाल असे होते. त्या स्त्रीने ते पुस्तक अगदी उत्सुकतेने वाचले आणि तिच्या पुष्कळ बायबल आधारित प्रश्नांची तिला उत्तरे मिळाली. टेलिफोन डिरेक्टरीमध्ये यहोवाच्या साक्षीदारांची माहिती मिळाल्याबरोबर तिने त्यांच्याशी संपर्क साधला व बायबलचा नियमित अभ्यास चालू केला.
▫ एका तरुण स्त्रीने एक मंत्रविद्ध ताईत विकण्यासंबंधी स्थानिक वर्तमानपत्रात जाहिरात दिली. त्या जाहिरातीने त्याचा उल्लेख ‘मध्ययुगीन शक्तिशाली मंत्रविद्ध ताईत’ असा केला. यहोवाच्या एका साक्षीदाराने ती जाहिरात वाचली. दिलेल्या दूरध्वनी क्रमांकाचा उपयोग करुन मंत्रविद्ध ताईताच्या कल्पित शक्तीच्या उगमाबद्दल त्या स्त्रीशी बोलण्याचे ठरविले. दुरात्मिक कार्यांबद्दल बायबलचा काय दृष्टिकोन आहे त्यावर चर्चा सुरू झाली. मंत्रविद्ध ताईत असलेल्या त्या स्त्रीने दुरात्म्यांसोबतच्या तिच्या समस्यांसाठी आदल्या दिवशीच देवाकडे मदतीसाठी प्रार्थना केली होती असे त्या साक्षीदार बहिणीला सांगितले. त्या साक्षीदार बहिणीने दूरध्वनीद्वारे पुन्हा चर्चा करण्याची व्यवस्था केली.
या बहिणीने त्या तरुण स्त्रीला पुन्हा टेलिफोन केला तेव्हा ती घरी नव्हती. परंतु तिच्या आईने टेलिफोन घेतला आणि म्हणाली: “माझ्या मुलीला तुम्ही काय सांगितले ते मला माहीत नाही, पण जे काही घडले आहे ते आश्चर्यच आहे!” तिने सांगितले की सुरवातीच्या टेलिफोन कॉलनंतर, तिच्या मुलीने तिच्याकडची सर्व सैतानी चित्रे तसेच पुस्तके फेकून दिली आणि बायबल वाचण्यास सुरवात केली.
त्यानंतर लवकरच, त्या तरुण स्त्रीला व्यक्तीशः भेट देण्याची व्यवस्था केली गेली. तिने लागलीच यहोवाच्या साक्षीदारांसोबत बायबलचा नियमित अभ्यास स्वीकारला. शिवाय साक्षीदारांच्या ख्रिस्ती सभांना उपस्थित राहण्याद्वारे ती त्यांच्यासोबत सहवास ही ठेवू लागली. पुन्हा एकदा, यहोवाने बायबलच्या सत्याच्या अचूक ज्ञानाला प्रकाशवू देऊन दुरात्म्यांचा पराभव केला.