तुमचे मृत प्रियजन ते कोठे आहेत?
ॲलेक वर अनर्थ ओढवला होता. एका आठवड्यातच, त्याने त्याच्या दोन मित्रांना गमावले. त्यापैकी नेविल, बंदुकीच्या गोळीने जखमी झाल्यामुळे मरण पावला. दुसरा मित्र टोनी, एका वाहनाच्या अपघातात ठार मारला गेला. या १४ वर्षांच्या दक्षिण आफ्रिकेतील मुलाला, पूर्वी कधीच उद्भवले नाहीत असे प्रश्न आता सतावत होते. तो विचार करू लागला की ‘लोक का मरतात? तसेच, मृत्यूनंतर काय होते?’
नेविलच्या अंत्यसंस्काराला जात असताना, ॲलेकला अगदी प्रामाणिकपणे वाटले की त्याला ह्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. तो आठवण करून सांगतो, “परंतु, पाळकाने एका पुस्तकातून काही तरी वाचले आणि म्हटले की नेविल स्वर्गात गेला आहे. मग कबरस्थानात असताना, ते म्हणाले की आपण त्याच्या पुनरूत्थानाची वाट पाहू या. मी गोंधळून गेलो. नेविल जर स्वर्गात गेला आहे, तर तो त्याच्या पुनरूत्थानाची वाट कशी पाहू शकतो?”
नंतर त्याच दिवशी ॲलेक, टोनीच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिला. तेथे झालेला धार्मिक विधी त्याला न समजणाऱ्या भाषेत झाला. तरीही, दुःखित झालेल्यांपैकी काहींच्या उन्मादग्रस्त वागणूकीने सांत्वन मिळू शकले नाही, याची खात्री मात्र ॲलेकला झाली. तो सांगतो, “त्या रात्री, मी अतिशय बेचैन होतो. मला असाह्य आणि गोंधळून गेल्यासारखे वाटले. माझ्या प्रश्नांना कोणीच समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाही. माझ्या जीवनात मी पहिल्यांदाच विचार करू लागलो की, खरोखर देव आहे की नाही.”
प्रत्येक वर्षी, ॲलेकसारखे लाखो लोक त्यांच्या प्रियजनांना मृत्यूमध्ये गमावतात. १९९२ ब्रिटानिका बुक ऑफ द ईयर अशी माहिती देते की, “संपूर्ण जगभरात, १९९१ मध्ये ५,०४,१८,००० मृत्यू झाले.” शिवाय त्यानंतर आणखी किती लाखो लोक मरण पावले आहेत बरे? मागे राहिलेल्या दुःखित लोकांच्या अश्रूंचे जे पाट वाहिले आहेत त्यांची जरा कल्पना करा! मृत्यूबद्दलच्या विरोधात्मक दृष्टिकोनांचा गोंधळ, त्यांच्या दुःखात भर घालणारा आहे.
अशाप्रकारे, ॲलेकसारख्या अनेक लोकांचा भ्रमनिरास झाला आहे व त्यांना मृत्यूनंतर भवितव्यामध्ये आशेचा काही आधार आहे की नाही याविषयी शंका वाटते. एन्सायक्लोपिडिया ऑफ रिलिजन्स यानुसार, “सर्व युगांमध्ये, विचारी लोकांनी, सामान्य जनसमूहापासून वेगळी भूमिका घेतली आहे. . . . शिवाय, एखाद्या व्यक्तीचा जीव किंवा जीवन, त्या व्यक्तीच्या मेंदू आणि शरीराविना कसा जगू शकतो याची त्यांना शंका आहे.”
चित्तवेधकपणे, वर उल्लेखलेला विश्वकोश कबूल करतो की, शरीराच्या बाहेर अमर जीव अस्तित्वात असतो या धार्मिक सिद्धांताला पवित्र शास्त्र समर्थन देत नाही. हे खरे आहे की, पवित्र शास्त्र काही ठिकाणी, एखाद्या व्यक्तीचा “जीव” त्याला सोडून जातो व मृत शरीरात पुन्हा शिरतो असे सूचित करते. परंतु, त्या प्रसंगातील “जीव” याचा अर्थ “जीवन” गमावणे किंवा पुन्हा मिळवणे असा होतो. (उत्पत्ती ३५:१६-१९; १ राजे १७:१७-२३) अनेक वेळा, “जीव” हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये, मांस आणि रक्ताच्या दृश्य प्राण्यांचे, होय, जीवित प्राण्यांचे वर्णन करण्याकरता वापरला आहे. (उत्पत्ती १:२०; २:७) याकारणास्तव, पवित्र शास्त्र वारंवार असे सांगते की जीव मरतो. (यहेज्केल १८:४, २०; प्रे. कृत्ये ३:२३; प्रकटीकरण १६:३) देवाचे वचन म्हणते की जीव मेल्यावर, “त्यांना काहीच कळत नाही.”—उपदेशक ९:५, १०.
दुसऱ्या बाजूला पाहता, पवित्र शास्त्रामध्ये मृत लोकांना पुन्हा जिवंत केल्याचे अहवाल आहेत. लाजरच्या बाबतीत, तो मरण पावल्यानंतर चार दिवसांनी ही गोष्ट घडली. (योहान ११:३९, ४३, ४४) परंतु, शेकडो, किंवा हजारो वर्षांच्या आधी मरण पावलेल्या लोकांचे काय होईल? त्यांच्या भवितव्यातील जीवनाच्या आशेसाठी, ते मेले तेव्हा जे शरीर होते त्याच शरीरासोबत देवाने त्यांचे पुनरूत्थान करणे आवश्यक आहे का?
नाही. कारण हा विचार, मृत शरीरात असलेल्या अणुंचे जे काही घडते त्यासोबत जुळत नाही. कालांतराने, वनस्पती ह्याच अणुंना शोषून घेतात आणि मग इतर प्राणी ती वनस्पती खातात व ती त्यांच्या शरीराचा एक भाग होते.
मग, जे लोक फार वर्षांपूर्वी मरण पावले त्यांच्यासाठी काहीच आशा नाही असा याचा अर्थ झाला का? नाही. आमच्या या विस्तृत विश्वाच्या निर्मात्याकडे, भयजनक, अमर्यादित स्मरणशक्ती आहे. त्याच्या परिपूर्ण स्मरणशक्तीत तो ज्या व्यक्तीची आठवण करण्याचे निवडतो त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला आणि आनुवंशिकतेच्या लक्षणांना साठवून ठेवण्याची क्षमता आहे. शिवाय, यहोवा देवामध्ये, पूर्वी हयात असलेल्या एखाद्या व्यक्तीच्या अचूक आनुवंशिक चिन्हांसहित एका मानवी शरीराला पुनःनिर्माण करण्याची शक्ती आहे. त्याला ज्या ज्या व्यक्ती आठवणीत आहेत जसे की अब्राहाम, अशांच्या शरीरामध्ये तो त्यांची स्मरणशक्ती व व्यक्तिमत्व पुन्हा घालू शकतो.
अब्राहामाच्या मृत्यूच्या सुमारे दोन हजार वर्षांनंतर, येशूने अशाप्रकारे हमी दिली: “मोशेनेही झुडपाच्या वृत्तांतात, परमेश्वराला [यहोवा, NW] ‘अब्राहामाचा देव इसहाकाचा देव व याकोबाचा देव’ असे म्हणून मेलेले उठविले जातात हे दर्शविले आहे. तो मृतांचा देव नव्हे तर जिवंताचा आहे; कारण त्याला सर्वच जिवंत आहेत.” (लूक २०:३७, ३८) अब्राहाम, इसहाक, आणि याकोब यांच्या व्यतिरिक्त, इतर लाखो मृत लोक देवाच्या स्मरणात जिवंत आहेत. ते सर्व येणाऱ्या पुनरूत्थानाची वाट पाहून आहेत. पवित्र शास्त्र याला पुष्टी देते की, “नीतिमानांचे आणि अनीतिमानांचे पुनरूत्थान होईल.”—प्रे. कृत्ये २४:१५.
ॲलेकला त्याच्या मित्रांच्या मृत्यूमुळे झालेल्या हानीच्या काही आठवड्यांनंतर, त्याच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. यहोवाचा एक साक्षीदार त्याच्या घरी गेला आणि देवाचे वचन मृत्यू व पुनरूत्थानाविषयी काय म्हणते ते त्याने त्याला दाखवले. यामुळे ॲलेकला सांत्वन लाभले, व त्याच्या जीवनाला नवा अर्थ मिळाला.
तुम्हाला सुद्धा पुनरूत्थानाच्या पवित्र शास्त्र आधारित आशेविषयी आणखी शिकायचे आहे का? जसे की, बहुतेक पुनरूत्थान स्वर्गात होतील की पृथ्वीवर होतील? देवाची स्वीकृती प्राप्त करण्यासाठी व लोक त्यांच्या प्रियजनांना पुनःमिळतील या त्याच्या आश्चर्यकारक अभिवचनाचा अनुभव घेण्यासाठी एखाद्या व्यक्तीला काय करण्याची गरज आहे?