येशूचे जीवन व उपाध्यपण
येशू—वादंगाचा केंद्रबिंदू
शिमोनाच्या घरी आदरातिथ्य झाल्यानंतर लगेच येशू त्याची गालीलची दुसरी प्रचारकार्याची फेरी आरंभितो. त्याच्या या अगोदरच्या प्रवासात त्याच्यासोबत त्याचे पहिले शिष्य पेत्र, आंद्रिया, याकोब व योहान हे होते. पण आता त्याच्यासोबत त्याचे १२ प्रेषित व काही ठराविक स्त्रियाही आहेत. यात मरिया मग्दालिया, सुसान्ना व जिचा पती हेरोद राजाचा अधिकारी आहे ती योहान्ना यांचा समावेश आहे.
येशूचे उपाध्यपण वाढू लागते तशीच त्याच्या कार्याविषयीची लोकांची उलटसुलट प्रतिक्रियाही वाढते. एका अंध व मुक्या भूतग्रस्त माणसाला येशूकडे आणले जाते. येशू त्याला बरे करतो तेव्हा या माणसावरील दुरात्म्याचा ताबा निघून जातो आणि हा मनुष्य बोलू व बघूही लागतो. लोकसमुदाय आश्चर्याने थक्क होतो. लोक म्हणतातः “हा दावीदाचा पुत्र असेल का?”
खरे म्हणजे, येशू राहतो त्या घरासभोवती लोक इतक्या संख्येने जमा झाले आहेत की त्याला व त्याच्या शिष्यांना जेवावयासही सवड होईना. तो वाग्दान दिलेला “दावीदाचा पुत्र” आहे असे मानणाऱ्या लोकांशिवाय तेथे शास्त्री व परुशी देखील आले आहेत. येशूची मानहानी कशी करावी याच्या प्रयत्नात ते यरुशलेमाहून येथे आले आहेत. येशूच्या घराभोवती इतका जमाव जमलेला आहे व गोंधळ दिसत आहे हे पाहून त्याचे भाऊ तेथे त्याला घेण्यासाठी येतात. ते का बरे?
खरे म्हणजे, येशूच्या भावांचा, येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास नसतो. येशू नाजारेथ येथे त्यांच्यामध्येच मोठा झालेला असल्यामुळे तो कसा आहे हे त्यांना माहीत होते, पण आता त्याच्यामुळे जो कल्लोळ व वादंग माजण्याची चिन्हे दिसत आहेत ते काहीतरी वेगळेच आहे हे त्यांना वाटते. या कारणास्तव येशूचे मानसिकदृष्ट्या काहीतरी बिघडले आहे अशी त्यांची समजूत होते. “त्याला वेड लागले आहे,” असा निष्कर्ष काढून ते त्याला तेथून घेऊन जाण्यास आले आहेत.
पण, येशूने तर एका भूतग्रस्त माणसाला बरे केले होते हे उघड होते. हे खरेपणाने घडूच शकत नाही व शिवाय येशूने केलेले इतर चमत्कारही खरे नाहीत असे शास्त्री व परुश्यांना वाटत होते. यामुळेच येशूची मानहानी करावी या हेतूने ते लोकसमुदायास म्हणतातः “हा, भूतांचा अधिकारी बालजबूल याच्या सहाय्याने भूते काढतो.”
त्यांचे विचार ओळखून येशू शास्त्री व परुश्यांना जवळ बोलावतो. तो म्हणतोः “आपसात फूट पडलेले राज्य टिकत नाही, आपसात फूट पडलेले घर किंवा नगर देखील टिकत नाही. त्याचप्रमाणे सैतान सैतानास काढतो तर त्याची आपसात फूट पडलेली आहे; मग, त्याचे राज्य कसे टिकेल?”
केवढा हा पेचीत टाकणारा युक्तीवाद! आपल्या लोकांना देखील भूते काढता येतात हा परुश्यांचा दावा असल्यामुळे येशू त्यांना विचारतोः “मी जर बालजबूलच्या साहाय्याने भूते काढीत असेन तर तुमचे पुत्र कोणाच्या साहाय्याने काढतात?” दुसऱ्या शब्दात म्हणायचे झाल्यास, येशूविरुद्ध त्यांनी लावलेला आरोप त्यांच्यावर देखील लावता येऊ शकतो. या कारणास्तव येशू त्यांना बजावतोः “परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या सहाय्याने भूते काढीत आहे तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.”
येशूने दुरात्म्यांना घालवून देणे याचा अर्थ येशूचे सैतानावर प्राबल्य आहे हे दर्शविण्यासाठी येशू हा दृष्टांत देऊन म्हणतोः “बलवान माणसाला अगोदर बांधल्याशिवाय त्याच्या घरात शिरुन त्याची चीजवस्तु कोणाला लुटून नेता येईल? नंतरच तो त्याचे घर लुटील. जो मला अनुकूल नाही तो मला प्रतिकूल आहे आणि जो माझ्याबरोबर गोळा करीत नाही तो उधळून टाकतो.” परुशी येशूला प्रतिकूल होते हे स्पष्ट आहे. त्यांनी स्वतःच्या बाबतीत सैतानाचे हस्तक असल्याचे प्रदर्शित केले होते. तेच इस्राएलांना येशूपासून उधळून टाकीत होते.
या कारणास्तव, येशू या सैतानी विरोधकांना बजावतो की, “पवित्र आत्म्याच्या विरुद्ध केलेल्या दुर्भाषणाला क्षमा होणार नाही.” याच्या स्पष्टीकरणार्थ तो म्हणतोः “मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काही बोलेल त्याची त्याला क्षमा होईल; परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणारच नाही, ह्या युगी नाही व येणाऱ्या युगीही नाही.” देवाच्या पवित्र आत्म्याच्या कार्यवहनाने जो अद्भूत चमत्कार साध्य करण्यात आला होता तो सैतानाकरवी संपन्न झालेला आहे असे निंद्य भाष्य करुन त्या शास्त्री व परुश्यांनी क्षमा न होऊ शकणारे पाप केले होते. मत्तय १२:२२-३२; मार्क ३:१९-३०; योहान ७:५.
◆ येशूची गालीलची दुसरी फेरी पहिल्या फेरीपेक्षा कशी भिन्न आहे?
◆ येशूचे आप्त त्याला घेऊन जाण्याचा का प्रयत्न करतात?
◆ येशूच्या चमत्काराची मानखंडणा करावी यासाठी परुशी कसा प्रयत्न करतात, पण येशू त्यांचे कसे खंडण करतो?
◆ या परुशांचा काय दोष आहे, व का?