पाठ ८०
येशू बारा प्रेषित निवडतो
येशूने प्रचारकार्याची सुरुवात करून जवळजवळ दीड वर्ष झालं होतं. आता त्याला एक महत्त्वाचा निर्णय घ्यायचा होता. त्याला अशा काही जणांना निवडायचं होतं जे नेहमी त्याच्यासोबत काम करणार होते. तसंच, त्यांना ख्रिस्ती मंडळीत लोकांचं मार्गदर्शन करण्याचं प्रशिक्षणही द्यायचं होतं. मग यासाठी तो कोणाला निवडणार होता? हा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी त्याला यहोवाच्या मार्गदर्शनाची गरज होती. त्यामुळे तो प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर एकांत जागेवर गेला. तिथे त्याने रात्रभर यहोवाला प्रार्थना केली. सकाळ झाल्यावर, येशूने त्याच्या काही शिष्यांना एकत्र बोलवलं. मग त्याने त्यांच्यामधून १२ प्रेषित निवडले. त्या १२ प्रेषितांपैकी तुला कोणा-कोणाची नावं आठवतात? पेत्र, अंद्रिया, याकोब, योहान, फिलिप्प, बर्थलमय, थोमा, मत्तय, अल्फीचा मुलगा याकोब, तद्दय, शिमोन आणि यहूदा इस्कर्योत ही त्यांची नावं आहेत.
अंद्रिया, पेत्र, फिलिप्प, याकोब
येशू जिथे-जिथे जाणार होता तिथे-तिथे हे प्रेषित त्याच्यासोबत जाणार होते. त्यांना शिकवल्यानंतर येशूने त्यांना प्रचार करण्यासाठी पाठवून दिलं. यहोवाने त्या प्रेषितांना दुरात्मे काढण्याची आणि आजार बरे करण्याची शक्तीसुद्धा दिली.
योहान, मत्तय, बर्थलमय, थोमा
येशूने त्याच्या बारा प्रेषितांना आपले मित्र म्हटलं. त्यांच्यावर त्याचा खूप भरवसा होता. परूशी लोक प्रेषितांना अशिक्षित आणि साधारण माणसं समजायचे. पण, येशूने दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी प्रेषितांना चांगलं प्रशिक्षण दिलं होतं. येशूच्या जीवनातल्या सर्वात महत्त्वपूर्ण काळात, हे प्रेषित त्याच्यासोबत असणार होते. जसं की, त्याच्या मृत्यूच्या आधी आणि त्याचं पुनरुत्थान झाल्यानंतर. बारा प्रेषितांपैकी बरेच जण येशूप्रमाणेच गालील राज्यातून होते. त्यांच्यापैकी काहींची लग्नंही झाली होती.
अल्फीचा मुलगा याकोब, यहूदा इस्कर्योत, तद्दय, शिमोन
हे प्रेषित परिपूर्ण नव्हते आणि त्यांच्या हातूनही चुका झाल्या. कधीकधी ते विचार न करता बोलायचे. तर काही वेळा त्यांनी चुकीचे निर्णयही घेतले. कधीकधी ते उतावळेपणा दाखवायचे. तसंच, आपल्यापैकी सर्वात मोठा कोण, या विषयावर त्यांच्यात भांडणंही व्हायची. पण ते चांगले लोक होते. कारण त्यांचं यहोवावर प्रेम होतं. पुढे जाऊन हेच प्रेषित, ख्रिस्ती मंडळीचा पाया असणार होते. म्हणजेच, ते ख्रिस्ती मंडळीचे पहिले सदस्य असणार होते आणि येशू गेल्यानंतर ते खूप महत्त्वाची जबाबदारी पूर्ण करणार होते.
“मी तर तुम्हाला मित्र म्हटलं आहे, कारण माझ्या पित्यापासून ऐकलेल्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आहेत.”—योहान १५:१५