प्रश्न ७
माझ्यावर सेक्स करण्याचा दबाव आला तर मी काय करू शकते?
तुम्ही काय केलं असतं?
कल्पना करा: हेदर आणि माईक फक्त दोन महिन्यांपासून डेटिंग करत आहेत. पण हेदरला असं वाटतंय जणू ती माईकला फार पूर्वीपासून ओळखते. ते एकमेकांना सतत मेसेजेस पाठवतात, फोनवर तास न् तास गप्पा मारतात, आणि आता तर ते एकमेकांच्या मनातलं ही बोलून जातात! पण आता माईकला फक्त एवढ्यावरच थांबायचं नाहीये.
गेल्या दोन महिन्यांत, माईक आणि हेदर यांनी एकमेकांचा हात धरणं आणि किस करणं यापुढे काही केलं नाही. कारण हेदरला यापुढे जायचं नाहीये, पण तिला माईकला गमवायचंही नाही. ती फार ‘सुंदर’ असल्याची, ‘स्पेशल’ असल्याची तो तिला जाणीव करून देतो. ‘आणि तसंही आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे . . . ’ असं ती स्वतःला समजावते.
तुमचं जर डेटिंग करण्याचं वय असेल आणि तुमच्या समोर हेदरसारखी परिस्थिती असती, तर तुमचं पुढचं पाऊल काय असतं?
थांबा आणि विचार करा!
सेक्स ही फक्त लग्न झालेल्या जोडप्यांसाठी देवाकडून मिळालेली भेट आहे. समजा तुम्हाला कुणी एक सुंदर वस्त्र भेट म्हणून दिलं आणि तुम्ही त्याला साफ-सफाईचं फडकं म्हणून वापरलं, तर हे योग्य ठरेल का? लग्नाआधी सेक्स हा या भेटीचा गैरवापर आहे
तुम्ही झाडावर चढून पक्ष्यांसारखं उडण्याचा प्रयत्न केला, तर तुम्हाला गुरुत्वाकर्षणाचा नियम तोडण्याचे दुष्परिणाम भोगावेच लागतील. तसंच नैतिक नियम तोडले तर त्याचेही परिणाम भोगावेच लागतील. एक नैतिक नियम असा आहे: “तुम्ही लैंगिक अनैतिकता टाळावी.”—१ थेस्सलनीकाकर ४:३, सुबोधभाषांतर.
हा नियम तोडण्याचा परिणाम काय होऊ शकतो? बायबलमध्ये म्हटलं आहे: “कारण तुम्ही व्यभिचार करता तेव्हा तुम्ही स्वतःच्याच शरीराविरुद्ध पाप करता.” (१ करिंथकर ६:१८, सुबोधभाषांतर) पण हे कितपत खरं आहे?
संशोधन करणाऱ्यांना असं आढळून आलं आहे की, ज्या तरुणांनी लग्नाआधी सेक्स केलं त्यांना पुढील परिणामांना तोंड द्यावं लागलं.
पश्चात्ताप. ज्या तरुणांनी लग्नाआधी सेक्स केलं त्यांना नंतर त्याचा खूप पश्चात्ताप झाला, असं ते म्हणतात.
अविश्वास. सेक्स केल्यानंतर दोघांनाही हा प्रश्न पडलेला असतो, ‘याने/हिने अजून कोणासोबत सेक्स केलं असेल?’
निराशा. सहसा कित्येक मुलींना असा सोबती हवा असतो जो त्यांचा फायदा उचलणार नाही, तर त्यांचं संरक्षण करेल. आणि कित्येक मुलांना नंतर अशी मुलगी आकर्षक वाटत नाही, जिनं त्यांच्यासोबत सेक्स केलं आहे.
शेवटी मुद्दा हाच: जर तुम्ही लग्नाआधी सेक्स केलं, तर तुम्ही एक मौल्यवान गोष्ट गमावून स्वतःचा दर्जा कमी करता. (रोमकर १:२४) तुमचं शरीर फार मौल्यवान आहे ते कवडीमोलाचं करू नका!
“लैंगिक अनैतिकता” टाळून आपलं चारित्र्य शुद्ध ठेवण्याची शक्ती तुमच्यात आहे हे दाखवा. (१ थेस्सलनीकाकर ४:३) आणि पुढे जाऊन तुमचं लग्न होईल त्या वेळी तुम्ही सेक्स करू शकता. तेव्हा तुम्ही सेक्सचा खरा आनंद घेऊ शकाल, कुठलीही चिंता न करता, पश्चात्ताप आणि भीतीच्या भावना न ठेवता ज्या सहसा लग्नाआधी सेक्स केल्यावर येतात.—नीतिसूत्रे ७:२२, २३; १ करिंथकर ७:३.
तुम्हाला काय वाटतं?
जर कुणाचं तुमच्यावर खरं प्रेम असेल, तर ती व्यक्ती तुम्हाला शारीरिक किंवा मानसिक इजा पोहचवेल का?
जी व्यक्ती तुमच्यावर खरं प्रेम करते ती तुम्हाला असं काही करायला सांगेल का, ज्यामुळे तुमचं देवासोबतचं नातं बिघडेल?—इब्री लोकांस १३:४.