पाठ १८
संकटात असलेल्या आमच्या बांधवांना आम्ही कशी मदत करतो?
डोमिनिकन प्रजासत्ताक
जपान
हैटी
विपत्तीचा घाला पडतो तेव्हा यहोवाचे साक्षीदार आपल्या बांधवांना मदत करण्यासाठी लगेच पावले उचलतात. या प्रयत्नांतून आमच्यात असलेले प्रेम ठळकपणे दिसून येते. (योहान १३:३४, ३५; १ योहान ३:१७, १८) आम्ही त्यांना कोणकोणत्या मार्गांनी मदत करतो?
आम्ही आर्थिक रीत्या मदत करतो. यहूदीयात जेव्हा एक मोठा दुष्काळ पडला होता तेव्हा अंत्युखियातील ख्रिश्चनांनी यहूदीयातील बांधवांना आर्थिक मदत पुरवली होती. (प्रेषितांची कृत्ये ११:२७-३०) त्याचप्रमाणे आजही जेव्हा आम्हाला समजते की जगाच्या एखाद्या भागात आमचे बांधव कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत तेव्हा त्यांना गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी आम्ही आमच्या स्थानिक मंडळीद्वारे आर्थिक मदत पाठवतो. —२ करिंथकर ८:१३-१५.
आम्ही व्यावहारिक रीत्या मदत पुरवतो. विपत्तीग्रस्त भागात असलेले वडील मंडळीतल्या प्रत्येक सदस्याशी संपर्क साधतात व ते सुरक्षित आहेत याची खातरी करतात. मदतकार्य समिती तेथील बांधवांना अन्न, वस्त्र, निवारा, पिण्याचे स्वच्छ पाणी आणि वैद्यकीय मदत पुरवण्याची व्यवस्था करते. ज्या बांधवांकडे आवश्यक कौशल्ये आहेत असे अनेक बांधव स्वेच्छेने व स्वखर्चाने विपत्तीग्रस्त क्षेत्रात जातात आणि मदतकार्य करण्यात किंवा घरांची आणि राज्य सभागृहांची दुरुस्ती करण्यात हातभार लावतात. आमच्या संघटनेत आम्ही जी एकता अनुभवतो आणि एकमेकांच्या सोबत काम केल्याने जो अनुभव आम्हाला मिळतो त्यामुळे गरजेच्या वेळी लगेच हालचाल करण्यासाठी आम्हाला मदत होते. आम्ही “विश्वासाने एका घरचे” असलेल्यांना मदत करत असलो तरी शक्य तेव्हा इतरांनाही, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, मदत करण्याचा प्रयत्न करतो.—गलतीकर ६:१०.
आम्ही त्यांना आध्यात्मिक व भावनिक रीत्या मदत करतो. विपत्तीग्रस्त लोकांना खासकरून सांत्वनाची गरज असते. अशा वेळी आम्ही “सांत्वनदाता देव” यहोवा याच्याकडून मदत मिळवतो. (२ करिंथकर १:३, ४) हताश झालेल्या लोकांना आम्ही बायबलमधील देवाची अभिवचने सांगतो. देवाचे राज्य कशा प्रकारे दुःख देणाऱ्या सर्व गोष्टींचा समूळ नायनाट करेल हे आम्ही त्यांना सांगतो.—प्रकटीकरण २१:४.
विपत्तीच्या काळात यहोवाच्या साक्षीदारांना लगेच हालचाल करणे कशामुळे शक्य होते?
विपत्तीग्रस्त लोकांना आपण कोणती सांत्वनदायक बातमी सांगू शकतो?