पाठ १
देव आपल्याकडून काय अपेक्षितो हे तुम्ही कसे शोधून काढू शकता
बायबलमध्ये कोणती महत्त्वपूर्ण माहिती आहे? (१)
बायबलचा लेखक कोण आहे? (२)
तुम्ही बायबलचा अभ्यास का करावा? (३)
१. बायबल ही देवाकडची मौल्यवान देणगी आहे. ते, एका प्रेमळ पित्याने आपल्या मुलांना लिहिलेल्या पत्राप्रमाणे आहे. ते आपल्याला देवाबद्दल—तो कोण आहे आणि त्याचे दर्जे काय आहेत यांबद्दलचे सत्य सांगते. समस्यांना कसे तोंड द्यावे व खरा आनंद कसा मिळवावा याचे स्पष्टीकरण ते देते. देवाला संतुष्ट करण्यासाठी आपण काय केले पाहिजे ते केवळ बायबल आपल्याला सांगते.—स्तोत्र १:१-३; यशया ४८:१७, १८.
२. सा. यु. पू. १५१३ पासून सुरू होऊन सुमारे १,६०० वर्षांदरम्यान ४० विविध लोकांनी बायबलचे लिखाण केले. ते ६६ लहान पुस्तकांचे मिळून बनलेले आहे. बायबल लिहिणाऱ्या सर्वांना ईश्वराकडून प्रेरणा मिळाली होती. त्यांनी स्वतःचे नव्हे तर त्याचे विचार लिहिले. या कारणास्तव, बायबलचा लेखक पृथ्वीवरील कोणी मानव नसून स्वर्गातील देव आहे.—२ तीमथ्य ३:१६, १७; २ पेत्र १:२०, २१.
३. बायबलची नक्कल अचूकपणे होईल आणि ते टिकून राहील याची देवाने खात्री केली. इतर कोणत्याही पुस्तकांपेक्षा बायबलच्या पुष्कळ प्रती छापण्यात आल्या आहेत. तुम्हाला बायबलचा अभ्यास करताना पाहून सर्वांनाच आनंद होणार नाही, पण तरी तो तुम्ही थांबवू नका. तुमचे सार्वकालिक भवितव्य, देवाची ओळख करून घेण्यावर आणि कितीही छळ होत असला तरी त्याची इच्छा करत राहण्यावर अवलंबून आहे.—मत्तय ५:१०-१२; योहान १७:३.