भाग २
जलप्रलय ते इजिप्तहून सुटका
जलप्रलयातून फक्त आठ जण वाचले. पण कालांतरानं त्यांची संख्या हजारोंवर गेली. मग, जलप्रलयानंतर ३५२ वर्षांनी अब्राहामाचा जन्म झाला. अब्राहामाला इसहाक नावाचा मुलगा देऊन देवानं आपलं वचन कसं पाळलं, ते आपल्याला कळतं. मग, इसहाकाच्या दोन मुलांपैकी याकोबाला देवानं निवडलं.
याकोबाचं, १२ मुलगे आणि काही मुलींचं मोठं कुटुंब होतं. याकोबाच्या १० मुलांनी, योसेफ नावाच्या त्यांच्या धाकट्या भावाचा द्वेष केला. त्यांनी त्याला इजिप्तमध्ये दास म्हणून विकलं. पुढे योसेफ तिथे मोठा अधिकारी झाला. एक भयंकर दुष्काळ आला असताना, आपल्या भावांचं मन बदललं आहे की नाही, ते पाहण्यासाठी योसेफानं त्यांची परीक्षा घेतली. शेवटी याकोबाचं सर्व कुटुंब, इस्राएल लोक, इजिप्तला गेलं. अब्राहामाच्या जन्मानंतर २९० वर्षांनी ही घटना घडली.
त्यापुढची २१५ वर्ष इस्राएल इजिप्तमध्ये राहिले. योसेफाच्या मृत्यूनंतर तिथे ते गुलाम झाले. कालांतरानं मोशेचा जन्म झाला; आणि इजिप्तमधून इस्राएलांना सोडवण्यासाठी देवानं त्याचा उपयोग केला. दुसऱ्या भागात एकूण ८५७ वर्षांचा इतिहास आहे.