भाग १
निर्मिती ते जलप्रलय
आकाश आणि पृथ्वी कोठून आले? सूर्य, चंद्र आणि तारे, तसंच पृथ्वीवरल्या अनेक गोष्टी, कोठून अस्तित्वात आल्या? त्या सर्वांना देवानं निर्माण केलं असं म्हणताना, बायबल खरं उत्तर देतं आणि म्हणूनच, निर्मितीबद्दलच्या बायबलच्या कथांनी आपल्या पुस्तकाची सुरवात होते आहे.
देवानं सुरवातीला निर्माण केलेल्या गोष्टी म्हणजे, काहीशा त्याच्यासारख्याच असलेल्या आत्मिक व्यक्ती होत्या, असं आपल्याला कळून येतं. ते देवदूत होते. परंतु पृथ्वी आपल्यासारख्या लोकांसाठी बनवली गेली. तेव्हा देवानं आदाम आणि हव्वा नावाच्या पुरुष आणि स्त्रीला बनवलं; आणि त्यांना एका सुंदर बागेत ठेवलं. पण त्यांनी देवाची अवज्ञा केली; आणि जगण्याचा हक्क गमावला.
आदामाच्या निर्मितीपासून जलप्रलयापर्यंत, एकूण १,६५६ वर्षं झाली. या काळाच्या दरम्यान अनेक वाईट लोक होऊन गेले. स्वर्गात सैतान व त्याचे दुष्ट दूत होते. तर पृथ्वीवर, काईन आणि इतर अनेक वाईट लोक होते. त्यातले काही विलक्षण ताकदीचे होते. परंतु पृथ्वीवर हाबेल, हनोख आणि नोहा असे चांगले लोकही होते. पहिल्या भागात आपण या सर्व लोकांबद्दल व घटनांबद्दल वाचू.