मुलांचीही गय न करणारा दहशतवाद
उत्तर युगांडात, संध्याकाळी अंधार पडू लागताच, तुम्हाला रस्त्यांवरून अनवाणी चालत जाणारी हजारो लहान मुले दिसतील. रात्र पडण्याआधी ही मुले आपल्या ग्रामीण वस्त्या सोडून गुलू, किटगुम व लीरा यांसारख्या मोठ्या शहरांकडे पायीच निघतात. शहरांत पोचल्यावर ही सगळी मुले वेगवेगळ्या दिशांनी निघून जातात. काही इमारतींत, काही बस स्थानकांवर, तर काही सार्वजनिक उद्यानांत आश्रय घेतात. दिवस उजाडताच ही मुले पुन्हा गावाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरून घरी जाताना दिसतात. का येतात ही मुले रोज शहराकडे?
काही लोक यांना रात्र पाळीवाले म्हणतात. पण ही मुले रात्र पाळी करण्यासाठी शहरात जात नाहीत. संध्याकाळी त्यांना आपले घर सोडून जाणे भाग असते कारण ज्या ग्रामीण भागांत ते राहतात तेथे अंधार पडल्यावर मुलांनी घरी राहणे अत्यंत धोकेदायक असते.
मागच्या जवळजवळ वीस वर्षांपासून, अनधिकृत सैन्याच्या टोळ्यांनी ग्रामीण भागांत जबरदस्तीने घुसून लहान मुलांना पळवून नेण्याचा सपाटा लावला आहे. दर वर्षी ते शेकडो मुलामुलींना त्यांच्या आईबापांपासून हिसकावून, घनदाट जंगलात गायब होतात. सहसा या मुलामुलींना रात्रीच्या वेळी धरून नेले जाते आणि मग हे बंडखोर सैनिक त्यांना आपल्यासारखेच सैनिक किंवा ओझी वाहणारे हमाल बनवतात व त्यांचे लैंगिक शोषण करतात. जर या मुलांनी अपहरणकर्त्यांच्या हुकूमांप्रमाणे केले नाही तर त्यांचे नाक किंवा ओठ कापून टाकले जातात. आणि जर कोणी पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडला गेला तर त्याला, इथे वर्णनही करता येणार नाही इतक्या क्रूरपणे ठार मारले जाते.
इतर ठिकाणीही लहान मुले दहशतवादाला बळी पडली आहेत. सिएरा लियोनमध्ये तुम्हाला तेरा चौदा वर्षांची लुळीपांगळी मुले दिसतील. ही मुले नुकतीच चालायला लागली होती तेव्हा, दहशतवाद्यांनी कोयत्यासारख्या मोठ्या चाकूने त्यांचे हातपाय कापून टाकले होते. अफगाणिस्तानात काही लहान मुलेमुली फुलपाखरांच्या आकारांत असलेल्या सुरूंगांशी खेळतात. पण या रंगीबेरंगी “खेळण्यांचा” अचानक स्फोट होतो तेव्हा त्यांच्या हाताची बोटे तुटतात व त्यांना कायमचे अंधत्व येते.
दहशतवादाला बळी पडणाऱ्या काही लहान मुलांची मात्र वेगळीच गत होते. उदाहरणार्थ, १९९५ साली अमेरिकेतील ओक्लाहोमा सिटीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ज्या १६८ लोकांचा जीव गेला त्यात १९ मुले होती. काही तर अगदी तान्ही बाळं होती. जोराचा वारा येऊन मेणबत्तीची ज्योत अचानक विझावी तशी या बॉम्बस्फोटाने क्षणार्धात या चिमुकल्यांची जीवनज्योत मालवून टाकली. त्या एका दहशतवादी हल्ल्याने या मुलांकडून बालपण अनुभवण्याचा, हसण्याबागडण्याचा, आपल्या आईबाबांकडून लाड करून घेण्याचा हक्क हिरावून घेतला.
या घटना तर अलीकडच्या आहेत, पण दहशतवाद्यांनी घडवून आणलेली हिंसाचारी कृत्ये काही नवीन नाहीत. कित्येक शतकांपासून मानवाला ती कशी सहन करावी लागली आहेत याविषयी पुढच्या लेखात पाहूया. (g ६/०६)
[३ पानांवरील चौकट]
मुलांच्या मृत्यूकरता मानसिक तयारी
“आज सकाळी जेव्हा मी आपल्या अकरा वर्षांच्या मुलाला उठवायला गेलो, तेव्हा त्याने मला विचारले, ‘बाबा, आजचा दहशतवादी हल्ला झाला, की अजून व्हायचाय?’” हे वाक्य डेव्हिड ग्रोसमन यांनी त्यांच्या देशात चाललेल्या दहशतवादावर लिहिलेल्या पुस्तकातले आहे. पुढे ते म्हणतात: “माझ्या मुलाला सतत भीती वाटते.”
अलीकडच्या काळात दहशतवादी हल्ल्यांत इतक्या लहान मुलांचा बळी गेला आहे, की काही आईवडील आपल्या मुलांच्या मृत्यूकरता मानसिक तयारी करू लागली आहेत. ग्रोसमन आपल्या पुस्तकात लिहितात, “एका जोडप्याने मला त्यांच्या भविष्याच्या योजना सांगताना जे म्हटले होते ते मी कधीही विसरू शकणार नाही. त्यांनी सांगितले की आम्ही लग्न करणार आहोत आणि तीन मुले होऊ देणार आहोत. दोन, नव्हे तर तीन. कारण एकाचा मृत्यू झालाच तरी आमच्याजवळ दोन मुले राहतील.”
पण एकाऐवजी समजा जर दोघांचा मृत्यू झाला तर, किंवा जर तिघांचाही मृत्यू झाला तर काय? याविषयी त्यांनी सांगितले नाही.a
[तळटीप]
a या भागात उद्धृत केलेली विधाने डेव्हिड ग्रोसमन यांच्या रोजचाच झालेला मृत्यू (इंग्रजी) या पुस्तकातील आहेत.
[३ पानांवरील चित्राचे श्रेय]
© Sven Torfinn/ Panos Pictures