आयरिश वुल्फहाऊंड
आयर्लंडमधील सावध राहा! नियतकालिकाच्या बातमीदाराकडून
“श्वान कुळातला मवाळ राक्षस.”
असं आयरिश वुल्फहाऊंडविषयी एका ठिकाणी म्हटलं आहे. लांडग्यांची शिकार करणारा हा कुत्रा तुमच्या पाहण्यात कधी आलाय का? सध्या आयर्लंडमध्ये औषधालासुद्धा लांडगे सापडणार नाहीत हे खरंय; पण, एकेकाळी ते सर्रास पाहायला मिळायचे हेही तितकंच खरं. या शिवाय, रानडुक्कर आणि मोठ्या हरणांचासुद्धा तिथं वावर असायचा. आयर्लंडमधला शेवटचा लांडगा जवळजवळ दोनशे वर्षांपूर्वी मारला गेला असं म्हटलं जातं. पण त्याआधी, लांडग्यांची आणि इतर मोठ्या प्राण्यांची शिकार करण्याकरता वुल्फहाऊंडचा उपयोग केला जायचा. अमेरिकेच्या रॉकी पर्वतांवर प्राण्यांची शिकार करण्याकरता अशाच एका वुल्फहाऊंडला सोडण्यात आलं; तेव्हा त्याने केलेल्या पराक्रमाचा किस्सा अगदी चवीनं ऐकवला जातो. लोक सांगतात, की १८९२ च्या “हिवाळ्यात या शिकारी कुत्र्यानं चक्क ४० लांडग्यांचा फडशा पाडला,” पण, हे ऐकून घाबरून जाण्याची गरज नाही. कारण वुल्फहाऊंड कधीही माणसाच्या वाट्याला जात नाही!
का ही इतिहास तज्ज्ञांचं म्हणणं आहे, की वुल्फहाऊंड नावानं ओळखल्या जाणाऱ्या या शिकारी कुत्र्यांनी सा.यु.पू. ५०० च्या सुमारास आयर्लंडमध्ये येऊन आपलं बस्तान मांडलं असावं. पुढे केल्ट जमातीच्या लोकांनी फक्त शिकारीसाठीच नव्हे तर इतर कारणांसाठीही यांचा उपयोग करून घेतला. उदाहरणार्थ, दंतकथा आणि इतिहासावरून असं समजतं, की आयर्लंडचे राजे आणि योद्धे या शिकारी कुत्र्यांना युद्धभूमीवर देखील न्यायचे.
पाहता पाहता, एक खास जातीचा कुत्रा म्हणून वुल्फहाऊंडची ख्याती जगभर पसरली. इतकी, की रोमच्या आखाड्यांमध्ये रोमी लोकांना दाखवण्यासाठी वुल्फहाऊंड जातीच्या कुत्र्यांना आयर्लंडमधून रोमला नेण्यात आलं. तसेच, भेट वस्तू म्हणून ही कुत्री एकमेकांना दिली जायची. उदाहरणार्थ, क्वीनटस आयूरेलीअस सीमेकेस नावाच्या एका रोमी परराष्ट्र दूताच्या अधिकृत कागदपत्रांवरून समजतं, की रोमला भेट म्हणून सात आयरिश वुल्फहाऊंड जातीची कुत्री पाठवल्याबद्दल त्याने सा.यू. ३९१ मध्ये आभार प्रदर्शनाचं एक पत्र आपल्या भावाला लिहिलं होतं. असं म्हटलं जातं, की या शिकारी कुत्र्यांचं रोमी लोकांना खूप आकर्षण होतं. “सबंध रोम शहराला त्यांचं विलक्षण कौतुक वाटत होतं. आणि यांना कदाचित, लोखंडी पिजऱ्यांमध्ये बंदिस्त करून इथं आणलं असावं असाही तर्क लोकांनी केला,” असं सीमेकेस म्हणतात.
कदाचित या शिकारी कुत्र्यांचे अवाढव्य शरीर पाहून लोकांना असं वाटलं असेल. त्यांच्या आकाराविषयी बोलायचे तर, नर वूल्फहाऊंड खांद्यापर्यंत ८६ सेंटिमीटर उंच असतो तर काही त्याहीपेक्षा मोठे असतात. आजवर आढळलेला सगळ्यात उंच वूल्फहाऊंड खांद्यापर्यंत १०० सेंटिमीटरहून उंच होता. नरापेक्षा मादी सहसा २ ते ५ सेंटिमीटर लहान असते. उंच असल्यामुळे अन्न मिळवण्यासाठी त्यांना जास्त खटपट करावी लागत नाही. यासंदर्भात एक रंजक किस्सा ऐका. स्कॉटलंडचे कादंबरीकार सर वॉल्टर स्कॉट यांनी एकदा आपल्या घरी आलेल्या एका मित्राला जेवताना सावध राहण्यास सांगितलं. कारण “नाकाच्या शेंड्यापासून शेपटीपर्यंत सुमारे दोन मीटर लांब असलेला,” त्याचा वुल्फहाऊंड “टेबलावर किंवा खुर्चीवर न चढता ताटातील खाद्यपदार्थ केव्हा पळवेल हे काही सांगता येत नाही.”
तसं पाहिलं तर या जातीची कुत्री जन्माला येतात तेव्हा फार लहानखुरी म्हणजे फक्त ७०० ग्रॅम वजनाची असतात; पण, नंतर अगदी झपाट्यानं त्यांची वाढ होऊ लागते. एक श्वानप्रेमी स्त्री म्हणते, या शिकारी कुत्र्याची पिलं सुरवातीला “फार गोंडस असतात” पण नंतर, “कापसाच्या गोळ्यापासून अनाकर्षक, लांब पाय असलेल्या एका भव्य मवाळ प्राण्यांत त्यांचे विलक्षण झपाट्यानं परिवर्तन होते.”
ही कुत्री सहसा जास्त भुंकत नाहीत. त्यांच्यात प्रचंड ताकद असली तरी ती स्वभावतःच फार शांत असतात. पण, एखाद्या वेळी ती कधी भुंकली तर त्यांचे ते भुंकणे तुम्ही विसरता विसरणार नाहीत. एका मनुष्याविषयी लोक सांगतात, की त्यानं एकदा वुल्फहाऊंडचं भुंकणं ऐकलं तेव्हा, आपण “इतकं भेदक आणि उदासीन भुंकणं आयुष्यात कधीच ऐकलं नव्हतं,” असं तो म्हणाला.
छातीत धडकी बसावी असा “अतिशय हिंसक प्राणी, भेदक डोळे, भरदार भुवया आणि भुरकट केसाळ कातडी” या शब्दांत आयरिश वुल्फहाऊंडचं वर्णन करण्यात आलं आहे. पण, या शिकारी कुत्र्याविषयी असंही म्हटलं जातं, की “लहान मूल त्याच्यासोबत खेळू शकेल इतका हा प्राणी मायाळू असतो.” वुल्फहाऊंडच्या एका जाणकार मालकानं म्हटलं, की या जातीची कुत्री “विलक्षण प्रेमळ” असतात. ही शिकारी कुत्री फक्त भुरकट रंगाचीच नसतात तर पांढऱ्या, गव्हाळ, तांबड्या किंवा काळ्या रंगाचीही असतात.
मनोरंजक गोष्ट अशी, की सुप्रसिद्ध आयरिश लेखक ऑलिव्हर गोल्डस्मिथ यांनी देखील आपल्या लिखाणांत आयरिश वुल्फहाऊंडला स्तुतिसुमने वाहिली आहेत. त्यांनी म्हटलं “विशाल आयरिश वुल्फडॉग विलक्षण सुंदर आणि दिमाखदार आहे . . . . , जणू जगातल्या सर्व श्वानांचा राजाच.” वुल्फहाऊंड दिसायला आडदांड असला तरीही त्याच्या देखण्या स्वरूपावर म्हणजे त्याच्या भुवया, पापण्या आणि कल्ले यांवर हा आयरिश लेखक भाळला असावा; आणि म्हणूनच “अस्सल आयरीश स्वरूप” असंही या शिकारी कुत्र्याला म्हटलं जातं.
पण, मग या शिकारी कुत्र्याची सबंध जातच नष्ट होण्याच्या मार्गावर का यावी? एक म्हणजे त्यांची अफाट लोकप्रियता. राजेरजवाडे यांसारख्या प्रतिष्ठित मंडळीला अमूल्य नजराणा पाठवण्यासाठी वुल्फहाऊंडचे शौकीन या शिकारी कुत्र्यांना नजराणा म्हणून देत. त्यामुळे त्यांना “हुडकून जगाच्या कानाकोपऱ्यात पाठवण्यात आलं.” परिणामस्वरूप, जगभरात सर्वत्र ते थोडेथोडे असे विखुरले गेले. या शिवाय, लांडग्यांची शिकार करण्यासाठी आता त्यांचा काही उपयोग राहिला नाही तेव्हा आयर्लंडमध्ये या शिकारी कुत्र्यांची हेळसांड होऊ लागली.
इ.स. १८३९ मध्ये वुल्फहाऊंडच्या एका शौकिनानं त्यांच्या या दैन्यावस्थेविषयी असं म्हटलं: “कुत्र्यांचं हे महाकुळ झपाट्यानं नष्ट होत चाललंय ही फार खेदाची गोष्ट आहे; यासाठी आताच ठोस पावले उचलली नाहीत तर आणखीन काही वर्षांत त्यांची जात नामशेष होईल.” किंबहुना, ते इतके दुर्मिळ झाले होते, की आपल्यापाशी असलेला वुल्फहाऊंड “या जातीचा शेवटचा कुत्रा आहे” असं बरेच मालक दावा करायचे. पण, आनंदाची गोष्ट अशी, की हे वुल्फहाऊंड निर्वंश होता होता वाचले.
जॉर्ज ए. ग्रेहॅम यांच्यासारख्या लोकांच्या ‘अथक परिश्रमांमुळेच’ ही जात निर्वंश होता होता वाचली. सन १८६२ मध्ये त्यांनी वुल्फहाऊंडची दैना पाहिली तेव्हा त्यांना राहावलं नाही. त्यांनी शक्य तितके उरलेले वुल्फहाऊंड शोधून काढले. त्यांची काळजीपूर्वक पैदास केली आणि त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक मूलभूत कार्य केलं. सन १८९३ साली एका इतिहास तज्ज्ञानं म्हटलं, की त्यांनी असं केलं नसतं तर, “आज या महाकुळाचं नामोनिशाणही राहिलं नसतं.”
आयरीश वुल्फहाऊंडची पैदास करणारे एक मान्यवर वुल्फहाऊंड शौकीन, फिलीस गार्डनर यांनी लिहिलं: “तसे तर या जगात काहीही आणि कोणीही कायम टिकत नाही; पण असंख्य संकटांवर मात करून या दुर्मिळ जातीच्या कुत्र्यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यात यश आले आहे. आज ही कुत्री पुन्हा एकदा लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.”
[१७ पानांवरील चित्र]
अवघ्या चार आठवड्यांची वूल्फहाऊंडची पिलं
[१७ पानांवरील चित्र]
न्यूटनाड्र्झ, उत्तर आयर्लंडमधील एक शांत स्वभावाचा वूल्फहाऊंड