टोचणारे शब्द, घायाळ मनं
“मठ्ठ कुठली!”a एका जपानी महिलेच्या कानात हे शब्द अजूनही घुमतात—ती लहान असताना उठताबसता तिच्यावर या शब्दांचा मारा होत असे. कुणाकडून? शाळेतल्या सवंगड्यांकडून? भावंडांकडून? नव्हे. तिच्या आईवडिलांकडून. तेव्हाचं आठवून ती सांगते: “मी अगदी खच्चून जायचे, कारण त्यांनी दिलेल्या या नावाने माझ्या भावनांच्या अगदी चिंध्या व्हायच्या.”
अमेरिकेतील एकाला आठवतं की लहानपणी वडिलांची घरी परतण्याची वेळ झाली, की त्याची भीतीनं गाळण उडायची. तो सांगतो, “त्यांच्या गाडीच्या चाकांचा आवाज आल्याचा भास जरी झाला की, आजही माझ्या छातीत धडकी भरते. माझी धाकटी बहीण तर घाबरून कुठंतरी लपून बसायची. बाबांना एवढीशी चूक देखील सहन व्हायची नाही, आम्ही केलेल्या कोणत्याही कामाबद्दल त्यांचे कधीच समाधान होत नसल्यामुळे, आम्हाला क्षणोक्षणी त्यांची बोलणी खावी लागत.”
त्याची बहीण पुढे सांगते: “माझ्या आई किंवा वडिलांनी आयुष्यात कधी आम्हाला जवळ घेतल्याचं, आमचा मुका घेतल्याचं, प्रेमानं दोन शब्द बोलल्याचं किंवा ‘मला तुझा अभिमान वाटतो,’ असं काही म्हटल्याचं मला आठवत नाही. आणि प्रेम व्यक्त करणारे दोन शब्द कधीच ऐकायला न मिळणं, हे मुलांच्या नजरेत जणू दररोज त्यांच्याविषयी घृणा व्यक्त केली जाण्यासारखंच असतं.”
या सर्वांना लहानपणी झालेला हा त्रास काही विशेष नाही, असे कदाचित काहीजण म्हणतील. आणि बऱ्याच मुलांना खोचक, निष्ठुर शब्द ऐकावे लागतात, त्यांची हेटाळणी होते, यात नवीन असे निश्चितच काही नाही. या प्रकाराचा वृत्तपत्रांच्या मुखपृष्ठावरील लक्षवेधक मथळ्यांत किंवा खळबळजनक टीव्ही कार्यक्रमांत उल्लेख होत नाही. यामुळे होणारे नुकसान देखील डोळ्यांनी दिसू शकेल असे नसते. पण जर आईवडील आपल्या मुलांना रोज न रोज अशाप्रकारची गैरवागणूक देत राहिले, तर मात्र याचे परिणाम विनाशकारक—आणि तेसुद्धा कायमस्वरूपी ठरतील.
पाच वर्षांच्या वयोगटातील मुलांच्या एका समूहावर, १९५१ साली संगोपन पद्धतींच्या संबंधाने घेतलेल्या एका अभ्यासाचा १९९० साली आढावा घेण्यात आला. या मुलांच्या संगोपनामुळे त्यांच्यावर कोणते दीर्घ पल्ल्याचे परिणाम झाले हे समजून घेण्याच्या उद्देशाने संशोधकांनी, एव्हाना मध्यम वय गाठलेल्या या समूहातील बऱ्याच मुलांना शोधून काढले. या नव्या अभ्यासातून असे दिसून आले, की यांपैकी जीवनात ज्यांना अत्यंत कठीण दिवस काढावे लागले, ज्यांना भावनिक स्थैर्य कधीच लाभले नाही, आणि ज्यांना वैवाहिक जीवनात, मैत्रीसंबंधांत, आणि कार्यस्थळी देखील कधीच समाधान लाभले नाही ती मुले सर्वसाधारण समजुतीप्रमाणे नेहमीच गरीब किंवा धनाढ्य आईवडिलांची किंवा समस्यांनी ग्रासलेल्या आईवडिलांची नव्हती; तर ही अशा आईवडिलांची मुले होती की जे बेपर्वा आणि भावनाशून्य होते, जे आपले प्रेम क्वचितच व्यक्त करायचे, किंबहुना ज्यांनी कधीच प्रेम व्यक्त केलेले नव्हते.
हा निष्कर्ष तर सुमारे २,००० वर्षांपूर्वीच लिहिण्यात आलेल्या एका सत्य विधानातून अगदी स्पष्टपणे व्यक्त झाला होता: “बापांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिरडीस आणू नका; आणाल तर ती खिन्न होतील.” (कलस्सैकर ३:२१) आईवडिलांकडून होणाऱ्या शाब्दिक आणि भावनिक अपमानामुळे मुलं निश्चितच चिरडीस येतात, आणि हे त्यांच्या खिन्न होण्याला देखील कारणीभूत ठरू शकते.
दुःखी बालपण (इंग्रजी) या पुस्तकानुसार, अगदी परवापरवापर्यंत डॉक्टरांचे असे मत होते की बाल्यावस्थेतील अवसाद (चाइल्डहुड डिप्रेशन) नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही. पण काळाने आणि अनुभवाने त्यांचे हे मत खोडून काढले आहे. सदर पुस्तकाचे लेखक आत्मविश्वासाने सांगतात की चाइल्डहुड डिप्रेशनची आज ओळख पटलेली असून हा एक असामान्य प्रकार निश्चितच नाही. त्याच्या कारणांपैकी काही म्हणजे आईवडिलांकडून होणारी झिडकारणूक आणि हेळसांड. हे लेखक खुलासा करतात: “काही मुलांच्या बाबतीत असे घडते की त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर सतत टिकात्मक आणि अपमानास्पद शब्दांचा वर्षाव केलेला असतो. इतर मुलांच्या जीवनात केवळ एक पोकळी असते, पालक-मूल नात्यातील पोकळी: पालकांकडून अपत्यावरील त्यांच्या प्रेमाची अभिव्यक्ती कधीच होत नाही. . . . अशा पालकांच्या मुलांवर होणारा परिणाम खासकरून फारच दुःखद असतो कारण—सूर्यप्रकाश आणि पाणी जसे रोपट्यासाठी तसेच प्रेम हे मुलांसाठी—आणि मुलांसाठीच काय तर मोठ्यांसाठी देखील अत्यावश्यक असते.”
आईवडील आपले प्रेम उघडपणे आणि निःसंकोचपणे व्यक्त करतात तेव्हा मुलांना या प्रेमातून एक महत्त्वाचे सत्य समजून येते: ते असे की आपण इतरांच्या प्रेमाच्या लायक आहोत; आपलीही काही किंमत आहे. अनेकजण या संकल्पनेचा चुकीचा अर्थ लावून, हा एक प्रकारचा गर्विष्ठपणा आहे, इतरांपेक्षा स्वतःवर अधिक प्रेम असण्यासारखे आहे असे समजतात. पण या संदर्भात, तो अर्थ घेण्यात येऊ नये. या विषयावर एका लेखिकेने आपल्या पुस्तकात म्हटले आहे: “तुमच्या मुलाचे स्वतःविषयी कसे मत आहे याचा प्रभाव, तो कोणाशी मैत्री करतो, त्याचे इतरांशी कसे संबंध आहेत, त्याची वैवाहिक सोबत्याची निवड, आणि तो जीवनात कितपत यशस्वी होईल या सर्व बाबींवर पडतो.” स्वतःविषयी एक संतुलित, विनम्र दृष्टिकोन असण्याच्या महत्त्वाला मान्यता देऊन बायबल सर्वात श्रेष्ठ आज्ञांपैकी दुसऱ्या आज्ञेत सांगते: “तू आपल्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी प्रीति कर.” (तिरपे वळण आमचे.)—मत्तय २२:३८, ३९.
अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत नाजूक असणारा आपल्या मुलाचा आत्म-सन्मान कोणतेही सर्वसामान्य पालक जाणूनबुजून धुळीस मिळवतील अशी कल्पना करवत नाही. पण मग सहसा असेच का घडते? आणि असे घडू नये म्हणून काय करता येईल?
[तळटीप]
a जपानी भाषेत, नोरोमा बाका!