तंत्रज्ञान—दास की धनी?
एक छोटी मुलगी आपल्या आईला उबदार आलिंगन देत आहे आणि आईच्या चेहऱ्यावर केवढे स्मित खेळत असल्याचे दिसते आहे. हे दृश्य साधारणतः कोणतीही आई कामावरुन घरी परतल्यावर आपल्या मुलीला भेटते त्यावेळचे असल्याचे वाटेल. तरीपण वर्तमानपत्राच्या पहिल्याच पानावर असणाऱ्या या चित्राखालील मथळा असा आहेः “डॉ. ॲना एल. फिशर अंतराळ भेटीवरुन परतल्यावर आपली मुलगी ख्रिस्तीन हिला आलिंगन देऊन आहे.” त्या नुकत्याच आठ दिवसांच्या अंतराळ प्रवासानंतर परतल्या होत्या. या प्रयाणात अंतराळ वीरांनी दोन भटकलेल्या उपग्रहांना धरुन त्यांना अंतराळ यानासोबत पृथ्वीवर परत आणण्यात यश मिळवले होते.
वर्तमानपत्राच्या याच पानावर एका छोट्या मुलीवर हृदय रोपण करण्याच्या बाबतीत ऐतिहासिक मजल मारल्याची घटना प्रसिध्द करण्यात आली आहे. ही तान्ही मुलगी २१ दिवसाच्या झगड्यात मृत्यु पावली तरी “तिच्या डॉक्टरांनी आज हे निदान केले की शस्त्रक्रियेत तिला वानर हृदय बसविण्यात जे यश मिळाले ती विज्ञानाची प्रगति आहे व एके दिवशी यामुळे कित्येक मुलांचे प्राण वाचविले जातील अशी आशा वाटते.”
अशाप्रकारचा हा तंत्रज्ञानाचा पालट साधारण ५० वर्षांपूर्वी विज्ञानाचा काल्पनिक मसाला वाटत होता. तथापि, आता तो बहुतेकांना असाधारण असा वाटत नाही. कोणी मित्र परदेशाहून आपल्या घरी आला आहे किंवा कोणी इस्पितळात जाऊन आपले टॉन्सिल्स काढून आला आहे इतके ते सोपे वाटते.
या गोष्टींनी भारावले जाऊन पुष्कळांना वाटू लागले आहे की विज्ञानशास्त्र आणि तंत्रज्ञान याकरवी काहीही साध्य करता येईल. “प्रत्यक्ष असे फायदे निर्मिण्यात त्यांनी मिळविलेल्या यशप्राप्तीमुळे विज्ञानशास्त्रज्ञ व तंत्रज्ञानी यांच्या कामास पूज्य मानण्यात येत आहे,” असे विज्ञान प्रशिक्षक जॉन गिब्बोन्स यांनी परिक्षिले. अशा या आशावादाचे प्रवर्तन अमेरिकन अध्यक्ष रोनाल्ड रिगन यांनी १९८३ मध्ये संयुक्त राज्याला उद्देशून केलेल्या भाषणात दिसले. ते म्हणालेः “अमेरिकनांच्या अग्रेसर आत्म्याकरवी आपण या २०व्या शतकात उद्योगपती झालो आहोत तोच अग्रेसर आत्मा आता आणखी एक मोठी संधी उघडून देत आहे—उच्च तंत्रज्ञानाची सीमा.”
तरीपण, इतर काही कमी स्वरुपाचा उत्साह दाखवितात. उदाहरणार्थ, विज्ञानशास्त्र प्राध्यापिका मेरी एलीनॉर क्लार्क यांनी एका मुलाखतीत म्हटलेः “अमेरिका व इतर प्रगत देशात तंत्रज्ञानावरील विश्वास हा धार्मिक विश्वासासारखा बनला आहे. आम्हाला आता असे वाटायला लागले आहे की आम्ही तांत्रिकदृष्ट्या अधिक बुध्दीमान बनलो आहोत व कोणताहि त्रास ओढावला तरी त्यातून सहज निभावू शकतो.” काहीतर याबाबतीत अधिकच पराकोटीची कल्पना बाळगून आहेत. एका लेखकाने संगणक वैज्ञानिक जॅक्वेस वॅलीस यांना असे वाटत असल्याचे लिहिले की, ‘उच्च तंत्रज्ञानाने आपला उच्चांक गाठला आहे व तो आता समाजावर त्याच्यासारखेच आपले प्रभुत्व राखून आहे.’
तर मग, तंत्रज्ञान हे खरेच सुसंधीची नवी सरहद्द आहे का व त्याच्याकरवी आमच्या समस्या सुटू शकतील का? किंवा या तंत्रज्ञानाने आमच्या विचारावर आणि जीवनपध्दतीवर असा पगडा बसविला आहे की ते आमचा दास असण्यापेक्षा आता आमचा धनी बनले आहे? (g85 11/22)