प्रस्तावना
पवित्र शास्त्र हे देवाच्या प्रेरणेने हिब्रू, ॲरामेईक आणि ग्रीक भाषांमध्ये लिहिण्यात आले होते. “सर्व राष्ट्रांना,” म्हणजेच सर्व राष्ट्रांतील लोकांना देवाच्या वचनापासून फायदा व्हावा म्हणून शास्त्राचा अनेक भाषांमध्ये अनुवाद करणे गरजेचे आहे. (मत्तय २४:१४) मत्तय ते प्रकटीकरण या सत्तावीस पुस्तकांना “ख्रिस्ती ग्रीक शास्त्र” असे म्हटले जाते; कारण, इसवी सन पहिल्या शतकात ख्रिस्ती लेखकांनी ते देवाच्या प्रेरणेने मुळात ग्रीक भाषेत लिहिले होते.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र—नवे जग भाषांतर हे पहिल्यांदा सन १९५० मध्ये इंग्रजी भाषेत प्रकाशित झाले. ते प्रामुख्याने वेस्टकॉट आणि हॉर्ट यांच्या सुप्रसिद्ध ग्रीक मूळग्रंथावर आधारित आहे; हा मूळग्रंथ, सगळ्यात प्राचीन ग्रीक हस्तलिखितांशी जुळतो. नवे जग भाषांतर यात ग्रीक मजकुराचे शक्य तितक्या प्रामाणिकपणे भाषांतर करण्यात आले आहे. ही मराठी आवृत्ती, २०१३ च्या इंग्रजी आवृत्तीवर आधारित असून, यातसुद्धा तीच प्रामाणिकता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
ख्रिस्ती ग्रीक शास्त्र—नवे जग भाषांतर याच्या मुख्य मजकुरात ‘यहोवा’ हे देवाचे अनोखे नाव २३७ वेळा आढळते. देवाच्या नावाचे पवित्रिकरण होणे अतिशय महत्त्वाचे आहे आणि तारण मिळवण्यासाठी सर्वांनी त्याचे नाव घेऊन त्याला हाक मारणे गरजेचे आहे; म्हणूनच, मूळ भाषांमध्ये पवित्र शास्त्रात जिथे जिथे यहोवा हे नाव आढळते, तिथे तिथे या भाषांतरात ते घालण्यात आले आहे.—मत्तय ६:९; रोमकर १०:१३.
देवाने सर्व मानवांसाठी एक नीतिमान नवे जग आणण्याचे अभिवचन दिले आहे; नवे जग भाषांतर हे नाव त्याच अभिवचनावर आधारित आहे. (२ पेत्र ३:१३) पवित्र शास्त्राचा लेखक, अर्थात देव याच्यावर प्रेम असल्यामुळे या ग्रंथाचे भाषांतर करणाऱ्यांनी, त्याचे विचार आणि संदेश शक्य तितक्या अचूकपणे लोकांपर्यंत पोचवण्याची आपली खास जबाबदारी ओळखून हे भाषांतर केले आहे. “सत्याचे अचूक ज्ञान” मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रामाणिक मनाच्या वाचकांसाठी हे भाषांतर अतिशय मोलाचे ठरावे, अशी आम्ही प्रार्थना करतो.—१ तीमथ्य २:४.